खाशाबा जाधव

वैयक्तिक क्रीडाप्रकारात, त्यातूनही कुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळात ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवणारे जिगरबाज मल्ल!

 

स्वतंत्र भारताचे नाव ऑलिम्पिकच्या तक्त्यावर (वैयक्तिक क्रीडाप्रकारात) प्रथम कोरणारे कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब उर्फ के. डी. जाधव यांचा जन्म कराड तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्र्वर या छोट्या खेड्यात झाला.

त्यांचे शालेय शिक्षण कराडच्या टिळक हायस्कूल मध्ये १९४०-४७ या दरम्यान झाले. त्यांचे आजोबा नानासाहेब हे उत्तम कुस्तीपटू असल्याने घरातील वातावरणही कुस्तीमय होते. शालेय जीवनातच त्यांनी कुस्तीबरोबरच भारोत्तोलन(वेटलिफ्टिंग), जलतरण, धावणे, जिम्नॅस्टिक, मल्लखांब आदी खेळांतही यश मिळविले होते.

वडील दादासाहेब हे कुस्तीचे प्रशिक्षक असल्याने त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून वडिलांकडून मिळू लागले. घरची परिस्थिती बेताचीच होती. साधा,शांत,विनम्र,मितभाषी व कोणत्याही गोष्टीची तक्रार न करण्याचा आईचा स्वभाव त्यांच्या अंगी उतरला होता.

गावागावांत भरणार्‍या उरुस, जत्रांमध्ये कुस्तीचे फड पाहण्यासाठी ते वडिलांबरोबर जात. एप्रिल, १९३४ मध्ये रेठरे गावात भरलेल्या कुस्ती स्पर्धेत अवघ्या दोन मिनिटांतच प्रतिस्पर्धी मल्लास चीत करून वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी पहिली कुस्ती जिंकली. कुस्तीचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांना टिळक विद्यालयामध्ये मिळाले. मोठे कुस्तीपटू बनायचे हा निर्धारही त्यांनी तेव्हाच केला. कुस्तीबरोबरच शिक्षणातही त्यांनी अव्वल स्थान राखले होते. टिळक विद्यालयात खाशाबांना बाबुराव वळवडे व बेलापुरे गुरूजींनी कुस्तीविषयक मार्गदर्शन केले होते.

दरम्यान १९४२ च्या चलेजाव आंदोलनातही ते काही काळाकरिता सहभागी झाले. भूमिगतांना वसतिगृहातील आपल्या खोलीत लपवणे; ब्रिटिशविरोधी पत्रके वाटणे ही कामे त्यांनी केली.  

१९४८ ते १९५४ या काळात कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या कुस्तीच्या कारकीर्दीला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. आपल्या अफाट कुस्ती कौशल्याने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेप्रमाणेच आंतरविद्यापीठ स्पर्धेतहीत्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. जिद्दीने व चिकाटीने त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही विजेतेपद मिळविले. त्यायोगे ते ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरले. १५ ऑगस्ट, १९४७ या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनीच भारताचा तिरंगा ऑलिंपिकमध्ये फडकविण्याचा निश्चय त्यांनी केला.

त्या काळी खेळाचे व्यावसायिकीकरण झालेले नसल्याने पुरस्कर्ते ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. तसेच खेळ,देशासाठी पदक यांबाबत शासन, तत्कालीन लोक आग्रही नव्हते, जागरुक नव्हते. त्यामुळे ऑलिंपिकला स्वखर्चाने जाण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मित्र, कुस्तीप्रेमी शिक्षक, टिळक हायस्कूलचे विद्यार्थी, गोळेश्र्वर गावातील लोक व कोल्हापूरचे छत्रपती यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून त्यांनी ऑलिंपिकला जाण्यासाठी रक्कम उभी केली.१९४८ व १९५२ या दोन्ही स्पर्धांत सहभागी होण्यासाठी त्यांनी स्वत: घरोघरी जाऊन पैसे गोळा केले होते.१९५२ मध्ये तत्कालीन सरकारनेही खाशाबांना विशेष सहकार्य केले नव्हते. या प्रतिकूल परिस्थितीतही कुस्तीची तयारी, मॅटवरील सराव करणे, परदेशी जाण्यासाठीच्या प्रशासकीय पूर्तता करणे, त्यांना ऑलिंपिकला पाठवण्यास विरोध करणार्‍या यंत्रणांचा-घटकांचा विरोध मोडून काढणे आणि शिवाय निधी गोळा करणे - अशा अनेक आघाड्यांवर खाशाबा लढत होते.

१९४८ च्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन मल्लाला पहिल्या काही मिनिटांतच चीतपट करून प्रेक्षकांना त्यांनी अचंबित केले आणि ५२ किलो फ्लायवेट गटात सहावे स्थान मिळविले. वैयक्तिक क्रीडाप्रकारात ऑलिंपिकमध्ये १९४८ पर्यंत इतक्या वरचा क्रमांक मिळविणारे ते पहिले भारतीय क्रीडापटू ठरले. संपूर्ण देशात मॅटवरची कुस्ती माहीत नसताना त्यांनी मॅटवर हे यश मिळवले हे विशेष ! या कामी त्यांना त्यांचे गुरू,राजाराम महाविद्यालयातील प्राध्यापक गोविंद पुरंदरे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.

लंडन ऑलिंपिक स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागूनही निराश न होता पुढील हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेसाठी खाशाबांनी जय्यत तयारी सुरू केली. हेलसिंकीमध्ये खाशाबा १२५ पौंड बॅटमवेट गटात सहभागी झाले होते. या गटात २४ देशांतील मल्लानी भाग घेतला होता. कॅनडा, मेक्सिको, जर्मनी या देशांच्या मल्लाचा पराभव करत, अखेर २३ जुलै, १९५२ रोजी या स्पर्धेत त्यांनी भारताला पहिले कास्यपदक मिळवून दिले, एक अभूतपूर्व इतिहास घडवला. भारतीय क्रीडा-इतिहासात ऑलिंपिकमध्ये अजोड कामगिरी करणारे खाशाबा जाधव हे पहिलेच ऑलिंपिकवीर ठरले.(याच स्पर्धेत वेगळ्या वजन-गटात खाशाबांचे सहकारी कृष्णराव माणगावे सहभागी झाले होते.यांचेही कास्यपदक अवघ्या एका गुणाने हुकले होते.)

ऑगस्ट, १९५२ मध्ये मायदेशी परतल्यावर; गोळेश्र्वर, कराड व कोल्हापूर येथील लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. १०१ बैल जोडलेल्या गाडीतून त्यांची जंगी मिरवणूक कराड ते गोळेश्र्वर या मार्गावर काढण्यात आली. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच कोल्हापुरातील सर्व तालमींनी एकत्र येऊन त्यांचा व कृष्णराव माणगावे यांचाही मिरवणुकीसह गौरव केला.

कोल्हापुरातील शहाजी लॉ महाविद्यालयाचे प्राचार्य दाभोळकर यांनी खाशाबांना ऑलिंपिकला जाण्याकरीता सहकार्य करण्यासाठी स्वत:चा बंगला गहाण टाकला होता. खाशाबा हे उपकार विसरले नाहीत. यशस्वी होऊन परतल्यानंतर त्यांनी कुस्त्यांची दंगल (स्पर्धा) भरवली. कोल्हापूरच्या खासबाग मैदानातील दंगलीत त्यांनी स्वत: बर्‍याच कुस्त्या जिंकून बक्षिसाची रक्कम मिळवली. हीच रक्कम त्यांनी प्रा. दाभोळकरांना (ते पैसे घेण्यास तयार नसताना) आग्रहाने बंगला सोडवण्यासाठी दिली. हा प्रसंग सचोटी, खेळावरची निष्ठा, सहकार्याची भावना व प्रामाणिकपणा या मूल्यांवर प्रकाश टाकतो, तसेच तत्कालीन व्यवस्थेवरही प्रकाश टाकतो.

१९५३ मध्ये जपानी मल्ल भारताच्या दौर्‍यावर आले होते. या वेळी झालेल्या कुस्त्यांत खाशाबांनी युनोमोरी या जागतिक विजेत्या जपानी मल्लाचा चितपट करून पराभव केला आणि आपली विजयी घोडदौड कायम राखली.

पुढे १९५५ मध्ये ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले. पोलीस खात्याच्या अनेक क्रीडास्पर्धा त्यांनी गाजवल्या. राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक म्हणूनही भूमिका बजावली. १९८२ च्या दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांना क्रीडाज्योत थोडा वेळ हाती घेऊन वाहण्याचा सन्मान मिळाला. पण त्यांच्या परक्रमाचे महत्त्व समजून त्यांना मानसन्मान दिला गेला नाही एवढे नक्की. त्यांनी सुमारे २७ वर्षे पोलीस दलात नोकरी केली. साहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून, मुंबईतून ते निवृत्त झाले. अतिशय प्रामाणिकपणे नोकरी केलेल्या खाशाबांना आपले निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. ‘पहिल्या ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूला अशी वागणूक’ हे आपल्या व्यवस्थेचे दुर्दैव होय! एक-दोन संस्थांनी मात्र त्यांना पुरस्कार दिले, शासनाने त्यांना मरणोत्तर पुरस्कार दिले.

फाय फाउंडेशन जीवन गौरव पुरस्कार (मार्च, १९८३) , १९९० साली मेघनाथ नागेश्वर पुरस्कार(मरणोत्तर), १९९३ साली शिवछत्रपती पुरस्कार(मरणोत्तर), २००१ मध्ये केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार (मरणोत्तर) या पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले. खाशाबांच्या विजयाची आठवण म्हणून कोल्हापूरला ‘विजयी मल्लाचे’ एक शिल्प घडवण्यात आले. १९६० मध्ये हे शिल्प कोल्हापूरच्या भवानी मंडपात स्थापन करण्यात आले. या शिल्पासह गोळेश्र्वर गावातील एका तालमीच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. वैयक्तिक क्रीडाप्रकारात ऑलिंपिक पदकाच्या इतिहासाचा भारतासाठी श्रीगणेशा करणार्‍या या ऑलिंपिकवीराचे कराड येथे अपघाती निधन झाले. ऑलिंपिकमध्ये भारताला वैयक्तिक क्रीडाप्रकारात पुढील पदक मिळण्यास सुमारे ५० वर्षे जावी लागली व कुस्तीत पदक मिळवण्यासाठी ५६ (१४ स्पर्धा) वर्षे जावी लागली, यावरून खडतर परिस्थितीतही खाशाबांनी मिळवलेल्या पदकाचे महत्त्व लक्षात येते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel