१०१
घरधनी इच्यारती कुंठ गेलीया घरवाली
ऐका माझ्या शाहीराची बोली
१०२
घरधनी इच्यारती कुठ गेलीया वेडी जात
बाळ रडे पाळन्यात
१०३
घरधनी इच्यारती कुंठ गेलीया येडी सिता
तिच्या पदरी कात हुता
१०४
घरधनी इच्यारती कुंठ गेलीया घरवाली
मैना हंसत येत दारी
१०५
रुसला घरधनी काम पुशीतो येळाचं
नाव सांगते मी बाळाचं
१०६
सोजीचा जेवनार नका वाडुंसा गूळपानी
हौशाची सुरत नाजूक केळावानी
१०७
पोटीच्या पुत्रासाठी नवस केल्याती जागोजाग
कंथ हौशा फेडू लाग
१०८
दूरदेशी गेला, सासुबाईचा बिरड मनी
माझ्या कुंकवाचा धनी
१०९
जीवाला देते जीव जीवाच्या सोबत्याला
हौशा कंथाची गार साउली बसायाला
११०
पीर्तीचा कंथ पानाला लावी चुना
डोळ्यानं दावी खुणा
१११
पानी भरते, घागर घेउन जाते दूर
घरधनियांचे नंदी आल्याती पान्यावर
११२
भरतार बोले, का ग कामीनी गोरीमोरी
आईबाप गोताला इसर माझ्या जीवावरी
११३
अंतरीच गुजु मी बोलूं कुनापाशी
कंथ शेजेला इसवासी
११४
आपुला भरतार पूर्वीच कोन हुता
न्हाई आठवुं दिली माता
११५
भरताराला ताट नको करुंस नारी दुजं
आपुल्या जलमाचं त्येन उचललं वझं
११६
फाटला पाटव घेते निरीला झाकून
आब कंथाचा राखुन
११७
दुबळा भरतार, दुबळा असूंदे बाई
सम्रत मायबाप त्येंच्या घरी काडीची सत्ता न्हाई
११८
दुबळा भरतार त्येच्या इच्यारी असावं
सम्रत मायबाप त्यांच्या वसरी नसावं
११९
दुबळ्या भरताराची नको करुस हेळना
हलवीतो कोडकौतुक पाळना
१२०
दुबळ्या भरताराला नको म्हनुस मेलागेला
सम्रत आईबाप, तिथ न्हाई तुझ जल्म गेला
१२१
दुबळपन माझं जनालोकांनी हिणाविलं
हौशा भरतारान जहाज चालविलं
१२२
सम्रत आईबाप माळावरला घुमट
दुबळा भरतार लावितो शेवट
१२३
दुबळा भरतार आनी भाजीपाल्याची मोट
शहानी मैना, हंसत सोडी गाठ
१२४
दुबळ्या भरताराला नार मिळाली दमदार
गळ्यांत काळी पोत, म्हनते चंद्रहार
१२५
नाकामंदी नथ, गळ्यामंदी पोत
रस्त्यान चालली दुबळ्याची चंदरज्योत