१
जात्या तुं ईसवरा तुझं जेवन मला ठावं
घास घालिते मनोभावं
२
जात्या तुं ईसवरा, नको मला जड जाऊ
बयाच्या दुधाचा सया पहात्यात अनुभवु
३
जात्या तूं ईसवरा, नको मला दड जाऊ
माझ्या शिणेची राधा कुठं पाहू
४
थोरलं माझं जातं खुटा त्याचा चकमकी
आम्ही दळुया मायलेकी
५
थोरलं माझं जातं , चवघी बायकाच
घर वडील नायकाचं
६
थोरलं माझं जातं, कशाला तिघी चौघी
एका फेराला लागू दोघी
७
थोरलं माझं जातं, सासुबाईच्या गोडीचं
चौघी बायकाच्या ओढीचं
८
थोरलं माझं जातं दोघीतिघीच्या ओढणीचं
घरामागल्या गडणीचं
९
थोरलं माझं जातं वोढना एकलीला
संगं घेते मैना धाकलीला
१०
काममंदी काम दळन अवघड
गाण्याच्या नादावरी मी ओढते दगड
११
जातं ओढताना, हाताला येती फोड
काळा कुरुंद जाई जड
१२
जात्याचं ओढण तुला कळेना लाडीबाई
काळा कुरुं जड जाई
१३
जातं ओढतांना कंबर माझी लवं
माह्यारी कामाची न्हवती सवं
१४
थोरलं माझं जातं मला बघून पळतं
बयाचं दूध माझ्या मनगटी खेळतं
१५
चक्कर माझं जातं, घागर वाटे गोटी
बयाबाईचं दूध खेळतं मनगटी
१६
दळन दळीते, नखाबोटाच्या आधारी
बयाबाईचं दुध प्याले जशा मधाच्या घागरी
१७
जातं मी ओढतांना पाठ भिजुन पदर ओला
बयाबाच्या आकडी दुधाला कड आला
१८
जातं मी ओढीते दंडभुजाच्या जोरावरी
माऊलीनं दिली घुटी पारोशा केरावरी
१९
दळन दळीते, हाताला सर्दी भारी
बयाच्या जीवावरी जायफळाची केली न्याहारी
२०
जातं ओढतांना मुठीत माझ्या बळ
माझ्या माउलीनं घुटीत दिलं जायफळ
२१
जातं ओढतांना देते मनगटं तोलुनी
मातेचं प्याले दूध न्हाई घेतलं बोलूनी
२२
दळण दळीते, मनगटी पडला तिढा
बया मालनीनं दिला घुटींत येलदोडा
२३
दळण दळीते , हाताच्या पाचबोटी
माऊलीचं दूध खेळतं मनगटी
२४
दळण दळीते, पाचबोटाच्या झेल्यानी
दूध घेतलं तुझं ग मालनी
२५
दळण दळीते, बाह्या ग बळ माझं
मायबाई वाघिणी दूध तुझं