राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

अध्यात्मातील भक्तिमार्ग व ग्रामस्वराज्याची  संकल्पना यांची सुरेख सांगड घालणारे राष्ट्रसंत !

आपली वाणी आणि लेखणी, शक्ती आणि भक्ती यांचे सर्व सामर्थ्य एकवटून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामाजिक जागृतीचे आणि प्रगतीचे प्रयत्न सातत्याने केले. आपल्या देशातील झोपी गेलेली खेडी जागी व्हावीत, अज्ञान, लोकभ्रम आणि सामाजिक निष्क्रियता यांमुळे ग्रामीण जीवनाची झालेली दुर्दशा नाहीशी व्हावी, तिथल्या समाजाची सुधारणा व्हावी व सुखी जीवनाच्या दृष्टीने वाटचाल व्हावी, ग्रामस्थांच्या आयुष्यात चैतन्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी कार्य केले. सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने भाग्यशाली असलेला हा देश शिक्षण, आरोग्य आणि धनधान्य याही बाबतीत तितकाच वैभवशाली का नाही या विचाराने संत तुकडोजी महाराजांचे मन सदैव तळमळत असे.

यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला. बालपणीच्या काळातच त्यांनी श्री आडकोजी महाराजांचे शिष्यत्व पत्करून परमार्थ मार्गातील साधना करण्यात काही वर्षे व्यतित केली. ही साधना सुरू असतानाच त्यांनी लोकांना आध्यात्मिक उपदेश करण्याचे कार्य सुरू केले.सुरुवातीच्या काळात नुसत्या ईश्र्वरभजनावरच त्यांचा भर असे. महात्मा गांधींच्या युगापासून त्यांनी ईशभजनाला गावांमधील सामाजिक सुधारणेचीही जोड दिली. त्यांनी भजनाचा उपयोग मानवाच्या सर्वांगीण उद्धारासाठीच केला .

मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव ;  देव बाजारचा भाजीपाला नाही रे .

अशी भजने म्हणत त्यांनी सामूहिक भजनपद्धती विकसित केली. त्यांनी खंजिरी या वाद्याचा खूबीने वापर केला. त्यांच्यामुळेच ह्या वाद्याला प्रसिद्धी मिळाली.  

गावोगावी फिरून नुसती भजने करून ते थांबले नाहीत, आपल्या भूमिकेचा व विचारांचा प्रचार करण्यासाठी श्रीगुरुदेव हे मासिक काढून त्यांनी ते कित्येक वर्षे व्यवस्थित चालविले. वर्‍हाडातील मोझरी या गावी गुरुकुंज आश्रम सुरू केला. आजही त्या परिसरात त्याच्या शाखा-उपशाखा काम करत आहेत. विदर्भ भागात त्यांच्या अनुयायांची संख्या मोठी आहे. तुकडोजी महाराजांचा स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. आष्टी-चिमूर आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले होते. १९४२ च्या चळवळीत ते सुमारे १०० दिवस कैदेत होते.

ग्रामसफाई, सूतकताई, दवाखाने, शाळा, प्रार्थना या व इतर अनेक माध्यमातून त्यांनी ठिकठिकाणी खेड्यांना शिस्तीचे व समाजसेवेचे वळण लावले. या कार्यात त्यांनी आपल्या आयुष्याची दोन तपेच जणू समाजला अर्पण केली. त्या काळातच प्रकृती बरी नसताना त्यांनी जपानमध्ये भरलेल्या विश्र्वधर्म परिषदेत जाऊन मानवताधर्माबाबतचे आपले विचार मांडले. त्यांच्या कार्याचा आवाका पाहून तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद थक्क झाले व त्यांनी उत्स्फूर्तपणे तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली.

लौकिक शिक्षण कमी झालेले असूनही तुकडोजींनी मराठी व हिंदी भाषेत ग्रंथरचना केली आहे. खेड्यांबाबतचे आपले सैद्धांतिक विचार मांडण्यासाठीच त्यांनी ग्रामगीता हा मार्गदर्शनपर ग्रंथ लिहिला. या आधुनिक गीतेचे ४१ अध्याय आहेत. गावांची संपूर्ण सुधारणा करण्यासाठी ग्रामीण जीवनातील सर्वच बाजूंचा विचार ग्रामगीतेमध्ये आला आहे. हा ग्रंथ ८ पंचकांमध्ये विभागला असून ती पंचके ग्रामजीवनातील महत्त्वाच्या पैलूंवर आधारित आहेत. ती पुढीलप्रमाणे...

१. सद्धर्म मंथन पंचक                    २. लोकवशीकरण पंचक            ३. ग्रामनिर्माण पंचक  

४. दृष्टीपरिवर्तन पंचक                   ५. संस्कारसंशोधन पंचक          ६. प्रेमधर्मस्थापन पंचक    

७. देवत्वसाधन पंचक                    ८. आदर्श जीवन पंचक  

खेड्यातील मुलाचा जन्म झाल्यापासून त्याचे शिक्षण, त्याचे वैवाहिक जीवन, त्याचे सामाजिक जीवन याच्या सर्व कक्षांचा विचार व त्यासाठीचे सैद्धांतिक विचार त्यांनी ग्रामगीता या ग्रंथात मांडले आहेत. ही गीता लिहिण्यामागे नवीन युगास पूरक असा नवयुगधर्म-प्रेमधर्म लोकांना शिकवावा हा उद्देश होता. श्री संत तुकडोजी महाराजांनी हा ग्रंथ लिहून ग्रामसुधारणेच्या कार्यात मोठे योगदान दिले. खेडी स्वयंपूर्ण घटक बनून भारत देश वैभवसंपन्न होण्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा व ग्रंथांचा उपयोग निश्र्चितच होणार आहे.

बहुतेक वेळा स्थितीशील असणारी सत्प्रवृत्ती समाजसेवेच्या माध्यमातून गतिशील करणार्‍या राष्ट्रसंत तुकडोजींची  समाधी मोझरी (अमरावती जिल्हा) येथील गुरुकुंज आश्रमाजवळ आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel