डॉ. रघुनाथ माशेलकर

भारतात वैज्ञानिक संशोधन संस्थांचे जाळे निर्माण करणारे कुशल संघटक आणि

पेटंटचे महत्त्व अधोरेखित करणारे देशभक्त - शास्त्रज्ञ!

भारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉ.रघुनाथ माशेलकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे महत्कार्य केले आहे.

माशेल (गोवा) येथे रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म झाला. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. गिरगांव चौपाटीवर सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करून त्यांनी अनेक शिष्यवृत्ती मिळवल्या. १९६६ मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली.काही काळ युनिव्हर्सिटी ऑफ सॅलफोर्ड (लंडन) येथे व्याख्याता म्हणून काम केले. पुढे त्यांनी डेन्मार्कमधील एका विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले.

त्यानंतर, अमेरिकेतील डेलावेअर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांची पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटोरी - एन.सी.एल. (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) येथे संचालक म्हणून नेमणूक झाली. डॉ. माशेलकरांनी या प्रयोगशाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय शास्त्रज्ञांचे अनेक शोध अमेरिका व युरोपमध्ये निर्यात होत आहेत. पॉलिमर सायन्स व अभियांत्रिकी ही त्यांची अभ्यासाची अन् संशोधनाची क्षेत्रे होत.

सेंटर फॉर सायंटिफीक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (CSIR) चे महासंचालक झाल्यानंतर त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून देशाची प्रगती ह्या सूत्रावर भर दिला. या संस्थेच्या अनेक शाखा त्यांनी कार्यान्वित केल्या, तसेच या माध्यमातून त्यांनी असंख्य संशोधक तयार केले. बौद्धिक ज्ञानसंपादनाच्या हक्काविषयीचे (पेटंट) धोरण याबाबत त्यांचे योगदान मोठे आहे.  ‘Patent or Perish’ असा इशाराच त्यांनी दिला होता.  हळद, बासमती व कडुलिंब यांच्या पेटन्ट्सबाबतचा लढा यशस्वीपणे लढून त्यांनी अमेरिकेकडून ही पेटन्ट्स परत मिळवली.  ‘व्यवसायाभिमुख संशोधन’ या तत्त्वाचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ‘ज्ञान ही संपत्ती आहे ,तसेच ज्ञानातून  संपत्ती निर्माण होते’, म्हणून ते ज्ञान व संशोधन कायदेशीररीत्या सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे ही त्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली आहे. डॉ. माशेलकर यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांची सुमारे २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

डॉ. माशेलकर यांना पन्नासहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पद्मभूषण, पद्मश्री तसेच शांतीस्वरूप भटनागर मेडल, मटेरिअल सायंटिस्ट ऑफ दी इयर, पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय विज्ञान परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदर्शनी ग्लोबल अॅवॉर्ड हे त्यांपैकी काही होत. तसेच लंडन येथील जगद्विख्यात रॉयल सोसायटी लंडनची फेलोशिपही त्यांना १९९८ मध्ये मिळाली.

अतिशय कष्टाने, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत विज्ञान व संशोधन क्षेत्रातील अत्युच्च पदे डॉ. माशेलकरांनी यशस्वीपणे भूषविली आहेत. आजही ते कष्ट करण्याची क्षमता, शिस्त, बुद्धिमत्ता, संशोधक वृत्ती, नेतृत्वगुण व प्रखर देशनिष्ठा या आपल्या गुणांसह- विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel