१
टिपूर चांदनं चांदन्याजोगी रात
शेजेच्या भरताराची देवासारखी सोबत
२
रेशीमकाठी धोतरजोडा, पदर जरीदार
माझा नेसला तालेवार
३
समूरल्या सोप्या कोन निजे पलंगावरी
घरचं मालक कारभारी
४
अंगात अंगरखा वर केसांचा गरका
माझ्या भरताराचा साज शिपायासारखा
५
अंगात अंगरखा वर कब्जा हिरवगार
उभं पेठेला जमादार
६
उन्हाळा पावसाळा, पानमळ्याला गारवा
हौशाच्या जीवावर न्हाई कुनाची परवा
७
दिवाणला जातां मागं पुढं माणूस
मधी घरधनी , मोतियाचं कणीस
८
माझ्या अंगनात चाफाचंदनाची मेख
घोडा बांधितो माझा देशमुख
९
तालुक्यांत कोन बोलतो बलवान
दिली कचेरी अलवान
१०
कचेरीची बोलावनं, एवढ्या रात्री काई?
शिलेदार माझा दिव्यानं पत्र पाही
११
पाऊसपानियाची लोक आपुल्या घरीदारी
माझ्या हौशाला आली सरकारी कामगिरी
१२
सरकारादरबारांत माझा मराठा मानाचा
इडा पिकल्या पानाचा
१३
गादीचा बसनार लोडाचं टेकून
माझ्या मारवाडयाचं दुकान
१४
दिवान वाडया जातो दुही रस्त्यानं संत्री लोक
सुभेदाराचा माझ्या झोक
१५
तिन्ही सांजा झाल्या दिवादीपक माझ्या हाती
घरधनियांच्या बारा बैलाच्या जोडया येती
१६
घोडीला घासदाणा देते डाळ हरबर्याची
शिंगी माझ्या सरदाराची
१७
वाघ मारीला वाघजाळी ससा मारीला घोळुनी
घरधनी आलं शिकार खेळूनी
१८
समूरल्या सोप्या ढाल तरवार बसता घोडा
नावार आमुचा जोडा
१९
दिल्या घेतल्याचा हिशेब माझ्या घरी
घरधनियांना शोभते सावकारी
२०
कचेरीचं बोलावनं आलं खडाखडी
धनी पत्र वाचीतो घोडयावरी
२१
हातात छत्रीकाठी यवढया उन्हाच कुठ जाणं?
आलं कचेरीला बोलावण
२२
शंभरसाठ संधी पुढं शिपाई दफ्तराला
घरधनी वकील सातार्याला
२३
दिवाणाला जातां उजवा घालावा गनपती
धनियांना येतो यशाचा विडा हाती
२४
हौस मल मोठी पाटी भरून भाकरीची
घरधनियांची गडि मानसं चाकरीची
२५
वाटेवरली इहीर सुनी बांधली मोडीव
नाव हौशाच तोडीव
२६
खुतनीच्या गादीवर रजई वेलाची
हौशा राजसाची रानी मी हौसेच्या तोलाची