७६
भरताराचं राज जसा ओट्यांतला मेवा
पोटीच्या बाळाला हिशेब किती द्यावा
७७
भरताराच राज काचेचा बंगला
पोटीच्या बाळाला वारा धुंधक लागला
७८
पाचाच नेसणी साडेसातीच वलणी
राज भरताराच मालनी
७९
मायबापाच राज मळ्यातली मका
माझ्या चुडीयाचं राज कृष्णदेवाची द्वारका
८०
चंद्रान केल खंळ आभाळाच्या बळं
माझ्या चुडियाचं राज पृथिमीनिराळं
८१
शिपायाची नार दरबाजारी दानं घेती
भरताराच्या राज्यांत मी गाडीनं गल्ला नेती
८२
भरताराचं राज साबडभाबडं
दारी बळद उघडं
८३
सोईरंधाईरं सारं संपत्तिच लोक
आपुल्या भरताराच राज निर्वाणीच एक
८४
भरताराचं राज उगींच न्हवं बाई
मोगर्याशेजारी झुलव घेते जाई
८५
भरताराचं राज लुटीते सान्यावाटं
त्येची फिर्याद न्हाई कुंठ
८६
भरताराचा राग, डाव्या डोळ्याच्या तराटणी
नको बोलूं मराठणी
८७
भरताराचा राग डाव्या डोळ्याची कारे लाल
राग जाऊंदे, मग बोल
८८
भरताराचा राग , दुधाची उफळी
तेवढी वेळ तूं सांभाळी
८९
भरताराची खूण डोळ्याच्या लवणी
मनी जाणावी मालनी
९०
रूसला भरतार घेईना गंधपानी
आशिलाची लेक शानी
९१
भरतार राग धरी, त्येला रूसायाची सवं
आम्ही पाटलाच्या पोरी पाया पडायाच्या न्हंव
९२
पाच परकाराचं ताट हौशा जेवतो घाईघाई
परनारीचा छंद लई
९३
शेजेची अस्तुरी पान्याच घगाळ
परनारीसाठी तोंड करीतो वंगाळ
९४
परनारीच्या पलंगावर नका निजूंसा बिनघोरी
परनारी तुमच्या गळ्यावरी सुरी
९५
आपुली नार हाय हळदीचा गाभा
लोकांच्या नारीसाठी वळचनीखाली उभा
९६
आपुली नार हाय दवन्याची काडी
लोकांच्या नारीसाठी घेतो बुरजावरनं उडी
९७
घरची अस्तुरी जशी कवळी काकडी
पराया नारीसाठी वाट चालतो वाकडी
९८
घरची अस्तुरी जसा पान्याचा तलाव
पराया नारीसाठी करी घराचा लिलाव
९९
माळ्याच्या मळ्यामंदी एका झाडाला मिर्च्या सोळा
कोण झाबड पडली गळा माझ्या मोत्याची गेली कळा
१००
सडसारवन शेजी पुसे कोन दिस
चुडिल्या राजसाची शिरमंताची एकादस