माणसाला फुकट मिळालं की त्याची किंमत कळत नाही. त्याचा बाजारभाव समजतो , तसंच उपयोग आणि उपभोगही समजतो. पण महत्त्व आणि पावित्र्य समजत नाही. हिंदवी स्वराज्य असे नव्हतेच. कमालीच्या त्यागाने आणि अविश्रांत कष्टाने ते मिळविले गेले होते. मिळवणारी मावळी मंडळी अगदी साधी आणि सामान्य होती. पण त्यांचे मन हनुमंतासारखे होते. छाती फाडली , तर त्यात त्यांचा राजा , राज्य आणि ध्वजच दिसावा. एकेका घरातली एकेक माणसं इषेर्नं आणि हौसेनं कष्टत होती. मरत होती. अशीही असंख्य मावळी घरं होती की , त्या घरातील दोन-दोन किंवा तीन-तीन माणसं अशीच मरत होती. म्हणूनच एक अजिंक्य हिंदवी स्वराज्य एका राष्ट्रपुरुषाने उभे केले.
अजिंक्य स्वराज्य ? होय , अजिंक्य. महाराजांच्या मृत्यूनंतर एक कर्दनकाळ , औरंगजेब आपल्या सर्व सार्मथ्यानिशी हे स्वराज्य गिळायला महाराष्ट्रात उतरला. अखंड पंचवीस वषेर् तो इथे यमदूतासारखा राबत होता. काय झाले त्याचे ? हे स्वराज्य बुडाले का ? नाही. औरंगजेबच बुडाला. मोगली साम्राज्यही बुडण्याच्या मार्गाला लागले. हे कोणामुळे ? कोणाच्या शिकवणुकीमुळे ? हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीमुळेच ना! शिवचरित्रातून तेच शिकावयाचे आहे. नागपूर येथे धनवटे प्रासादावर शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा स्थापन करण्यात आला ; त्यावेळी पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले की , ‘ जगाच्या पाठीवर पारतंत्र्यात पडलेल्या एखाद्या राष्ट्राला स्वतंत्र व्हावयाचे असेल आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समर्थ व्हावयाचे असेल , तर त्या राष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवावा. ‘
हे अक्षरश: खरे आहे जीर्णशीर्ण स्थितीतून , गुलामगिरीतून आपले राष्ट्र स्वतंत्र झाले. ते बलाढ्य करावयाचे असेल , तर आदर्श असावा महाराजांचा.
सतत २७ – २८ वषेर् अविश्रांत श्रम आणि त्याग केल्यानंतरच राज्याभिषेकाचा विचार रायगडावर अंकुरला. या निमिर्तीच्या कालखंडात अत्यंत गरजेची कामे आणि प्रकल्प महाराजांनी हाती घेतलेले दिसतात. भव्य महाल किंवा उपभोगप्रधान अशा कोणत्याही वस्तू- वास्तू निमिर्तीकडे लक्षही दिले नाही. जीर्णशीर्ण अवस्थेतून मराठी मुलुख अति कष्टाने स्वतंत्र होत आहे , आता पहिल्या दोन पिढ्यांना तरी चंगळबाजीपासून हजार पावलं दूरच राहिलं पाहिजे , असा विचार महाराजांच्या कृतीत दिसून येतो. महाराज चंगळबाजीला शत्रूच मानत असावेत. ‘ आत्ता , या क्षणी स्वराज्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे ‘ हाच विचार त्यांच्या आचरणात दिसून येतो.
मग राज्याभिषेक करून घेणं , ही चंगळबाजी नव्हती का ? नव्हती. ते कर्तव्यच होते. सार्वभौमत्त्वाची ती महापूजा होती. त्या राज्याभिषेक सोहाळ्याचा परिणाम वर्तमान आणि भावी काळातील सर्व पिढ्यांवर प्रभावाने होणार होता. तो कोणा एका व्यक्तीच्या कौतुकाचा स्तुती सोहळा नव्हता. ते होते स्वातंत्र्याचे सामूहिक गौरवगान. इंदप्रस्थ , चितोड , देवगिरी , कर्णावती , वारंगळ , विजयनगर , द्वारसमुद , पाटलीपुत्र , गोपकपट्टण (गोवा) श्रीनगर आदि सर्व भारतीय स्वराज्यांच्या राजधान्यांवर बंडाची स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारी फुंकर या रायगडावरील राज्याभिषेकाने पडणार होती. पडावी अशी अपेक्षा होती. बुंदेलखंडातील भंगलेल्या सिंहासनावर आणि चेतलेल्या छत्रसालावर ही फुंकर आधीच पडलीही होती. बुंदलेखंडात एक नवे हिंदवी स्वराज्य आणि सिंहासन उदयाला आले होते.
सिंधू नदीच्या उगमापासून कावेरी नदीच्या पैलतीरापावेतो , म्हणजेच आसेतु हिमाचल हा संपूर्ण देश स्वतंत्र , सार्वभौम , बलशाली व्हावा हे मनोगत महाराजांनी स्वत:च बोलून दाखविले होते ना!
राज्याभिषेकाचा मुहूर्तही ठरला. शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ , शुद्ध त्रयोदशी , आनंदनाम संवत्सर , म्हणजेच ६ जून १६७४ . महाराज राज्याभिषिक्त छत्रपती होणार याच्या वार्ता हळुहळू सर्वत्र पोहोचू लागल्या.
याचवेळी घडलेली एक गंमत सांगतो. कॉस्म- द-गार्द या नावाचा एक पोर्तुगीज कोकणातून भूमार्गाने गोव्याकडे जात होता. त्याला या प्रवासात ही बातमी समजली. मार्गावरती तो एका खेड्याजवळच्या झाडीत विश्रांतीकरता उतरला. भोवतालची मराठी दहापाच खेडुत माणसे सहज गार्दच्या जवळ जमली. एक गोरा फिरंगी आपल्याला दिसतोय , एवढाच त्यात कुतूहलाचा भाग असावा. गार्दने त्या जमलेल्या लोकांना आपल्या मोडक्या तोडक्या भाषेत म्हटले की , ‘ तुमचा शिवाजीराजा लवकरच सिंहासनावर बसणार आहे , हे तुम्हाला माहिती आहे का ?’ ही गोड गोष्ट त्या खेडुतांना प्रथमच समजत होती. पण आपला राजा आता रामाप्रमाणे सिंहासनावर बसणार , एवढे त्यांना नक्कीच उमजले अन् ती माणसं विलक्षण आनंदली. ही एक सूचक कथा मराठी मनाचा कानोसा घेणारी नाही का ? साध्या भोळ्या खेड्यातील माणसांनाही हा राज्याभिषेकाचा आनंद समजला , जाणवला होता.
आपण सार्वभौम , स्वतंत्र स्वराज्याचे प्रजानन आहोत , राज्यकतेर्च आहोत , सेवक आहोत याची जाणीव प्रत्येक लहानमोठ्या वयाच्या माणसाला होण्याची आवश्यकता असतेच. प्रथम हेच कळावे. नंतर कळावे , राष्ट्र म्हणजे काय ? माझे राष्ट्रपती कोण आहेत. पंतप्रधान कोण. माझी राज्यघटना , माझी संसद , माझा राष्ट्रध्वज , माझे राष्ट्रगीत इत्यादी अष्टांग राष्ट्राचा परिचय यथासांग व्हावा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे अर्वाचीन भरतखंडाचा पहिला स्वातंत्र्यदिन.
-बाबासाहेब पुरंदरे