पाऊस पडेना
पडेना एक थेंब
फुटेना एक कोंब
धरणीला ॥१॥

पाऊस पडेना
सुकले नद्या नाले
गुरावासरांचे झाले
भारी हाल ॥२॥

पाऊस पडेना
सुकली सारी तळी
सुकल्या वृक्षवेली
रानीवनी ॥३॥

पाऊस पडेना
देव कोपलासे भारी
देवावाचून कोण तारी
त्रिभुवनी ॥४॥

पाऊस पडेना
सुकली सारी तोंडे
राग का गोविंदे
केला आहे ॥५॥

पाऊस पडेना
पिकेल कशी शेती
होईल सारी माती
संसाराची ॥६॥

पाऊस पडेना
प्राण येती कंठी
कधी तो जगजेठी
करील कृपा ॥७॥

पडेल पाऊस
बघा झाले मेघ गोळा
आला हो कळवळा
देवबाप्पा ॥८॥

पावसाची चिन्हे
दिसती आभाळी
मेघांची गर्दी काळी
जाहलीसे ॥९॥

मेघांची आकाशी
गर्दी झालेली पाहून
मोर नाचे आनंदून
वनामध्ये ॥१०॥

मोर नाचताना
मोर अश्रु तो गाळिती
लांडोरी चाखिती
आनंदोनी ॥११॥

पड रे पाऊसा
पिकू दे दाणापाणी
भाईरायाला बहिणी
आठवितो ॥१२॥

पाऊस पडतो
पडतो काळाकुट्ट
धरणीमाता हिरवी जोट
पांघुरली ॥१३॥

पाऊस पडतो
थांबेना पागोळी
धरणीमाय हिरवी चोळी
घालीतसे ॥१४॥

पडतो पाऊस
ओल्या झाल्यात कामिनी
भाकरीच्या पाट्या
शेतात जातात घेऊनी ॥१५॥

पाऊस पडतो
ओल्या झाल्यात जमिनी
या ग पेरणीच्यासाठी
शेता जाती सुवासिनी ॥१६॥

पाऊस पडतो
पागोळ्या पाणी गळे
माणिक दारी खेळे
उषाताई ॥१७॥

पाऊस पडतो
पडतो मुसळधार
गंगेला आला पूर
दोन्ही थडी ॥१८॥

पाऊस पडतो
गरजे पाणी पडे
आकाश जणू रडे
रात्रंदिस ॥१९॥

पाऊस पडतो
पडतो सारखा
सूर्य झालासे पारखा
चार दिवस ॥२०॥

पाऊस पडतो
विजांचा चमचमाट
धरणीमाता हिरवा थाट
मांडीतसे ॥२१॥

मेघ गडगडे
कडाडते वीज
कुशीमध्ये नीज
तान्हेबाळा ॥२२॥

झाडे झडाडती
वीज कडाडती
धरणीमाये तुझा पती
येत आहे ॥२३॥

मेघ गरजतो
पाऊस वर्षतो
कुशीत निजतो
तान्हे बाळ ॥२४॥

पाऊस थांबेना
राऊळी कशी जाऊ
त्रिदळ कसे वाहू
शंकराला ॥२५॥

पाऊस थांबेना
देऊळी कशी जाऊ
बाळाला कशी नेऊ
कडेवरी ॥२६॥

पाऊस थांबेना
पाखरे गारठली
आईच्या पदराखाली
तान्हे बाळ ॥२७॥

पाणी पाणी झाले
सार्‍या अंगणात
नको जाऊ तू पाण्यात
तान्हे बाळ ॥२८॥

येईल पडसे
पाण्यात नको जाऊ
मायेला नको जाचू
तान्हे बाळा ॥३०॥

पावसाच्या भारी
जणू डोंगर वाकले
हिरव्या रुमाले झाकले
त्यांनी तोंड ॥३१॥

पाऊस पडतो
पडतो थुईथुई
भिजल्या जाईजुई
विठ्ठलाच्या ॥३२॥

पाऊस पडतो
पडतो कोंडाकोंडा
भिजला राज्यगोंडा
विठठलाचा ॥३३॥

पाऊस पडतो
पडतो भिरिभिरी
भिजली अब्दागिरी
विठ्ठलाची ॥३४॥

पाऊस पडतो
भरले नद्या नाले
भाई माझे अडकले
पैलतीरा ॥३५॥

पाऊस पडतो
नद्यांना आले पाणी
देवा सुखरुप आणि
भाईराया ॥३६॥

थंडी पडे भारी
पाठीत निघती कळा
कुशीत तान्हे बाळा
गाई करी ॥३७॥

थंडी पडे भारी
पाणी झाल जसे काल
निजली तान्ही बाळे
कुशीमध्ये ॥३८॥

थंडी पडे भारी
फुलती ना कळ्या
आखडून गेल्या
झाडावर ॥३९॥

थंडी आज भारी
ताटी निखारे भरुन
देऊ शेकाया नेऊन
बाप्पाजींना ॥४०॥

थंडी पडे भारी
मळे करपले
ओठ ते फुटले
तान्हे बाळाचे ॥४१॥

थंडी पडे भारी
फुटले तुझे ओठ
कोकमतेलाचे तू बोट
लाव बाळा ॥४२॥

थंडी पडे भारी
तुला बंडी मी घालीन
राही बाळा तू निजून
अंथरुणात ॥४३॥

थंडी पडे भारी
तारे थरारती
करी तू गुरंगुटी
तान्हे बाळा ॥४४॥

दुपारचे ऊन
दगडाच्या झाल्या लाह्या
तोंड कोमेजे देसाया
भाईराया ॥४५॥

दुपारचे ऊन
लागते रे तुला
माझ्या गुलाबाच्या फुला
गोपूबाळा ॥४६॥

दुपारचे ऊन
झळा झळाळा लागती
बाळे माझी कोमेजती
सुकुमार ॥४७॥

दुपारचे ऊन
पाय गं भाजती
त्यात बाळ कडेवरती
माउलीच्या ॥४८॥

दुपारचे ऊन
नको जाऊ तू बाहेर
तू रे राजा सुकुमार
फुलावणी ॥४९॥

दुपारचे ऊन
बाळ खेळायला गेले
कोकंबासारखे
तोंड लाल लाल झाले ॥५०॥

दुपारचे ऊन
कोण ग साहील
समुद्र आटेल
अशा ऊने ॥५१॥

दुपारचे ऊन
पाखरे शांत शांत
आईच्या मांडीवरी
तान्हे बाळ निवांत ॥५२॥

दुपारचे ऊन
बाहेर बघवेना
बाहेर निघवेना
घडीभर ॥५३॥

दुपारचे ऊन
इंगळांची वृष्टी
हिरवी सारी सृष्टी
जळून गेली ॥५४॥

कडक उन्हाळा
रानात नाही पाणी
देव आश्चर्य करितो
झाडा पल्लव फोडूनी ॥५५॥

कडक उन्हाळा
पाण्याचा नाही पत्ता
देव आश्चर्य करीतो
झाडा फुटे नवा पत्ता ॥५६॥

छत्र धरी शिरी
त्याचा लखलखाट पडे
सूर्यनाथ चढे
रथावरी ॥५७॥

उगवले सूर्यदेव
आधी उगवे माझ्या दारी
मग पृथ्वीवरी
उजेड पडे ॥५८॥

सूर्य वर आला
अंधार गेला दूर
दरीत करी घर
भांबावोनी ॥५९॥

सूर्य उगवला
किरीट किरणांचा
पाखरा फुटे वाचा
झाडावरी ॥६०॥

सविता संप्रूण झाल्या
मग करावे पारणे
वाचीले रामायण
बाप्पाजींनी ॥६१॥

सविता संप्रूण झाल्या
दिव्याला भरण
वाचील रामायण
मामंजींनी ॥६२॥

सविता संप्रूण झाल्या
पदांची पोथी सोडी
गुरुला हात जोडी
भाईराया ॥६३॥

उगवला भानू
शेंदराच्या माथा
आयुष्य मागे बाप्पा
गोपूबाळ ॥६४॥

सोनेरी किरण
डोंगराच्या माथा
नमन सूर्यनाथा
उजाडत ॥६५॥

सूर्य नारायणा
तापू नको फार
बाहेर सुकुमार
भाईराया ॥६६॥

सूर्य नारायणा
तापू नको फार
गावा गेले छाया कर
भाईराया ॥६७॥

सूर्य नारायणा
गगनी तापशी
लोकांचे पाहशी
पापपुण्य ॥६८॥

उगवला भानू
भानु नव्हे हा भास्कर
त्याला माझा नमस्कार
दोन्ही हाती ॥६९॥

आंबे मोहरले
आनंद कोकिळेला
वसंताच्या स्वागताला
करितसे ॥७०॥

समुद्राच्या पाण्या
स्वच्छता अणु नाही
नाचते हालते
सदा खाली वर होई ॥७१॥

कोठलेही असो
पाणी समुद्र घे पोटी
उन्हाळा पावसाळा
त्याला नाही कधी तुटी ॥७२॥

समुद्रा रे बापा
किती टाहो तू फोडशी
पुत्र तुझा गोरागोरा
जाऊन बसला आकाशी ॥७३॥

समुद्राच्या लाटा
फेस उधळिती
गोड त्या चंद्राला
फुले अर्पिताती ॥७४॥

समुद्रा गं मध्ये
लाटांचे उभे शेत
फेसाचे पीक येत
अपंरपार ॥७५॥

भरली कृष्णा बाई
जशा दुधाच्या उकळ्या
जटा ठेविल्या मोकळ्या
दत्तात्रेयांनी ॥७६॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel