महाराजांनी या कोकण दौऱ्यात चिपळूणजवळ श्रीपरशुरामाचे दर्शन घेतले। मुक्काम केला. पूजाअर्चा झाल्या. विपुल दानधर्म केला. याच श्रीपरशुरामावर यापूर्वी हाबश्यांचे हल्ले होत होते. आता हे स्थान निर्धास्त झाले. (मार्च अखेर १६६१ ) अधूनमधून महाराज अशा धर्मकार्यात उपस्थित राहून आनंद लुटीत. पण ते उत्सवबाज नव्हते. यानंतर पाचच महिन्यांनी महाराजांनी प्रतापगडावर श्रीभवानी देवीची स्थापना केली. हा स्थापनेचा कार्यक्रम मोरोपंत पिंगळे यांच्याहस्ते झाला.

देऊळ छोटे , साधे पण रेखीव केले. श्रीभवानीच्या पूजाअचेर्ची छान पण साधीसुधी व्यवस्था त्यांनी लावून दिली. या श्रीस्थापनेच्या कार्यक्रमाला महाराज स्वत: उपस्थित नसावेत की काय अशी शंका येते. कारण त्या तपशीलांत तसा उल्लेख नाही. ‘ मी उपस्थित असल्याशिवाय हा उद्घाटनाचा कार्यक्रम करू नये ‘ असा महाराजांचा कधीही हट्ट नसे! महाराजांच्या जीवनात मीपणाला महत्त्व नव्हते. म्हणून स्वराज्यातील भूमीपूजने , कोनशीला आणि उद्घाटने कधी कुठे खोळांबलेली दिसत नाहीत!

विसरायला नको , म्हणून आत्ताच सांगतो. प्रतापगडावर देवीच्या पूजाअचेर्ची सर्व व्यवस्था महाराजांनी यथासांग नेमून दिली. वेदमूतीर् विश्वनाथभट्ट हडप यांचेकडे पूजाअर्चा सोपविली. त्यांना लिहिलेल्या पत्रातील महाराजांचे एक वाक्य लक्षात घेण्यासारखे आहे. ‘…………… श्रींची ‘ नित्यनैमित्तिक पूजाअर्चा आणि कायेर् यथासांग करावीत. (गडावरील) अन्य कोणत्याही कारभारात लक्ष घालू नये ‘

महाराजांच्या या सूचक शब्दांवर अधिक भाष्य करण्याची जरुर आहे का ?

महाराज या कोकणस्वारीत थेट राजापुरावर धडकले। त्यांचा सारा रोख होता राजापुरातील ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीवर तेथील उपद्व्यापी अकरा इंग्रजांवर हेन्री रिव्हींग्टन हा या अकरांचा प्रमुख अधिकारी होता. गिफर्ड , डेनियल , इमॅन्युएल , रिसर्चस , रेडॉल्फ टेलर इत्यादी बाकीचे होते. इंग्रज म्हटलं की तो महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच पाताळयंत्री राजकारणी असायचाच. हेही अन् विशेषत: हेन्री तसाच होता. पन्हाळ्यात सिद्दी जौहरने वेढा घातला. ( इ. स. १६६० , ५ मार्च ते पुढे) तेव्हा या हेन्रीने आपल्याबरोबर सर्व इंग्रजांना घेऊन इंग्रजी मोठ्या तोफा जौहरच्या मदतीसाठी पन्हाळ्यास नेल्या होत्या. स्वत: तो इंग्रजी झेंडे लावून आणि बँड वाजवीत पन्हाळ्यावर तोफा डागीत होता. पूवीर् महाराजांशी केलेला ‘ मैत्रीचा करार ‘ मोडून इंग्रज हा उपद्व्याप करीत होते.

शिवाजीराजाचा जौहरच्या हातून आणि पुण्यास येऊन बसलेल्या शाहिस्तेखानाच्या हातून पूर्ण नाश होणार आहे. असा या इंग्रजांना साक्षात्कार झाला असावा. म्हणून महाराजांशी केलेला करार मोडून हे इंग्रज जौहरच्या मदतीला आले होते. कारण जौहरला जय मिळणार अन् पुढे आदिलशाहकडून आपल्या ईस्ट इंडिया कंपणीला सवलती आणि जागा व्यापाारसाठी मिळणार ही यांना खात्री वाटत होती.

पण झाले उलटेच. जौहरचा पराभव झाला. इंग्रजांना धड दारूगोळ्याचे आणि खर्चाचे पैसेही मिळाले नाहीत. कसेबसे तोंड लपवित , पळून हे लोक पन्हाळ्याहून राजापुरास आले होते.

यांचाच काटा काढण्यासाठी महाराज आता राजापुरावर येत होते. हे इंग्रज इतके विलक्षण राजकारणी होते म्हणजेच ( निब्बर निर्लज्ज होते) की , मराठा राजा शिवाजी राजापुरावर येतोय हे समजताच जणू काही आपण महाराजांच्या स्वागत समितीचे अध्यक्ष आणि सदस्य आहोत अशा थाटात महाराजांच्या स्वागतासाठी राजापुराबाहेर सामोरे आले. पुढे आले. महाराजांनी पाहिले आणि त्यांनी मोरोपंत पिंगळ्यांना हुकुम केला.

‘ या टोपीकरांना गिरफ्तार करा. ताबडतोब आणि यांची येथील राजापुरची वखार जप्त करा. आणि कुदळी लावून खणून काढा.

‘ इंग्रजांना बोलायला जागाच नव्हती. जसल्याला तसलंच थेटलं म्हणजे बरं असतं. हे इंग्रज व्याघ्रगडच्या कैदेत डांबले गेले.

राजापुरच्या या छाप्यात महाराजांना धनदौलत खूप मिळाली. पण एक अमोल नररत्न त्यांना गवसले. त्याचे नाव बाळाजी आवजी चित्रे. हिरे , मोती , सोनं याची गरज होती. पण महाराजांची सर्वात आवडती लाडकी संपत्ती म्हणजे त्यांचे जिवलग. एकेक माणूस ते स्थमंतकाहूनही अधिक प्रेमाने हृदयाशी जपत होते. आपल्या मित्रांविषयी त्यांनी वेळोवेळी काढलेले उद्गार मधासारखे ओथंबलेले आढळतात.

महाराजांची संघटन भूक बकासुराहूनही मोठी होती. ते माणसं मिळवीत होते. त्यामुळे मुलुख आणि गडकोट आपोआपच मिळत होते. या बाबतीत महाराजांच्या पाठीशी उभी होती त्यांची आई , जिजाऊसाहेब , तिचं प्रेम महाराजांवर जेवढं होतं , तेवढंच साऱ्या मराठ्यांवर होतं. अपार , कितीतरी उदाहरणं आहेत. जिजाऊसाहेबांचं आईपण जुन्या कागदपत्रांत सापडतं. पण त्यातल्या दोन ओळींच्या मधल्या कोऱ्या जागेत बिन शब्दांनी लिहिलेलं अधिक सापडते. ते वाचण्यासाठी पर्ल बकच. मॅक्झिन गाकीर्चं आणि साने गुरुजींचं मायाळू मनच हवं. पायाळू माणसालाच जमिनीखाली लपलेलं पाणी सापडतं. या मायाळूंचंही तसंच होतं.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel