प्रकरण ८
विहंग आणि त्याच्या भावी पत्नीला विमान तळावर सोडून पाणिनी पुन्हा आर्या च्या घरी तिच्या खोलीत आला.तिने पाणिनी कडून सर्व इत्यंभूत माहिती काढून घेतली.
“ तू काय काय केलंस?” पाणिनी म्हणाला .
“ मी भुकेने व्याकुळ झाले होते.त्यामुळे मी हळूचकन मागील दाराने घरा बाहेर पडले. टॅक्सी केली आणि बाहेर जाऊन हॉटेल मधे मस्त खावून आले. येताना मात्र लपत छपत न येता राजमार्गाने आले आणि सांगून टाकल सगळ्यांना की मी खांडवा वरून बस ने अत्ताच आले म्हणून.”
“ तुमच्या खान सम्याने , बल्लव ने मला पकडण्याचा प्रयत्न केला.माझा कॉफीचा रिकामा कप त्याला हवा होता म्हणून अचानक तो तुझ्या खोलीपाशी आला तेव्हा मी बाहेर पडताना दिसलो, मी काहीतरी थातूर मातूर कारण सांगून त्याला वाटेला लावलं. ” पाणिनी म्हणाला
“ माझ्या खोलीत आहे कप तो. आपण खाली जाऊ , कुठल्यातरी टेबल वर ठेऊ तो कप. मला स्वतःला एखादा गुन्हेगार असल्यासारखं वाटतंय ! तुमच्या सारखे फौजदारी वकील आपल्या अशिलाला त्याच्या स्वतःच्या ही नकळत गूढ बनवतात की काय ! ” आर्या हसून म्हणाली.
“ कारस्थानं तू करते आहेस.माझ्यावर तो आरोप करू नकोस ! तुझ्याच ग्रह ताऱ्यांनी तुला सुचवलंय ना की मामा साठी आडनावात पाच अक्षर असलेला वकील नेम म्हणून !” पाणिनी म्हणाला
ते दोघे खाली गेले. थोडावेळ अशाच गप्पा मारत बसले.तिने तिच्या खोलीतून आणलेला पटवर्धन चा कॉफी चा कप टेबल वर ठेवला.तेवढ्यात खानसमा म्हणजे बल्लव भौमिचारी त्यांच्या दिशेनेच येताना दिसला. “ काही विशिष्ट हेतूने तो इथे येतोय असे वाटतंय.” पाणिनी म्हणाला
“ त्याला कळता कामा नये पटवर्धन, मी काल इथे होते म्हणून.”
“ मला टेबलाचा ड्रॉवर उघडता येत नाही. लॉक आहे त्याला.” बल्लव त्यांच्या कडे येता येता म्हणाला.
“ सगळीकडे शोधलीस का किल्ली?”आर्या ने विचारलं
“ हो. कुठेच नाहीये.” तो म्हणाला.
“ उजव्या बाजूच्या पितळ्याच्या बाउलमध्ये बघितलीस का?” तिने विचारले.
“ नाही , त्या जागी नाही पाहिले.” बल्लव म्हणाला.
“ चला बघूया.” पाणिनी कडे अर्थ पूर्ण नजरेने बघत आर्या म्हणाली.आणि उठली. पाणिनी पण तिच्या मागून उठून चालू लागला.बल्लव पण चालायला लागला.
“ खरंच , लॉक लागलंय की.” ती उद्गारली. “ किल्ली तर ड्रॉवर मधेच ठेवलेली असते.कोणीतरी चुकून दुसरीकडे ठेवलेली दिसते.”
तिने इकडे तिकडे शोधायचा अभिनय करत एका ठिकाणी ठेवलेली किल्ली काढली पण बल्लव कडे न देता स्वतःच ड्रॉवर उघडला. आत ज्या ठिकाणी सुरी,चमचे, ठेवलेला कप्पा होता त्यात सर्व व्यवस्थित होते पण एक सुरी ची जागा रिकामी होती !! घाबरून तिने पाणिनी पटवर्धन कडे पाहिले.
“ तुला काय हवं होतं बल्लव ड्रॉवर मधलं ?” तिने विचारले.
“ किरकोळ, बारिक सारिक वस्तू आणि प्लेट्स ” बल्लव म्हणाला.
“ आपला नाश्ता कधी तयार होईल? आपल्याला डॉक्टर खेर ना उठवावे लागेल.” पाणिनी म्हणाला
“ ठराविक वेळ नाही नाश्त्याला. प्रत्येक जण जसजसा उठेल तसा त्याच्या पुरता नाश्ता करून देतो बल्लव.”
“ तरी सुध्दा आपण वर जाऊन डॉक्टरांना उठवू.” पाणिनी म्हणाला
त्याच्या वाक्यातला आग्रह तिला आधी लक्षात नाही आला. पाणिनी ला काय सुचवायच होत ते लक्षात आल्यावर ती म्हणाली, “ हो,हो.बरोबर आहे . आपल्याला उठवायला हवं त्याना.”
दोघे वरच्या मजल्यावर गेले. “ माझ्या आधी लक्षात नाही आलं तुम्ही सारखं असं का म्हणताय ! तुम्हाला वर यायचं निमित्त हवं होत ! तुम्हाला मामाच्या खोलीत बघायचं असेल ना? ”ती म्हणाली.
“ तपासणी केलेली बरी.” पाणिनी म्हणाला
“ मला ही समजत नाहीसं झालंय.तुम्हाला शक्यता वाटते की......”
“ तू काल रात्री ड्रॉवर ला कुलूप लावलंस तेव्हा सुरी होती की नाही हे तपासालस होतस की नाही? ” पाणिनी म्हणाला .
“ नाही, म्हणजे मला वाटलं असणारच तिथे सुरी.” ती म्हणाली.
“ ठीक आहे.काय दिसतंय आत बघू.” पाणिनी म्हणाला
जिना चढताना ती झपाट्याने पाणिनी च्या पुढे जाऊन दारात उभी राहिली.
“ मला भीती वाटत्ये, आत काय बघायला मिळणार आहे याची.” ती म्हणाली
“ खोली आवरली असेल ,घरातल्या नोकरांनी? ” पाणिनी म्हणाला .
“ नाही, नऊ च्या आत नाही आवरत.”
पाणिनी ने दार उघडले.ती आत जाताना भिऊन त्याच्या मागेच राहिली.
“ आत कुठे प्रेत वगैरे दिसत नाहीये.” पाणिनी इकडे तिकडे बघत म्हणाला.
“ असं बोलून घाबरवू नका हो. मला खंबीर व्हायचंय” आर्या म्हणाली. “ तुम्ही उशी खाली बघा पटवर्धन! मागील वेळी मामाने उशी खाली च ठेवलेली सापडली होती मला.माझं धैर्य होत नाही.”
पाणिनी पटवर्धन ने उशी वर केली. खाली एक मोठी काळ्या रंगाच्या मुठीची सुरी होती.आणि त्याच्या पात्याला भयानक लालसर सुकलेले डाग होते.!
(प्रकारण ८ समाप्त)