शंतनुराव किर्लोस्कर

आधुनिक उद्योजक संस्कृतीचे प्रवर्तक व किर्लोस्कर उद्योगसमूहासह महाराष्ट्राचा औद्यागिक विकास साधणारे उद्योगमहर्षी!

१९२५-२६ दरम्यान एक महाराष्ट्रीयन तरुण मॅसेच्युसेट येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. त्याला परदेशामध्ये स्थायिक होण्यासाठी अनेक चांगल्या संधी उपलब्ध असतात. मात्र परदेशी जीवनाचे प्रलोभन समोर असतानाही तो तरुण आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट महाराष्ट्रातल्या गावात येतो, आणि वडिलांच्या छोट्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात करतो. तो तरुण म्हणजे शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर, आणि ते गाव म्हणजे किर्लोस्करवाडी.  हेच शंतनुराव पारतंत्र्यामुळे शतकभर मागे असलेला देश, कर्मापेक्षाही नशिबावर अधिक विश्र्वास असलेल्या लोकांचा तत्कालीन महाराष्ट्र - या परिस्थितीत प्रामुख्याने महाराष्ट्रात उद्योजकतेचं रोपटं स्वत:च्या कष्टाने लावणारे महापुरुष बनले.

शेती व नोकरी या व्यतिरिक्त काही वेगळं उपजीविकेचं साधन असू शकतं आणि त्यातूनही समाजाची उन्नती होऊ शकते असा विचार करणेही त्या काळात धाडसाचे होते. अशा वातावरणात शंतनुरावांनी लोखंडी नांगर निर्माण करून विकण्याच्या कामास सुरुवात केली. किर्लोस्करवाडी या गावी १९०३ मध्ये जन्म झालेल्या आपल्या मुलाचे नाव लक्ष्मणरावांनी ‘शंतनु’ असे ठेवले. ‘शं तनोति इति शंतनु’ - ज्याच्या स्पर्शाने कल्याण होते तो शंतनु.

शेंगा फोडण्याच्या यंत्रापासून ते उसाचा रस काढण्याच्या चरकापर्यंतची यंत्रे; साखर निर्मिती यंत्रे, लेथ मशिन्स ते ऑईल इंजिन्सपर्यंत; इस्पितळांतील विशिष्ट फर्निचरपासून ते हॉटेल उद्योगांतील आवश्यक उपकरणांपर्यंत आणि बेअरिंग्जपासून ते फोर्जिंग उत्पादनांपर्यंत - अशा सर्व क्षेत्रांत, उत्पादनांना शंतनुरावांचा स्पर्श झाला आणि त्या- त्या क्षेत्राचे, क्षेत्रांत काम करणार्‍या लोकांचे कल्याणच झाले.

त्या काळात मराठी माणसाने समाजकारण, राजकारण, शिक्षण, कला (नाट्य, संगीत, चित्रपट) या क्षेत्रांत प्रगती साधली होती. मात्र मूळ मराठी माणसाने, महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात आघाडी घेऊन नाव कमावले आहे असे उदाहरण अस्तित्वात नव्हते. पण शंतनुरावांनी ही पोकळी भरून काढली. केवळ भरून काढली असे नव्हे, तर त्यांनी उद्योग-विकास साधत महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर ठळक केले. १९४६ मध्ये शंतनुरावांनी किर्लोस्कर इलेक्ट्रीक कंपनी व किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड या कंपन्याची अनुक्रमे बंगळूर व पुणे येथे स्थापना केली. पुढील काळात त्यांनी किर्लोस्कर न्युमॅटिक्स; किर्लोस्कर कमिन्स, किलोस्कर ट्रॅक्टर्स, किर्लोस्कर सिस्टिम्स याही उद्योगांची स्थापना केली, विस्तार केला. जगात जिथे जिथे शेती चालते, त्या प्रत्येक खंडात, असंख्य देशांत, किर्लोस्करांचे पंप, ऑईल इंजिन्स, शेती संयंत्रे आजही वापरली जातात. आज किर्लोस्कर समूहात २५ पेक्षा जास्त कंपन्या कार्यरत आहेत. हॅबुर्ग (प. जर्मनी), मनिला र्(फिलिपाईन्स), मलेशिया, मॉरिशस आदी देशांमध्येही किर्लोस्कर समूहाचा विस्तार झालेला आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात परदेशांत कारखाने स्थापन करण्याचे अनोखे धाडसशंतनुरावांनी केले होते. आजच्या ‘मर्जर’, ‘अॅक्विझिशनच्या’ जमान्यातला लोकांनाही या धाडसाबद्दल आश्र्चर्य वाटते.

पारंपरिक शेती करणार्‍या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना यंत्रांचा वापर शेतीमध्ये करण्यास सांगणे हे मोठे अवघड काम होते.शंतनुरावांनी केवळ यंत्रांचे उत्पादनच केले असे नाही, तर त्यांनी ‘उत्पादन वाढवणार्‍या यांत्रिक, आधुनिक शेतीचा प्रसार’ केला.बैलांपेक्षा ट्रॅक्टर्सचे नांगर जास्त कार्यक्षम आहेत, विदेशी ऑईल इंजिन्सच्या मोठ्या धुडापेक्षा छोटी, उभी किर्लोस्कर इंजिन्स अधिक उपयुक्त आहेत, या गोष्टींचा शंतनुरावांनी प्रचार केला. तसेच शेंगा काढण्याचे यंत्र, उसाचा चरक आदींचाही त्यांनी प्रचार केला. यांत्रिक शेतीचे महत्त्व शेतकर्‍याला समजावून सांगण्यासाठी ते खेडोपाडी, घराघरांत शेती-वाडींत फिरले, शेतकर्‍यांना प्रत्यक्ष भेटले; अनेक प्रदर्शनांतून, कार्यशाळांतून, छोट्या-मोठ्या सभा-संमेलनांतून त्यांनी शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. हा प्रयत्न त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या अन्य भागांतही केला. यातून शेतकर्‍याला जणू त्यांनी अश्म (दगड) युगातून यंत्र युगाकडे नेले. यातूनच देशाचे कृषी उत्पन्नही वाढले. हे सर्व करत असताना त्यांनी ‘मी समाजसेवा करतोय’ असा आव आणला नाही. तर ‘एक अद्ययावत, आधुनिक, सच्चा व्यावसायिक भाव’ त्यांच्या कार्यात होता.

कोट्यावधी रुपयांचे परदेशी चलन भारतात आणणार्‍या पहिल्या काही उद्योजकांपैकी एक म्हणजे शंतनुराव होत. जर्मनी, अमेरिका, आफ्रिका, व युरोप खंडातील काही देश-आदी देशांशी औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्यात किर्लोस्करांचा सिंहाचा वाटा आहे. ‘शेतकरी अशिक्षित असला, तरी तो अज्ञानी व मूर्ख नाही. त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या, तर तो आपली उत्पादने नक्की वापरेल, हा विश्र्वास मनामध्ये बाळगून शंतनुरावांनी आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून अनेक देश पादाक्रांत केले. १९४०-४१ च्या दरम्यान शेअर बाजारात मराठी कंपन्यांना कोणीही भाव देण्याच्या तयारीत नव्हते, पण किर्लोस्करांना ‘भाव’ मिळाला, त्या नावालाच झळाळी प्राप्त झाली.

स्वत:च्या प्रगतीबरोबरच त्यांना सेवा देणार्‍या सुमारे ५०० लघुउद्योजकांची काळजीही त्यांनी वाहिली. हे लघुउद्योजक शंतनुरावांनीच निर्माण केले व त्यांना सातत्याने काम मिळेल असे पाहिले. आपल्या उद्योगातील कामागारांसाठी त्यांनी वसाहती, गावे वसवली. त्यांच्या विकासाचा नियोजनबद्ध प्रयत्न केला. १९५२, १९७२ या वर्षीच्या दुष्काळांमध्ये महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांनी आपले कारखाने, उद्योग बंद केले, पण उद्योगमहर्षी शंतनुरावांनी आपल्या शेअर (समभाग) धारकांना डिव्हिडंड वाटून विश्र्वास सार्थ ठरवला, एक आदर्श उदाहरण लोकांसमोर  ठेवले. पुढील ५० वर्षांत कशा प्रकारचे उद्योग अपेक्षित आहेत, आणि त्यासाठी कशा प्रकारचा प्रशिक्षित समाज घडवायला हवा याचा अंदाज शंतनुरावांनी त्या काळात बांधला होता. त्या दूरदृष्टीतूनच त्यांनी किर्लोस्करवाडी, कोएल, हरिहर, बेळगाव, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी आदर्शवत प्रकल्प निर्माण केले.

 सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शंतनुरावांनी आधुनिक, व्यावसायिक, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कृतीशील प्रचार महाराष्ट्रात केला आणि‘उद्योजक’ या शब्दाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

शंतनुराव केवळ आपल्या समूहाचीच भरभराट करू पाहणारे स्वार्थी उद्योजक नव्हते. ते सामाजिक व सांस्कृतिक आस्था असणारे ‘मराठी माणूस’ होते. आपण राहतो त्या शहराचा सर्वांगीण विकास साधणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे असं त्यांनी मानलं. ज्ञानप्रबोधिनी या शैक्षणिक व अन्य सामाजिक क्षेत्रांत कार्य करणार्‍या पुण्यातील संस्थेला त्यांनी सढळ हाताने मदत केली. बाळासाहेब पंतप्रतिनिधी स्मारक, राजा केळकर वस्तुसंग्रहालय या संस्थांनाही त्यांनी उभारणीसाठी सहकार्य केले. पानशेतच्या पुरामध्ये पुणे बुडाले, त्या वेळीही त्यांनी पुणे शहराला निरपेक्षतनेने सहकार्य केले. पिंपरी-चिंचवड आज एक महत्त्वाचे उद्योग केंद्र बनले आहे, ती एक श्रीमंत महानगरपालिका बनली आहे. पिंपरी-चिंचवडच्या पायाभूत औद्योगिक विकासात शंतनुरावांचा महत्त्वाचा वाटा आहे. युद्धकाळातही त्यांनी एक देशभक्त उद्योजक म्हणून देशनिष्ठेचे भान राखले. शंतनुराव हे रसिक होते. त्यांची पाश्र्चात्य संगीतावर प्रीती होती, चित्रकलेवर भक्ती होती, ते साहित्याचे अभ्यासक होते. या विविधांगी कार्याचे श्रेय त्यांनी घेतले नाही, ते प्रसिद्ध पराङमुखच राहिले. ‘कॅक्टस अँड रोझेस’ या आत्मवृत्तपर पुस्तकातून त्यांनी आपल्या आयुष्यातील आठवणी व अनुभव अभिव्यक्त केले आहेत. तसेच प्रसिद्ध लेखक श्री. सविता भावे यांनी ‘कालापुढती चार पाऊले’ या ग्रंथातून शंतनुरावांचे समग्र चरित्र वाचकांसमोर ठेवले आहे.

सुव्यवस्थित वेशभूषा, भेदक नजर, उत्कृष्ट कार्यक्षमता, एखाद्यावर विश्र्वास टाकल्यावर त्याला पूर्ण मदत करण्याचा दिलदार स्वभाव ही वैशिष्ट्ये असलेले शंतनुराव केवळ पूंजिपती नव्हते, तर संचालकांचे, हजारो कामगारांचे, लाखो समभाग धारकांचे पोशिंदे होते. खुल्या बाजारपेठेचा पुरस्कार १९५० च्या दरम्यान करणारे ते द्रष्टे उद्योजक होते. त्यांचे कारखाने, अनेक कंपन्या, त्यांची उत्पादने, कामगार यांच्या माध्यमातून शंतनुराव आजही उज्ज्वल भारताची ग्वाही देत आहेत.

‘गरजा कमी कराव्यात’ या प्रकारची मानसिकता असताना ‘बदलत्या काळानुसार गरजा वाढवाव्यात, आणि अधिक काम करून उत्पादकता वाढवावी, पर्यायाने दरडोई उत्पन्न वाढवावे’ हा महत्त्वपूर्ण विचार शंतनुरावांनी कृतीत आणला. आध्यात्मिक भारताकडून औद्योगिक भारताकडे झालेल्या वाटचालीत शंतनुरावांचा व किर्लोस्कर उद्योग समूहाचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. फ्रेड शुले ह्या जर्मन उद्योजकाने काढलेले उद्गार अतिशय समर्पक आहेत. तो म्हणाला होता, ‘माझ्यासाठी शंतनुराव हे भारतातील क्रमांक दोनचे व्यक्तिमत्त्व आहे. पहिला क्रमांक महात्मा गांधींचा आहे.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel