प्रकरण दोन.
ओजस पटवर्धन च्या ऑफिस मधे आला.आज जरा निवांत वाटत होता.अशीलांसाठी ठेवलेल्या गुबगुबीत खुर्चीवर , पटवर्धन समोर , खास त्याच्या पद्धतीने बसला. आपले दोन्ही पाय गुढग्यापाशी खुर्चीच्या उजव्या बाजूच्या हातावर ठेऊन आणि पाठ खुर्चीच्या डाव्या बाजूच्या हातावर टेकवून.
“ पाणिनी अचानक तुला कुक्कुटपाल कंपनी मधे कसा काय रस निर्माण झाला ?”
“ मला चिकन खायचा मोह झाला त्यामुळे असेल बहुतेक.” पाणिनी ने गुगली टाकला.त्या दोघात कायमच असे वाक् युद्ध चालायचे.
“ ती कुक्कुटपाल कंपनी म्हणजे जादूचीच कंपनी वाटते मला.मधेच ती जिवंत होते,मधेच गायब होते.”
“ म्हणजे? ” पाणिनी ने गोंधळून विचारले
“ म्हणजे कित्येक दिवस ती प्रसिद्धीच्या झोतात नसते , कधीतरी काहीतरी प्रसंगात ती एकदम चर्चेत येते. आत्ताच त्यांनी टेकडी उतरला एक मोठी जागा घेतली.”
“ कशासाठी?” पाणिनी ने विचारले.
“ कुक्कुट पालन म्हणून. एक कुरणच घेतलय.”
“ पण त्याच ठिकाणी का? ”
“कंपनीच्या एका विक्रेत्याच्या मतानुसार त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण आणि सूर्य प्रकाश अगदी बरोबर कुक्कुट पालनाच्या दृष्टीने योग्य आहे. ” ओजस म्हणाला.
“ या विक्रेत्याचा साहेब कोण आहे? म्हणजे मुख्य ?” पाणिनी ने विचारले.
“ पद्मनाभ पुंड नावाचा माणूस आहे.२२९१ चापोली गोवा इथे राहतो. लग्न झालंय, बायकोचे नाव दिव्व्या.”
“ आणखी कोणी विक्रेता आहे? ” पाणिनी ने विचारले.
सम्यक गर्ग नावाचा आहे, कोर्निश होटेल च्या खोली नंबर ६१८ मधे राहतो असे कळलं पण माझ्या माणसाना अजून तो सापडला नाहीये.”
“पद्मनाभ पुंड चे काय? ” पाणिनी ने विचारले
“ त्याला थेट भेटलो नाही पण माहिती मिळाली आहे त्यानुसार तो साधारण पंचेचाळीस वयाचा, ढेर पोट्या , गृहस्थ आहे., केस तपकिरी आहेत, डोळ्या वरून आणि चेहेऱ्या वरून मनमोकळा वाटतो.”
“ हे सगळे लोक ज्याच्या हाताखाली काम करतात तो मला हवाय. ” पाणिनी म्हणाला.
“ तो सापडणे अवघड आहे.”
“ कशावरून वाटतं तुला असं ?”
“ बारीक सारीक बऱ्याच गोष्टी वरून. पद्मनाभ पुंड ने एक व्यवहार जमवला त्यात मोठी रक्कम रोख स्वरुपात द्यायची होती.ज्याच्याशी व्यवहार जमावला त्याला घेऊन पद्मनाभ पुंड बँकेत गेला, सही केलेला एक कोरा चेक त्याने बाहेर काढला आणि कॅशियर कडे दिला.त्याने सही बघितली आणि तो मॅनेजर कडे गेला.त्याने कोणाला तरी फोन लावला. जो माणूस पद्मनाभ पुंड बरोबर आला होता तो म्हणाला की चेक वर सही करणाऱ्या माणसाचे आडनाव प्रजापति होते.” ओजस म्हणाला. “ पाणिनी, तुला या नावावरून तुला काही आठवतंय?”
“ काहीही नाही.पण मला हवा असलेला माणूस हाच असावा ” पाणिनी म्हणाला.
“ त्याच्याकडे काय काम आहे तुझे पाणिनी ? ”
“ त्याला ऐशी एकर जागा विकायची आहे , कुक्कुट पालनासाठी ची जागा.”
“ काय हेतू आहे यात तुझं मला नाही समजलं.”
“ तुला तपास करताना काही जाणवलं नाही का? ” पाणिनी ने विचारले.
“ खास काही नाही. तुला काय जाणवलं ? ” ओजस म्हणाला.
“ धरण क्षेत्रातील जमीन .” पाणिनी म्हणाला. “’ मला त्या राजे बाईला न्याय मिळवून द्यायचाय.मला हा प्रजापति हवाय.हाच माणूस आहे जो बरोबर दहा वाजता त्याच्या ऑफिस ला आल्यावर कंपनीच्या ट्रक च्या अपघाताची माहिती कळल्यावर त्याने आपल्या वकिलांना फोन केला असेल आणि भानू चे प्रकरण कोणत्याही किंमतीत मिटवा असे सांगितले असेल.”
“ ट्रक च्या नंबर वरून तुला नाही का मिळवता येणार? ” ओजस ने विचारले.
“ त्या ट्रक ड्रायव्हर ने माझ्या अशिलाने ज्या वहीत नंबर टिपून घेतला होता, ती वही हिसकावून घेतली. भानू ला त्याने वाही परत दिली पण ज्यावर ट्रकचा नंबर लिहिला होता ते पान फाडून घेतले होते. ” पाणिनी म्हणाला.
“ मला अजून काम सुरु करून चौवीस तास पण झाले नाहीत. म्होरक्या कोण आहे ते शोधायला वेळ लागणारच. सोमवार पर्यंत वेळ दे .” ओजस म्हणाला.
“ सोमवार फार उशीर होईल. मी , तू दिलेल्या पत्त्यावर दिव्व्या पुंड ला भेटून येतो. ” पाणिनी म्हणाला. “ सौम्या , तू तासभर इथेच थांब. मी ही एक संधी साधून बघतो .”
( प्रकरण दोन समाप्त)
प्रकरण तीन
“ पद्मनाभ पुंड ला भेटायचंय ” पाणिनी पटवर्धन दारावरच्या रखवालदाराला म्हणाला.
“ तुमचं काय नाव? ”
“ पटवर्धन ”
“ तुम्ही येणार होतात हे त्यांना माहीत होते? ”
“ नाही ”
“ थांबा मग , विचारतो मी.”
तो उठून फोन पर्यंत पोचला आणि अगदी हळू आवाजात काहीतरी बोलला फोन मधे तोंड घालून.काय बोलला हे कळायला पाणिनी ला काही मार्ग नव्हता.
“ पद्मनाभ घरी नाहीयेत अत्ता.आणि रात्री उशिरा येतील घरी.”
“ बायको असेलच ना त्यांची घरी, काही हरकत नाही.भेटतो मी तिला.” सहज बोलल्या सारखा पाणिनी म्हणाला.
रखवालदार पुन्हा फोन मधे तोंड घालून बोलला.आणि पाणिनी ला म्हणाला,
“ त्यांच्या लक्षात येत नाहीये तुम्ही कोण आहात आणि तुमची ओळख आहे का ”
“ त्यांना सांग की मी कुक्कुटपाल कंपनी बद्दल बोलायला आलोय.” पाणिनी म्हणाला.
रखवालदाराने तो निरोप तिला दिला. “ तुम्हाला बोलावलंय वर १४ ब मध्ये जा.”
पाणिनी वर पोचला आणि बेल वाजवली. एका स्त्री ने दार उघडले. ती तिशीच्या आसपास वय असलेली होती.डोळे सुजल्या सारखे दिसत होते.
“ तुम्हाला कुक्कुटपाल कंपनी बद्दल बोलायचं होत ना? ” दारातूनच ती म्हणाली. “ माझा नवरा नाहीये घरी काय विषय आहे ? ”
पाणिनी ने बाहेरच्या लॉबी कडे नजर टाकली.
“ आपण लॉबी मधे चालत चालत बोलू.” ती म्हणाली.
“ ठीक आहे ” पाणिनी म्हणाला .पण पुन्हा तिचा विचार बदलला.
“ आत या ” ती म्हणाली. “ बसा.” खुर्चीकडे निर्देश करून ती म्हणाली.
पाणिनी ने आपले व्हिजिटिंग कार्ड काढले आणि तिला दिले.तिने कार्डावरून नजर फिरवली आणि पुन्हा पाणिनी कडे बघितले. “ ओह ! पाणिनी पटवर्धन ! मी बरच ऐकलंय तुमच्या बद्दल , मला वाटत,तुम्ही खुनाची प्रकरणे हाताळता. ”
“ सगळ्याच प्रकारची प्रकरणे हाताळतो मी पण खुनाची प्रकरणे माझ्याकडे जास्त येतात.” पाणिनी म्हणाला.
“कुक्कुटपाल कंपनी मधे तुम्हाला काय रस आहे? ”
“ माझ्या एका अशिलाला पैसे हवे आहेत ” पाणिनी कोड्यात बोलला.
“ सगळ्यांनाच पैसे हवे असतात नाही का? ” ती म्हणाली.
“ हवे असतात सगळ्यांनाच, पण माझ्या या अशिलाला गरज आहे त्याची.आणि मी ते मिळवून देणारे.” पाणिनी म्हणाला.
“ तुमचा मोठेपणा दिसतो यात” ती म्हणाली. “ पण यात माझ्या नवऱ्याचा काय संबंध आहे? ”
“ तो ज्या व्यवसायाशी संबंधित आहे,पोल्ट्री च्या त्याच्याशी याचा संबंध आहे.” पाणिनी म्हणाला.
“ थोड अधिक स्पष्ट कराल का? ”
“ माझ्या अशीलाचे नाव आहे आरक्ता राजे. काही लक्षात येतं?” पाणिनी ने तिच्याकडे निरखून बघत विचारले.
“ नाही, काहीही संदर्भ लागत नाही मला. मला खर म्हणजे नवऱ्याच्या धंद्यातले काही माहीत नसते.”
“ मी तुमच्या नवऱ्याला अत्यंत तातडीने भेटू इच्छितो. कसा संपर्क करू सांगा मला.”
“ नाही, पुढच्या आठवड्यातच भेटू शकतात ते ”
“ तुम्ही कराल का त्यांच्याशी तातडीने संपर्क? ” पाणिनी ने विचारले.
“ तातडीने नाही करता येणार” ती म्हणाली.
“ जेव्हा संपर्क होईल तेव्हा त्यांना माझा निरोप द्या की माझं नाक अत्यंत तीक्ष्ण आहे आणि मला जो वास येतोय तो कोंबड्यांचा नाहीये. ” पाणिनी उद्गारला.
“ विचित्रच निरोप आहे हा ! ” दिव्व्या म्हणाली.
“ नवऱ्याला हे पण सांगा की वेळ आली तर माझी अशील राजे ही तिच्यावर झालेल्या अन्यायाची वाच्च्यता चार चौघात करायला मागे पुढे पाहणार नाही , मीच तिला तसा सल्ला देऊ शकतो पण तिने तसे न करणे हे तुमच्या नवऱ्याच्या हिताचे आहे. ”
“सांगीन मी तसेच ” दिव्व्या म्हणाली.
“ हा निरोप त्याला मिळेलच याची दक्षता घ्याल ना तुम्ही ? ” पाणिनी ने पुन्हा विचारले
“ मिस्टर पटवर्धन माझ्या चेहेऱ्यावर जे भाव आहेत त्यावरून माझा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू नका.मी जास्तीत जास्त शांत आणि सभ्य चेहेरा ठेवण्याचा प्रयत्न केलाय एवढेच सांगते.” पाणिनीच्या आग्रही भूमिकेला कंटाळून दिव्व्या म्हणाली.
“ अनेकांचे चेहेरे वाचायची मला सवय झाल्ये मिस दिव्व्या , तुम्ही म्हणताय की तुमचा चेहेरा तुम्ही सभ्य ठेवायचा प्रयत्न करताय, पण प्रत्यक्षात तुम्हाला माझा राग आलाय असे तुम्हाला सुचवायचं असेल तर तसे नाहीये.तुम्ही थोड्या वेळापूर्वी खूप रडला आहात असा माझा अंदाज आहे. ” पाणिनी म्हणाला.
अचानक दिव्व्या मधे फरक पडला. “ मिस्टर पटवर्धन, मला तुमच्याशी खाजगी बोलायचय.मला तुमची मदत हवी आहे.”
तेवढ्यात फोन चा कर्कश्य आवाज आला.तिच्या कपाळावरच्या आठ्या पाहून पटवर्धन एकदम बोलून गेला, “ बहुतेक तुमच्या नवऱ्याचा फोन.”
ती मोठ्या पेचात पडली,फोन घ्यावा की नाही? घेतला आणि नवऱ्याचा असला तर पटवर्धन समोर बोलायचं कसं? शेवटी तिने निर्णय घेतला आणि फोन उचलला.
“ बोला” शक्य तेवढा गोड आवाज काढत ती म्हणाली. “ कोण ?, नाही, मला नाही माहिती तो, बर, बर. बापरे ! कशाला? सांग त्याला माझा नवरा संध्याकाळी उशिरा पर्यंत येणार नाही म्हणून. माहित्ये त्याला? बर,बर,”
तिने फोन ठेवला. “ तारकर म्हणून कोणीतरी आहे.त्याला यायचंय. मी अजिबात दार उघडणार नाही.” तिने पटवर्धन ला सांगून टाकले.
“तारकर हा पोलीस अधिकारी आहे.तो मुख्यत्वे खुनाशी संबंधी प्रकारणे हाताळतो. लहान सहन गुन्ह्याची नाही. ज्या अर्थी तो याच्यात पडलाय त्याअर्थी तुमचा खुनाशी काही संबंध आहे का तपासून बघा.असेल तर आत्ताच सांगा. ”
तिच्या चेहेऱ्यावर भीतीचे भाव उमटले.
“ ज्याचा खून झालंय असा कोणी तुमच्या माहितीतील आहे का?” पाणिनी ने विचारले.
“ अरे देवा, कोणीच नाही तसे, तो सोडला ....... ” ती एकदम थांबली.
“ तो सोडला म्हणजे ? ” पाणिनी ने तिला विचारले. “ तुमचा नवरा असे तर तुम्हाला म्हणायचे नव्हते?”
“ अहो काय बोलताय तुम्ही? माझ्या तोंडात का तुमचे विचार घालताय?”
“ आपल्याला असे वाद घालायला वेळ नाहिये. तारकर कुठल्याही क्षणी दारातून आत येईल.त्याने मला इथे बघितले तर तुम्ही अडचणीत याल.मागचे दार आहे का बाहेर जायला.?”
“ नाही ” तिने त्रोटक पणे उत्तर दिले.
“ बर, कांदे आहेत का घरात ? ” पाणिनी ने विचारले.
“ कांदे? त्याचा काय संबंध? ”
“ मी तुमच्या पॅण्ट्री मधे लपून बसणार आहे. तारकर आला तरी त्याला सांगू नका तुमच्या घरी असलेले कांदे बाहेर काढा आणि सुरीने चिरायला सुरवात करा. तारकर आला की दार उघडताना त्याला तुमच्या हातात सुरी आणि कांदा दिसला पाहिजे. म्हणजे डोळे का सुजले आणि रडल्यासारखे का वाटत होते त्याचा वेगळा खुलासा द्यायची गरज भासणार नाही. ” पाणिनी म्हणाला.
तेवढ्यात बेल वाजली . पाणिनी ने तिला आत ढकलले, बळजबरीने तिच्या हातात कांद्याचे तुकडे आणि सुरी दिली, “ जा दार उघड ” तो म्हणाला.
पुन्हा बेल वाजली. “ जा पटकन , मी आत आहे, पण त्याला बोलू नको.”
पाणिनी आत मधे एक स्टूल घेऊन बसला.दार उघडल्याचा आवाज आला नंतर तारकर आणि तिच्या बोलण्याचे आवाज आले पण शब्द काळात नव्हते. पुन्हा दार बंद झाल्याचा आवाज आला, तारकर आत आला असावा. पुन्हा दोघांच्या बोलण्याचे आवाज आले.थोडे अधिक स्पष्ट. नंतर अचानक दिव्व्या ची दबलेल्या आवाजातील किंकाळी ऐकू आली.नंतर अनेक वेळा कोणीतरी आत गेल्याचे ,बाहेर गेल्याचे आवाज आले.पाणिनी दाराच्या फटीतून सर्व बघत होता. तारकर, दिव्व्या ला बुटा बद्दल काहीतरी विचारीत होता.पाणिनी पुन्हा आत येऊन बसला.तेवढ्यात तारकर चा आवाज आला, “ बस झाली तुझी नाटके पाणिनी, ये आता बाहेर.” बोलता बोलता तारकर आत आला.
“ मला कप भर दूध हवे होते म्हणून मी आत आलो होतो.” पाणिनी ने खुलासा द्यायचा प्रयत्न केला.
“ ते काय फ्रीज मधे आहे ना ! देते मी तुम्हाला ”. दिव्व्या म्हणाली.
पाणिनी ची फजिती बघून तारकर ला हसायला आले. “ काय विचार डोक्यात ठेऊन आलास इथे पाणिनी? ”
“ खर तर मी तुला ब्रेक देण्यासाठी आलो होतो.” पाणिनी म्हणाला.
“ मला? आणि तु ब्रेक देणार होतास? ”
“ हो.मी इथे दिव्व्याला वेगळ्या विषयात भेटायला आलो होतो.तुझं काम काय होत माहीत नाही पण पण तु मला इथे पहिले असतेस तर तुला वेगळा संशय आला असता आणि दिव्व्या ची परिस्थिती सुद्धा द्विधा झाली असती ; म्हणूनच मी आत थांबलो तु जायची वाट बघत. ” पाणिनी ने खुलासा केला.
“ घ्या, दूध घ्या पटवर्धन.” दिव्व्या म्हणाली आणि तिने पाणिनी च्या हातात ग्लास दिला.
“ पाणिनी मला गंडवण्याचा प्रयत्न करत नव्हतास ना तू नक्की? ”
“ उलट तूच मला काही गंडवणार नाहीस याची मी काळजी घेत होतो. ” पाणिनी म्हणाला. “ कोणाचा खून झालाय ? ”
“ खून झाला असावा असे का वाटते तुला? ” तारकर ने प्रतिप्रश्न केला.
“ तू काय सहज आला होतास का ? हवा पाण्याच्या गोष्टी करायला? ” पाणिनी ने विचारले.
“ आधी तुझं काय काम होत सांग ” . तारकर म्हणाला.
“ मी जेवायला आलो होतो तिच्याकडे.” पाणिनी म्हणाला.
“ पाणिनी , अशी उडवा उडवीची उत्तरं देऊन काही उपयोग नाही , त्यातून काहीही निष्पत्ती होणार नाही. ”
“ नाही कसं निष्पन्न झालं? मला दूध मिळाले की मस्त पैकी.” पाणिनी मस्करी करण्याचे मूड मधे म्हणाला.
“ ठीक आहे तू फालतुगिरी करायच्या मूड मधे आहेस, पण एक गंभीर गोष्ट सांगतो. मिसेस पुंड च्या नवऱ्याचा खून झालाय ”
“ ओह ! वाईट झालं.” पाणिनी म्हणाला.
“ तुला हे माहीत नसेलच ना नेहेमी प्रमाणे ? ” तारकर ने उपरोधिक स्वरात विचारले.
“ माहीत होते.”
“ कधी झाले माहीत तुला?” तारकर ने प्रतिप्रश्न केला.
“ हे काय तूच सांगितलस ना अत्ता ? ” पाणिनी ने अजूनच उचकावले
तारकर चे लक्ष सिंक मधे पडलेल्या कांद्या कडे गेले. “ तू सोलत होतीस हे कांदे? ”
“ हो ” पुंड म्हणाली.
“ सोलून झालेले कांदे कुठे आहेत? ”
“ तुम्ही आलात तेव्हा मी नुकतीच सुरुवात केली होती ” ती म्हणाली.
“ अच्छा ! म्हणजे पटवर्धन इथे आला तेव्हा तू कांदे सोलत नव्हतीस. मी खालून तुला मी आल्याचे कळवण्यासाठी फोन केला तेव्हा तू अचानक कांदे सोलायला घेतलेस आणि हे घडत असताना पटवर्धन इथे होता. बरोबर? ” तारकर ने खडूस पणे विचारले.
“ कुठे खून झाला हिच्या नवऱ्याचा? ” पाणिनी ने विचारले
“ या शहरातच ” तारकर ने तुटक पणे उत्तर दिले.
“ तुला आता कामाला लागलं पाहिजे.कोणी केला खून? ”
“ माहीत नाही.” तारकर म्हणाला.
“ आश्चर्यच आहे.” पाणिनी म्हणाला. “ मी इथे आल्याचे तुला कसे कळले तारकर ? ” अचानक पटवर्धन ने विचारल
“ मी सांगितलं त्यांना.’’ दिव्व्या पुंड म्हणाली.
“ का सांगितलस ? ”
“ एकंदरीत जे काय घडलय ते कळल्यावर मला वाटलं की स्पष्ट सांगून टाकावं ”
“ मी तारकर ना सांगितलं की माझ्या नवऱ्याच्या व्यवसायाशी संबंधित काही चौकशी करायला तुम्ही आला होतात आणि तारकर आल्याचे कळल्यावर इथे त्याच्या समोर थांबणे तुम्हाला प्रशस्त वाटले नाही म्हणून तुम्ही आत बसलात. ” दिव्व्या पुंड म्हणाली.
“ तुम्ही पाणिनी पटवर्धन ला काही सुचवायची गरज नाही , जसे अत्ता सुचावलेत.तो नाटकी आहे.त्याला नाटकातले स्वत:चे संवाद पाठ असतातच शिवाय दुसऱ्याचे ही पाठ असतात.” तारकर तिला म्हणाला.
“ मी तुम्हाला म्हणालो नव्हतो, की तारकर कोणावरच विश्वास ठेवत नाही. मी निघतो आता. तुमच्या पतीची बातमी ऐकून खूप वाईट वाटलं. तारकर ने तुम्हाला तुमच्या पती बद्दल सविस्तर असे काहीच सांगितले नसेल याची मला खात्री आहे. ” पाणिनी म्हणाला.
“ का नसेल सांगितलं? सर्व सांगितलंय की. असं वाटतंय की, ...... ”
“ गप्प बसा. तुम्हाला मी जी माहिती दिली आहे ती दुसऱ्याना देण्यासाठी नाही.” तारकर म्हणाला.
“ मी निघतो.तुमच्या दु:खात मी सहभागी आहे.”पाणिनी म्हणाला.
“ आभार तुमचे.” दिव्व्या पुंड म्हणाली. नंतर तारकर कडे वळून म्हणाली, “ माझ्या कडे जेवढे सांगण्यासारखे होते तेवढे मी सांगितलंय. तुमचेही आभार ”
तारकर चे लक्ष अजूनही सिंक मधल्या कांद्या भोवती घुटमळत होत. तो बहुदा पटवर्धन बाहेर जायची वाट बघत होता.
“ नीध आता तू ” तो पटवर्धन ला म्हणाला.
“ नीघ नाही निघूया आपण दोघेही. तिने आपल्या दोघांचेही आभार मानलेत ! ” पटवर्धन म्हणाला आणि तारकर नाईलाजाने त्याच्या बरोबर बाहेर पडला.
( प्रकरण तीन समाप्त)