१
पहाटेच्या पारामंदी, न्हाई जोडव्याला शीण
माझी बाळाबाई भाग्यवानाची हाये सून
२
पहाटेच्या पारामंदी मी कशानं झाले जागी
कृस्नाबाईच्या अंगुळीला जाऊ बहिनी दोघी
३
पहांटेच्य पारामंदी दळन सैधवा सखीचं
पारवं घुमत्यात माडीयेचं
४
पहांटेचं दळन, येरवाळी शेनपानी
काम झालंया गवळनी
५
पहांटेच्या पारामंदी कोन करीतं किलीकिली
पोरं उठली चिलीपिली
६
पहांटेच्या पारामंदी कोन हौशा गीत गातो
सावळा कंथ, बागेला पानी देतो
७
पहाटेच्या पारामंदी पांखरं झाली जागी
माझा बाळराय, फुलाला गेला जोगी
८
पहांटेच्या पारामंदी दानधर्माची वेळ झाली
राजा कर्णाला ओवी आली
९
पहांटेच्या पारामंदी कां देवा येतां जातां ?
काळ्या कपिलेची धार काढून देते आतां
१०
पहांटेच्या पारामंदी उघडा दरवाजा
गस्त घालितो बाळराजा
११
दिस उगवला वाडयाच्या एका कोनी
नेत्र उघड राजा दोन्ही
१२
सकाळी उठून हात जोडीते अंगनाला
सूर्य डोलतो गगनाला
१३
सकाळच्या पारी कृस्नाबाईला आरती
ओवाळीते रामचंदराची मूर्ती
१४
सकाळी उठून सहज गेले बाहेरी
दृष्टीस पडली पांडुरंगाची पायरी
१५
सकाळीं उठून मला येशीकडे जाणं
मारुतीरायाची लालाची भेट घेणं
१६
सकाळी उठून येशींत कोन उभा
मारुतीराय माझा, ल्याया शेंदरी झगा
१७
सकाळी उठून तुळशीबाईचा संग केला
हळदकुकवाचा तिथं करंडा सापडला
१८
सकाळी उठून तुळसीपाशी जाते नीट
हळदकुकवानं तिनं भरीली माझी मूठ
१९
सकाळी उठून लोटते पिंढ दारी
तुळसीपाशी गोविंददेवाची येरझारी
२०
दिस उगवला, अंगनी पैसावला
हळकुकवाचा म्यां पदर पसरला
२१
सुर्ये उगवला उगवतांना लालीलाल
शिरी सोन्याचं जाऊळ
२२
दिस उगवला उगवुनी आला वर
हळदीकुकवाची पूजा, घेतो तुळसीबरुबर
२३
दिस उगवला उगवतांना पानी पडे
गंध लेतांना तेज चढे
२४
सकाळच्या पारी, हात माझा देताघेता
पिता दौलतीची, कन्या मी भाग्यवन्त्ता
२५
दिस उगवला केळीच्या कोक्यांत
माझी बाळाबाई उभी मामाच्या सोप्यांत
२६
सकाळी उठून गोसावी अलकंला
पिठ माझ्या शिलकंला
२७
जाते देवाच्या पूजेला, दुपार कलली
जाई तबकी फुलली !
२८
थोरलं माझं घर काम करीते ईळभर
कपाळीचं कुकु न्हाई सुकलं तीळभर !
२९
तिन्हीसांजा झाल्या जात्या तुझी घिरघिर
माझं करंगल्याचं घर
३०
तिन्हीसांजा झाल्या दिवा लावीन तुपाचा
उजेड पडला देवाच्या रूपाचा
३१
तिन्हीसांजा झाल्या कां देवा केलं येनं
दुधा घातलं विरजण
३२
देव नारायना अस्ताला तुं जाशी
मनामंदी माझी याद राहूं देशी
३३
गुज बोलतांना गुजाला आली गोडी
रात मध्यान उरली थोडी
३४
मध्यानरात्र झाली, चांद माळीच्या खाली गेला
देव माधवजी गुजा आला !