महाराजांची नजर कैद सुरू झाली. तीनशे मावळ्यांच्या मराठी छावणीलाही सैनिकांचा गराडा होता. महाराज , शेजारीच असलेल्या रामसिंगच्या निवासस्थानी या कैदेतूनही जात येत होते. त्यावरही फुलादखानचा पहारा होता. म्हणजेच पळून जाणे संभवतच नव्हते. महाराज चिंतेत पिचून निघत होते. रामसिंग तर दु:खी आणि अगतिक होता. शिवाय त्याच्या डोक्यावर राजपुताचा शब्द म्हणून महाराजांच्या सुरक्षिततेची तुळशीबेलाची पाने हेलावत होती. एकेक क्षण दिवसा दिवसासारखा जड जात होता. महाराजांच्या दोन वकीलांना मात्र छावणीबाहेर कोणाच्या भेटीगाठी किंवा (गुप्त राजकीय कामेधामे) यासाठी जाता येत असे. वकील या नात्याने त्यांना मोकळीक होती. रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर हे ते वकील.

एकूण या कैद प्रकरणामुळे या वकीलांची आणि महाराजांच्या गुप्त हेरांची जबाबदारी पणाला लागत होती. छावणीतील वातावरण अतिशय गंभीर आणि चिंताक्रांत होते. आत्ता शिवाजीमहाराजांना बेमालूमरित्या कसे ठार मारायचे याचा विचार बादशाहाच्या डोक्यात चालू होता. आता हा सीवा पळून तर जाऊच शकणार नाही अन् घातपाती राजकारणं करूच शकणार नाही याची खात्री बादशाहाला होती. कारण रामसिंगाने जामीनपत्र दिलेले होते आणि फुलादखानचा कडक पहारा होता. शाही सरदारांचे पूवीर्प्रमाणे रोजचे ‘ शिवाजीदर्शन ‘ या कैदेतही चालूच होते. महाराज त्यांच्याशी पूवीर्प्रमाणे छान छान सात्त्विक भाषेत बिनराजकारणी विषय बोलत होते.

महाराज कैदेत पडले आहेत हे दक्षिणेत राजगडावर जिजाऊसाहेबांना समजलेच. त्यांची व्याकुळता कशी सांगावी ? अखेर त्या आई होत्या. मिर्झाराजा जयसिंहालासुद्धा हा औरंगजेबी कावा आणि राजांची कैद समजलीच. ते ही तेवढेच दु:खी झाले. त्यांचे राजकारण आणि अंत:करण करचळून गेले. औरंगजेबाला आपल्या पदरच्या शहाण्या माणसांचीही किंमत कधीच कळली नाही. मिर्झाराजांनी रामसिंगला गुप्त पत्राने कळविले की , ‘ दक्ष राहा. आपला शब्द शिवाजीराजांना तुळसीबेलासह आपण दिला आहे. ‘ मिर्झाराजांनी ओरंगजेबाला एक सूचक पत्र पाठविलेले उपलब्ध आहे. त्यात त्याने म्हटले आहे की , ‘ शिवाजीराजांना कैदेत ठेवल्यामुळे दक्षिणेतील त्याच्या राज्य कारभारावर कोणताही परिणाम झालेला नाही. (त्याची आई) इतका चोख राज्यकारभार करीत आहे की , त्यात सुई शिरकवावयासही जागा नाही.

आग्ऱ्यात कैदेचे दिवस मुंगीच्या गतीने उलटत होते. या काळात महाराजांनी औरंगजेबास काही पत्रे पाठविली. त्याचा सारांश असा की , मी आता बादशाहांच्या हुकुमाप्रमाणे बादशाहांची सेवा करणार आहे. पण या साऱ्या पत्रांना औरंगजेबाने थोडासुद्धा अनुकूल प्रतिसाद दिला नाही. त्याच्या डोक्यात एक वेगळीच कारस्थानी भट्टी पेटली होती. शिवाजीराजांना कसं आणि केव्हा कोंडून ठार मारायचं याचा विचार तो करीत होता. अन् या भयंकर मगरममिठीतून कसं आणि केव्हा सुटायचं याचा महाराज विचार करीत होते.

एके दिवशी तेजसिंह कछवा हा महाराजांशी बोलत बसला होता. हा तेजसिंह म्हणजे राजगड ते आग्रा या प्रवासात महाराजांच्या बरोबर असलेला मिर्झाराजांचा एक राजकीय सहकारी. महाराज तेजसिंहाला म्हणाले.

‘ मिर्झाराजांना बादशाहांचा स्वभाव माहित नव्हता का ? मग त्यांनी अशा भयंकर माणसाच्या विश्वासाची ग्वाही मला देऊन या कैदेच्या संकटात कशाला आणून टाकलं ? आता माझ्यावर केवढा कठीण प्रसंग आला आहे. ‘

महाराजांच्या या उद्गारावर तेजसिंह म्हणाला , ‘ आमचे दरबार (मिर्झाराजे) फक्त उदयराज मुन्शीचाच सल्ला घेतात आणि ऐकतात. इतर कोणाचेच ऐकत नाहीत. ‘ महाराजांचा स्वभाव नेमका वेगळा होता. ते त्यानुसार स्वत:चा निर्णय ठरवीत असत.

औरंगजेब कोणाचाही सल्ला घेत नव्हता. कुणी सल्ला दिलाच तरी स्वत:चाच निर्णय तो ठरवीत असे. अशीही त्यावेळची राजकारणातली यादी होती.

महाराजांच्या भोवती मावळे होते. महाराज शामियान्यात राहत होते. रामसिंगांचे मन कसे होते पाहा! त्याला महाराजांची अतिशय काळजी वाटायची. त्याने एकेदिवशी आपले सुमारे एकोणतीस अत्यंत विश्वासू आणि शूर लोक महाराजांच्या शामियान्याच्या भोवती रात्रंदिवस पहाऱ्यास ठेवले. याला म्हणतात पलंगपहारा. न जागो याही परिस्थितीत बादशाहाने एकदम महाराजांवर काही घातपाती हल्ला घातला , तर कडवा प्रतिकार करण्यासाठी आपली माणसं असावीत ही रामसिंगाची इच्छा.

बादशाहाकडे फुलादखानाने तक्रार कळविली की , ‘ माझा येथे कडक पहारा असतानाही या रामसिंहाने मला न विचारता आपली माणसे सीवाच्या शामियान्याभोवती पहाऱ्यावर नेमली आहेत. हुजूरनी याची दखल घ्यावी. ‘

यावर बादशाहाने रामसिंहाला बोलावून जाब विचारला. तेव्हा रामसिंह म्हणाला , ‘ हुजूर , शिवाजीराजांच्या बाबतीत आपण माझ्याकडून जमानपत्र लिहून घेतले आहे. म्हणून शिवाजीने निसटण्याचा प्रयत्न करू नये आणि घातपाती कोणतेही कृत्य करू नये म्हणून मी दक्षतेसाठी माझाही पहारा त्याच्यावर ठेवला आहे. ‘ बादशाहाला हे एकदम पटले. अंदर की बात त्याला कळलीच नाही.

औरंगजेबाच्या मनातील कुटील आराखडा निश्चित झाला. त्याने कोणापाशीही अक्षराने वाच्यता न करता ठरविली की या अशा पद्धतीने सीवाचा बिखो बुनियाद काटा काढायचा.

- बाबासाहेब पुरंदरे

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel