७६
गावाला गेला लाल, जशी काळजाची पेटी
जिवा हुरहूर तुझ्यासाठी
७७
गावाला गेला बाई माझ्या जीवाचा कलिदा
साखर सोजीचा मलिदा
७८
गावाला गेला बाई, माझा साखरेचा पेढा
जीव माझा थोडाथोडा
७९
गेल्या कुणा गावी, माझ्या मनीचा मोहन
त्याच्या बिगर, मला, गोड लागंना जेवन
८०
गावाला गेला बाई माझ्या सुरतीचा चांगला
कुन्या नारीनं दिला सात मजली बंगला ?
८१
उन्हाच्या कारामंदी, डोळं कशानं झालं लाल ?
सयानु किती सांगू, धनी गावाला गेलं काल
८२
दिस जातो कामाधामा रात मला येठीची
उर्ता लागली भेटीची
८३
हसत खेळत दिस लावते कारनी
रात्र बाई आली, माझ्या मनाची झुरणी
८४
दिस बुडियेला, सर्वी दुनिया झोपाळली
धनी नाही आलं ! रात इसाव्याला गेली
८५
किती मी वाट पाहूं उभी सोप्याच्या खांबाला
माझ्या राजसाचा दृष्ट पडला संवला
८६
साळीची तांदूळ आधणी बोलत्यात
मला भेटाया घरधनी वाट चालत्यात
८७
पडतो पाऊस, पुढं पाऊस मागं वारा
कंच्या सावलीला माझा हिरा
८८
दिस मावळला मावळून आडऊन
माझ्या श्रीरंगाच्या करडया घोडीला पिवळा जीन
८९
दिस मावळला दिसापाशी मांझ काई ?
राजसाची यायाची वाट राती हाई
९०
उन्हाच्या कहारामंदी डाक सुनाची धाव घेती
सखयाची माझ्या खुशालीची पत्रं येती
९१
किती वाट पाहू गावा गेल्या वकिलाची
पानं सुकली रतिबाची
९२
बारीक माझा साद कसा वार्यान ऐकूं गेला
सावळ्या सखयानं घोडा मैदानी उभा केला
९३
दुरून देखली मी, चाल माझ्या रायाची
घरी धूळ झाडील पायाची
९४
गावाला गेला सखा, माझ्या जिवाला लसतं
धनी येतो रस्त्यानं हांसत
९५
सातपदरी कंठीवर, शोभे मुरडीची सरी
धनी आलं घरी, चांद उगवला दारी
९६
मृदुंगावरी हात टाकीतो नवानवा
गावा गेलेला शाहीर आला कवा ?
९७
आठा दिसाची बोली होती, नववी रात्र कुठं गेली ?
घरधनी बोलती, पानमळ्या वस्ती केली
९८
अंगुळीला पानी हंडा ठेवते गुजराती
माझा राजस गोरा किती
९९
पानी तापवते हंडा तापुन झाला लाल
सखा मागतो मोगरेल
१००
अंगुळीला पानी ठेवीते ठोकयाचा
शीण काढिते सखयाचा