'झोंपाळूं म्हणजे का वाईट ?' नागेशनें विचारलें.
'मुळींच नाहीं. तो विपुल अन्नाला आपल्या पोटांत ठाव देतो. अन्नब्रह्माचा तो थोर एकनिष्ठ उपासक असतो.' प्रद्युम्न म्हणाला.
'खूप जेवणारा का वाईट असतो ?' नागेशनें विचारलें.
'मुळींच नाहीं. तो मारामारींत पहिला असतो. सर्वांना रडवतों.' हलधर बोलला.
'येऊं का रडवायला, अशी देईन एक !' नागेश म्हणाला.
'परंतु नागेश उत्कृष्ट सेवकहि आहे. त्या दिवशीं त्या वाटसरूची होडी उलटली. हांकाहांक झाली. नागेशनें कितीजणांना त्या दिवशीं वांचविलें ! शक्ति ही वाईट वस्तु नाहीं. शक्तीच्या पाठीमागें शिव हवा, एवढेंच. बरें, नागेश, एकदां हंस बघूं. राग गेला ? आतां एक प्रयोग करूं या. येथें तूं नीज. तुझ्या अंगावर बरींच पांघरुणें घालतों. झोंपलास तरी चालेल. झोंपच लागली पाहिजे असेंहि नाहीं. आणि तूं, आर्यव्रत, तूहि ये. तुझ्या अंगावरहि तितकीच कांबळीं घालतों. निजा दोघे. हंसतां काय ? निजा.' आस्तिक म्हणाले.
ते दोघे कुमार झोंपले.
'मी माझा पांवा वाजवतों म्हणजे यांना झोंप लागेल.' मुरलीधर म्हणाला.
'मी गातों. सामवेदांतील मंत्र म्हणतों.' जानश्रुति म्हणाला.
तेथें एक महान् प्रयोग सुरू झाला. सारें शांत होत होतें. संगीत सुरू होतें, पांवा वाजत होता. वेदगान चाललें होतें. नागेशचे डोळे, ते पाहा मिटत चालले, उघडले जरा, मिटले, मिटले आणि आर्यव्रत, तोहि चालला निद्रेकडे. चालला, मिटले डोळे, झोंपला.
'दोघे झोंपले ना रे ?' आस्तिकांनी विचारलें.
'नागेश तर कधींच झोंपला. झोंप म्हटलें कीं तो झोंपतो.' हृषीकेश म्हणाला.
'परंतु ऊठ म्हटलें की उठत नाहीं. तो अर्धा अर्जुन झाला आहे. अर्जुनाला गुडाकेश म्हणत. निद्रा त्याच्या स्वाधीन होती. इच्छा असतांच जागा होई, इच्छा असतांच निजे. एक प्रकारचे इच्छामरण व इच्छाजीवनच तें. आतां आपण एक गम्मत करूं या. तुम्ही पाहा हो.' आस्तिक म्हणाले.