प्रकरण अकरा

 पाणिनी  ला कनक ओजस त्या घरा बाहेर त्याच्या गाडीत बसलेला दिसला. “ मला आत नाही येऊ दिले पोलिसांनी.” तो म्हणाला. “ काय घडलं तिथे? ”

“ बरंच काही ”   पाणिनी  म्हणाला.    “ राजे नावाच्या त्या घरात राहणाऱ्या एका चा खून झालाय. तो अंथरुणात असतानाच रात्री चाकू ने भोसकून. त्याच्या अंगावर असलेल्या पांघरुणावरूनच त्याला भोसकलय  ”

“ खुनाचा हेतू ? ” ओजस ने विचारलं.

“ परिस्थितीजन्य पुरावा माझ्या अशिलाच्या, विहंग खोपकर च्या विरोधात आहे.”

“ तो आहे कुठे अत्ता? ” ओजस ने विचारलं.

“ व्यावसायिक कामासाठी बाहेरगावी गेलाय.”   पाणिनी  म्हणाला.

“ तू त्याला पोलिसांसमोर हजर करणार आहेस? ”

“ ते इतर अनेक गोष्टीवर अवलंबून राहील.”    पाणिनी  म्हणाला.  “ तो दोषी आहे का याची मला प्रथम खात्री करून घ्यायची आहे. असेल तर मी त्याची वकीली घेणार नाही. त्याला झोपेत चालायची सवय होती. त्याने हे झोपेत केले असेल तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीन. ”

“ ज्याचा खून झाला, तो कसा माणूस होता? ”-ओजस

“ स्वतःच्या तब्बेतीची सतत काळजी वाटणारा.”

“ मग अशा बावळट माणसाला मारण्याचा विहंग चा हेतू काय असणार? ” –ओजस

“ त्याला मारण्यात हेतू नसणार पण मेलेला माणूस म्हणजे राजे, ज्याच्या खोलीत झोपला होता , त्या मरुद्गण ला मारण्यात विहंग चा फायदा होता.”   पाणिनी  म्हणाला.

“ थोडक्यात मरुद्गण समजून राजे मारला गेला !”

“ मला माहीत नाही. ”   पाणिनी  म्हणाला.   आणि ओजस च्या गाडीचे दार उघडून आत बसला.  “ मला जरा त्या चौका पर्यंत सोड.तिथून मी टॅक्सी करीन.”

“ ऑफिस ला चालला आहेस ? ”

“ नक्की ठरवलं नाही.”  पाणिनी  तंद्रीत म्हणाला

“ तू तिथे त्या घरी असताना पोलीस येण्या पूर्वीच तुला काहीच करता नाही आलं ? ” –ओजस

“ नाही ना, तिथे दुर्वास नावाचा एक वकील होता.चतुर आहे तो.”

 “ त्याने तुझीच स्टाईल घेतलेली दिसते ! ” ओजस उद्गारला.

“ खरंच, माझ्याच स्टाईल ने माझ्यावर कुरघोडी केली !  त्याचा दावा आहे की माझ्या अशिलाला म्हणजे विहंग ला त्याने  रात्री घरा भोवती घुटमळताना पाहिले. ”

“ काळजी घे  पाणिनी .” –ओजस

“ का? असं का म्हणतो आहेस? ”    पाणिनी  ने विचारलं

“  तुला मी आज ओळखत नाहीये  पाणिनी .तुझ्या डोळ्यातली छटा मला सांगतेय की तू काहीतरी  खळबळजनक करायच्या तयारीत आहेस.”

 पाणिनी  हसला. “ मी एकच नाही तर एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या तयारीत आहे. सर्कशीत ला जगलर कसा एकाच वेळी अनेक चेंडू हातात घेऊन हवेत उडवतो ना तसचं. फक्त मी हातात चेंडू नाही तर बॉम्ब घेऊन खेळणार आहे.!”

“ तू सांगितलेली सर्व माहिती मी काढतो.काळजी नको करू. खांडवा ला एका घरावर नजर ठेवणाऱ्या तुझ्या माणसाला सोडवण्यासाठी त्याच्या जागी दुसरा माणूस पाठवायची व्यवस्था मी केली आहे. ” –ओजस

“ मस्त काम केलंस ! एका ऐवजी दोन माणसं नेम. त्या बाईला अजिबात दृष्टीआड होऊन द्यायचं नाहीये मला.आणखी एक, विहंग च्या घरावर नजर ठेवायची व्यवस्था कर.पोलीस गेल्यावर तिथे कोण येतंय आणि बाहेर जातंय ते कळायला हवं आपल्याला.”   पाणिनी  म्हणाला.   “ इथे थांबव गाडी,कनक. समोर टॅक्सी  पण आहेत.”

 पाणिनी  बरोबर नऊ वाजून दहा मिनिटांनी त्याच्या ऑफिस ला पोचला तेव्हा सौम्या सोहोनी त्याला बरंच काही सांगायला उत्सुक होती.

“ आपल्या सुकृत ने बरीच खटपट करून तिथल्या न्यायाधीशांकडून घटस्फोटाच्या डिक्री वर सही मिळवली शेवटी.त्याचा तसा फोन आला होता.विहंग खोपकर ला फोन केला होता पण तो संपर्काच्या बाहेर आहे.म्हणून तो जिथे उतरणार होता त्या हॉटेलात फोन केला होता.  पण ती जोडी आली नव्हती तिथे.कोर्टात फोन केला तिथे पण  त्यांच्या बद्दल काही समजले नाही.त्यांच्या लग्नाचा दाखला अजून दिला गेला नाहीये.”

 पाणिनी  तिचे बोलणे संपेपर्यंत आपले कपडे ठाकठीक करण्यात आणि केस विंचरून ,तोंड धुवून फ्रेश होण्याच्या प्रयत्नात होता.

“ मला विहंग शी संपर्क न  झाल्याने  काळजी वाटायला लागली आणि मी उतावीळ झाल्या सारखं झालं म्हणून मी ओजस च्या ऑफिस ला फोन करून  ज्या विमानाने विहंग गेलाय ते विमान पोचले का याची माहिती आपल्याला देण्यासाठी सांगून ठेवलंय.” सौम्या म्हणाली.

 पाणिनी  ने तिला कौतुकाने जवळ घेतले. “ माझी कर्तुत्ववान आणि लाडकी सेक्रेटरी ! ” तो म्हणाला.  “ कधी कधी मला वाटत मी सतत बाहेरच रहाव आणि तू इथे बसून मस्त पैकी ऑफिस चालवावस ”

तिने  पाणिनी  च्या कौतुकाकडे  फारसं लक्ष न देता  पाणिनी  ला इतर काही केसेस मधील माहिती त्याला दिली.

“ सौम्या, हे प्रकरण संपेपर्यंत मला दुसरे कोणतेही प्रकरण हातात घ्यायचे नाहीये.त्या सगळ्यांना सांगून टाक की मी नाही घेणार म्हणून.”   पाणिनी  म्हणाला.

तेवढ्यात फोन वाजला. सौम्या ने तो घेतला. तिच्या चेहेऱ्यावर काळजी दिसली. “ सर अजून ते दोघे पोचलेले नाहीत.”

“ आता खरंच परिस्थिती चिघळली असे म्हणायला पाहिजे.”   पाणिनी  म्हणाला.

“ आपण त्यांची परागंदा म्हणून तक्रार नोंदवायची का? ” सौम्या ने विचारले.

 पाणिनी  ने विचार केला ,मग नकारार्थी मान हलवली. “ त्या पेक्षा माझं तिकीट बुक कर सौम्या. तातडीने  हवाई ला जायला हवं. विहंग ला शोधायला.”

इतक्यात फोन वाजला.सौम्या ने घेतला.  “ सुकृत आहे ,फोन वर.तुम्ही बोला ,तो पर्यंत मी बाहेर जाऊन विमानाच्या तिकिटाचे बघते.” सौम्या म्हणाली.

“ अभिनंदन, सुकृत. डिक्री मिळाली ना? सर्व काही ठीक आहे तिकडे? ”  पाणिनी  ने विचारलं

“ हो मिळाली डिक्री.आता मी काय करू पुढे? ”

“ त्या बाई वर कोण लक्ष ठेऊन आहे?”

“ ओजस चा माणूस.त्याने हर्षद  ला तिथून मोकळं केलं.”

“ सौम्या म्हणाली की तुला थेट माझ्याशी बोलायचं होत काहीतरी.”   पाणिनी  म्हणाला.

“ माझं धैर्य नाही झालं.इथे कोणीतरी ऐकू शकतो.मी अजून कोर्टातच आहे.इथून बाहेर पडलो की फोन करीन.”

 पाणिनी  पटवर्धन ची उत्कंठा त्याला स्वस्थ बसू देईना.  “ साधारण स्वरूप काय आहे तुला जे सांगायचं आहे त्याचं? मोघम भाषेत सांग म्हणजे बाहेरच्या कोणाला कळणार नाही.”   पाणिनी  म्हणाला.

“ अशी काही व्यवस्था झाल्ये की या दाव्यातील तक्रारदार  बचाव पक्षाच्या विरोधातील लोकांशी सहकार्य करू पाहतोय.” सुकृत म्हणाला  “ समजलं असेल ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते? ”

“ हो लक्षात आलंय.तू कोणाचीही नाव घेऊ नको तिकडून आणि लौकरात लौकर इकडे ये.”   पाणिनी  म्हणाला.

“ तुझ्या बरोबरच्या इतरांचं काय? ”  पाणिनी  म्हणाला.

“ ते सर्व तयार आहेत हर्षद तर गाडीत बसून आहे.”

“ इकडे दुर्दैवी प्रसंग घडलाय राजे चा खून झालाय त्यामुळे मिस वाकनीस  आणि हर्षद यांची या गोष्टीची मानसिक तयारी होई पर्यंत त्यांनी अलगद पोलिसांच्या हातात सापडणे योग्य नाही होणार. ”   पाणिनी  म्हणाला.

“ म्हणजे मी त्यांना  त्यांच्या घरी  घेऊन येण्यापूर्वी आपल्या ऑफिस मधे .......” सुकृत म्हणाला 

“ नेमकं तेच व्हायला नकोय मला .कारण त्यामुळे मी साक्षीदारांना शिकवतो असं पोलीस म्हणतील. पण त्यांना तू ही घटना सांगू नकोस पण अप्रत्यक्ष पणे सुचव. कारण शेफाली चे वकील त्याला संध्याकाळच्या घटने बद्दल प्रश्न विचारतील. ”  पाणिनी  म्हणाला.

“ मी तुम्हाला मगाशी जो विषय सूचित केला, त्या बद्दल हर्षद ला माहिती आहे. ” सुकृत म्हणाला 

“ ते असू दे. तरीही त्याला पोलिसांच्या चौकशी पासून वाचवलं पाहिजे ”  पाणिनी  म्हणाला.  “ त्याला जी जी माहिती आहे ती स्टेनो मिस वाकनीस   ला लिहून घ्यायला सांग.बर तर मग.तू येशील तेव्हा मी नसेन कदाचित.तसं झालं तर वाट बघ माझी.”

थोडा वेळ  पाणिनी  येरझऱ्या  घालत राहिला

“ सर, विमानाचं बुकिंग झालंय, तुम्ही लगेच निघा. काळजी घ्या कदाचित पोलीस तुमच्या मागावर असतील.” सौम्या म्हणाली. “ आणि सर तुम्हाला विमानतळावर नेण्यासाठी खाली गाडी उभी आहे.”

“ धन्यवाद सौम्या, पटकन काम केलंस.”  पाणिनी  म्हणाला आणि बाहेर लिफ्ट च्या दिशेने निघाला.खाली ड्रायव्हर वाटच पहात होता. थोड्याच वेळात ते विमानतळावर पोचले.  पाणिनी  ने विमानात आपली खुर्ची पकडली . विमानाने  हवाई च्या दिशेने उड्डाण केले तेव्हा दिवसभराच्या दगदगीने   पाणिनी चे डोळे कधी मिटले गेले त्याचे त्यालाच कळले नाही.

हवाई च्या विमान तळावर उतरल्यावर  पाणिनी  पटवर्धन बाहेर जायला निघाला आणि समोर विहंग अचानक दिसला. पाणिनी  ला धक्काच बसला. त्याच्या बरोबर आणखी एक माणूस होता.

“ अरे काय हे ? तुझा पत्ता काय? जंग जंग पछाडलं तुला शोधायला शेवटी मी आलो.”   पाणिनी  म्हणाला.

“ विमानात बिघाड झाला आमच्या खूप उशिरा सुटलं.आम्हाला पाचच मिनिटे झाली इथे येऊन. फोन करणे शक्य नव्हते. रेंज नव्हती.” विहंग बरंच काही सांगत बसला.

“ हा तुझ्या बरोबर चा माणूस कोण आहे? ”  पाणिनी  ने विचारलं

“ गुप्तहेर एजन्सी चा माणूस आहे मी येताच मला तो भेटला.त्याने तुमच्या सौम्या ला फोन केला तेव्हा तुम्ही मला शोधायला येताय असं कळलं..” विहंग म्हणाला.

“ माईणकर कुठे आहे?”   पाणिनी  ने विचारलं

“ मी तिला पुढे हॉटेलात पाठवलंय. ती तयार होऊन थेट कोर्टातच येईल.”

“ आपण कोर्टात जाऊन लग्नाच्या नोंदणीचा सोपस्कार उरकून घेऊ आधी.”   पाणिनी  म्हणाला. “ इथे टॅक्सी कुठे मिळेल? ”   पाणिनी  म्हणाला.

“ मी वेटिंग वरच ठेवली आहे . ” विहंग म्हणाला .

“ नीट ऐक, एक टक्का शक्यता आहे की टॅक्सी पाशी पोलीस तुझी वाट पाहत असेल. त्यामुळे पोलिसाने तुझ्याशी बोलायच्या आधी मला तुझ्याशी बोलायचं आहे.” असं म्हणून  पाणिनी ने विहंग चा हात धरून त्याला बाजूला नेलं.

“ आता मला काय घडलं ते खरं खरं सांग.   पाणिनी  म्हणाला.”

“ म्हणजे काय ? ”विहंग ने विचारलं

“ म्हणजे मी म्हणतो तेच . खरं आणि स्पष्ट सांगायचं ”  पाणिनी  म्हणाला.

“ मला कळत नाहीये कशा बद्दल खरं सांगायचं मी ? ” विहंग उद्गारला. “ मरुद्गण बद्दल मी तुम्हाला दिलेली माहिती एकदम अचूक आहे. माझ्यावर संशय नका घेऊ.”

“मरुद्गण गेला खड्ड्यात. राजे बद्दल म्हणतोय मी.”   पाणिनी  म्हणाला.

“ माझा सावत्र भाऊ? त्याच्या बद्दल काय? तुम्हाला आधीच सांगितल्या प्रमाणे तो आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळण्याची त्याची पात्रताच नाहीये.अत्यंत जुनाट विचाराचा आहे.पैसे कमावण्याचे त्याने अजमावलेले सगळे प्रयत्न फसलेत.त्यामुळे तो पैसे कमावणाऱ्या माणसावर जळतो.......”

“ आज सकाळी साडे सात च्या सुमारास  राजे त्याच्या अंथरुणात मृतावस्थेत आढळला.”  पाणिनी   त्याला मधेच तोडत म्हणाला.  “त्याने पांघरलेल्या चादरीवरूनच त्याला चाकुले भोसकण्यात आलंय. सकृत दर्शनी तो चाकू जेवणाच्या खोलीत असलेल्या कपाटाच्या ड्रॉवर मधून घेण्यात आला होता. ”

हे ऐकून विहंग गर्भगळित झाला.आपलं हात त्याने छाती वर नेऊन छाती दाबली, चोळली. पाय लटलट कापायला लागले. “ अरे देवा ! शक्य नाही हे.” तो उद्गारला.थरकापून त्याने  पाणिनी  चा हात आपल्या हातात घट्ट घरून ठेवला.

“ कधी घडलं? कसं झालं हे? ” घोगऱ्या स्वरात त्याने विचारलं

“ ते समजलं नाही.साडे सात च्या सुमाराला तो अशा अवस्थेत सापडला.”   पाणिनी  म्हणाला.

“ कोणाला दिसला तो प्रथम ? ”

“ मला.”   पाणिनी  म्हणाला.

“ तुम्हाला लक्षात कसं आलं हे घडल्याचं? ” विहंग ने विचारलं

“ सर्वात प्रथम तुझ्या अंथरुणात उशीखाली टोकदार चाकू सापडला आम्हाला. मग आम्ही त्या घरात रहायला आलेल्या प्रत्येकाची झडती घेतली,त्यांच्या त्यांच्या खोलीत जाऊन. ”

“ माझ्या उशीखाली चाकू ! ” विहंग जोरात ओरडला. पण  पाणिनी च्या नजरेला नजर न देता .

“ राजे आणि मरुद्गण यांनी आपापल्या खोल्यांची आदलाबदल करून घेतली काल रात्री हे तुला माहीत होत ? ”   पाणिनी  ने विचारलं

एखाद्या जखमी श्वापादासारखे घायाळ झालेले  डोळे  पाणिनी  कडे रोखत विहंग ने विचारलं,  “ बदलल्या होत्या खोल्या? ”

“ घरातल्या सगळ्यांनाच ते माहिती होत.ही केस कोर्टात उभी राहील तेव्हा सरकारी वकील असंच युक्तिवाद मांडतील की त्या खोलीत तुझा व्यावसायिक शत्रू मरुद्गण झोपला आहे असे समजूनच तू खून केलास , पांघरुणावरूनच तू त्याच्यावर वार केलास, आत कोण आहे याची खात्री न करता, ”   पाणिनी  म्हणाला.

“ असं कोर्टात खरंच बोललं जाईल? ”

“ शंभर टक्के.”

विहंग चे हात कंप पावायला लागले, त्याचा चेहेरा पुन्हा वाकडा झाला, हात तोंडावर फिरवून त्याने जणू तो सरळ करायचा प्रयत्न केला.

“ मी तुझी वकिली घ्यावी असं तुझं मत असेल तर तुला दोन गोष्टी कराव्या लागतील.”  पाणिनी  म्हणाला.   “ पाहिली गोष्ट म्हणजे तू हेतू पुरस्सर खून केला नाहीस ,त्या दृष्टीने तू निर्दोष असल्याचे  मला पटवावे लागेल.दुसरं म्हणजे तू  झटका आल्याचा  जो अविर्भाव करतो आहेस तो बंद करावा लागेल.  ”   पाणिनी  म्हणाला.  “ डॉक्टर खेर चं म्हणणं आहे या अभिनयाने तू सध्या डॉक्टर ला गंडवू शकशील पण मानसोपचार तज्ज्ञाला नाही. त्यामुळे असा अभिनय करून तू तुझी स्थिती कमकुवतच करतो आहेस हे लक्षात घे.”

त्याने एकदम आपल्या शरीराचा कंपवात होत असल्याचा अभिनय थांबवला. “ मी असं केलं तर त्याने काय होणार आहे? ”

“ तू हे कशासाठी करत होतास? ”

“......”

“ बोल, का करत होतास? ”  पाणिनी  ने विचारलं  “ तुला अत्ता वरून विमान खाली उतरताना दिसलं असेल. त्यातून शंभर टक्के पोलीस खाली उतरतील, तेव्हा वेळ कमी आहे, लौकर आणि खरं सांग काय ते ”

“ कारण....... कारण ... मला माहीत होतं की मी झोपेत चालायला लागलोय पुन्हा. माल फार भीती वाटत होती.” विहंग म्हणाला.

“ कसली भीती? ”   पाणिनी  ने विचारलं

“ की ,मी नेमकी नको ती गोष्ट करीन की काय ! ” विहंग उद्गारला.

“ राजे ला मारण्याची ? ”

“ नाही , मरुद्गण  ला.” –विहंग

“ आता तू बरोबर लायनी वर येऊन बोलायला लागला आहेस. ”  पाणिनी  ने सिगारेट काढून त्याला दिली. विहंग ने मानेनेच नकार दिला.

“ बोल पटकन.”  पाणिनी  म्हणाला

विहंग ने इकडे तिकडे बघून कानोसा घेतला.

“ बोल पटकन.”  पाणिनी  म्हणाला “ या जागे एवढी सुरक्षित जागा आणि या वेळे एवढी सोयीस्कर वेळ पुन्हा मिळणार नाही तुला. पोलीस कोणत्याही क्षणी तुझ्या पर्यंत पोचतील.”

“ देवालाच माहीत मी झोपेत चालतो तेव्हा काय घडतं ते.” विहंग हताश पणे म्हणाला.

“ तू राजे ला मारलं आहेस? ”  पाणिनी  म्हणाला.

“ देवाला स्मरून सांगतो , मला नाही माहीत ! ”

“ तुला काय सांगता येईल मग? ”  पाणिनी  म्हणाला.

“ मला एवढंच माहिती आहे की लहान पण पासून मला झोपेत चालायची सवय आहे.या आधी  एक वर्षापूर्वी  मी झोपेत  चाललो होतो. जेव्हा मला आत्यंतिक नैराश्य येतं आणि मानसिक संतुलन बिघडतं तेव्हा मी असा चालतो.पौर्णिमा असेल त्या रात्री हे घडतं विशेष करून.”

“ बोल पुढे.”

“ मला आठवतंय, वर्षापूर्वी मी जेव्हा असाच झोपेत चाललो , तेव्हा एक टोकदार चाकू मला हातात मिळाला होता.मला खूप भीती वाटली, मला कळत नव्हतं  या चाकूचं मी नेमकं काय करायचं आहे. ”

“ तुझ्या बायकोला, शेफाली ला मारायचा विचार होता तेव्हा? ”  पाणिनी  म्हणाला.

विहंग ने मानेने होकार दिला.

“ कालच्या प्रकारा बद्दल बोल.”  पाणिनी  म्हणाला.

“ काल मी पुन्हा झोपेत चाललो. जेवणाच्या खोलीतल्या टेबलाच्या खणातून मी चाकू घेतला. झोपेतच.कोणाला मारायचा माझा हेतू नव्हता.असला तरी मला त्या हेतू पासून परावृत्त केलं गेलं.” विहंग म्हणाला

“ असं का वाटतंय तुला? ”  पाणिनी  म्हणाला

“ कारण तो चाकू माझ्या उशीखाली दिसला जेव्हा मी सकाळी जागा झालो तेव्हा.” विहंग म्हणाला.

“ म्हणजे तुला हे माहीत झालं होत तर त्यावेळी ! ”  पाणिनी  म्हणाला

“ हो. ”

“ त्या नंतर काय काय घडलं तुला माहिती आहे? ”  पाणिनी  म्हणाला.

“ काय घडलं असावं याचा मी अंदाज बांधला.मी आंघोळ करायला गेलो.परत आलो तर उशीखाली चाकू नव्हता. त्या वेळी आर्या ला माझी फार काळजी वाटत होती असं माझ्या लक्षात आलं. मी रात्री झोपलो तेव्हा माझ्या खोलीच्या दाराला बाहेरून कुलूप लावलं होत कोणीतरी.”

“ तेव्हा तुला कळलं होतं तर ! ”  पाणिनी  म्हणाला

“ हो.समजले मला.मला झोप लागली नव्हती. बाहेरून कुलप लावल्याचा आवाज मी ऐकला.” विहंग म्हणाला.

“ आणि तू अंदाज बांधलास की आर्या ने कुलूप लावले असावे.”  पाणिनी  म्हणाला

“मला खात्रीच होती की आर्या ने हे केले असावे.”

“ मग पुढे काय केलसं तू? ”

“ मी खूप निराश झालोय आणि प्रचंड मानसिक तणावा खाली आहे हे तुम्हाला आणि डॉक्टरांना  दाखवण्यासाठी मी शरीराला कंप सुटल्याचा अभिनय” करायला लागलो.”

“ त्यापेक्षा तू पोलिसांकडे किंवा सुधार केंद्रात का नाही गेलास?” पाणिनी  म्हणाला.

विहंग ने आपली बोटे एवढी पिरगळली की त्याचा हात पांढरा पडला.

“ ओह ! का नाही गेलो मी ! खरंच का नाही गेलो मी ? मी विचार करत राहिलो की सगळं काही ठीक होईल कालांतराने.मी सांगतो तुम्हाला, मी तो धारदार चाकू माझ्या उशीखाली ठेवला होता पण मी काही कोणाचा खून वगैरे नाही केला त्यांनी. त्यामुळे मला वाटत राहील की जरी मला झोपेत चालायची आणि उशीखाली चाकू ठेवायची सवय लागली असली तरी मी त्याचा वापर करणार नाही.या गोष्टीचा मला आत्म विश्वास वाटायला लागला. तुम्ही स्वतःला माझ्या जागी आहात असे समजा, मी आर्थिक दृष्टीने सधन आहे.माझ्या बायकोला माझी संपत्ती हडप करायची आहे.मला आरोग्य सुधार केंद्रात टाकावं अशी तिची इच्छा आहे , या स्थितीत मी काहीही चुकीची कृती करणे म्हणजे तिच्या सापळ्यात अडकल्या सारखे ठरणार, या गोष्टीचेच मला दडपण होते. पण मी तुमचा सल्ला घेतला आणि अनुभवलं की किती समर्थ पणाने तुम्ही हे सर्व हाताळत आहात.मी अतीशय निश्चिंत झालो आणि खर तर त्याच आनंदात मी गाढ झोपलो काल रात्री. मी माझ्या आणि  लीना माईणकर च्या लग्नाच्या विचारात एवढा गुंतलो गेलो होतो की गजर वाजला तेव्हाच मला जाग आली , मी उठताना उशीखाली पाहिले सुध्दा नाही.”

“ ठीक आहे , तू मला  सांगितलेले सर्व खरे असेल, तर तुझी हकीगत पोलिसांना सांग खुशाल. पण तुझ्या बायकोला म्हणजे शेफाली ला वाटतंय त्या प्रमाणे कोणाचा तरी खून करण्यासाठी तू हे झोपेत चालायचे नाटक करत असशील तर मला अत्ताच सांग स्पष्ट पणे.”  पाणिनी  म्हणाला

“ मी सर्व काही खरंच सांगतोय.” विहंग उत्तरला.

 पाणिनी  च्या अंदाजाप्रमाणेच घडले. नुकत्याच खाली उतरलेल्या विमानातून इन्स्पे.इन्स्पे.होळकर उतरला.तो दिसताच  पाणिनी ने त्याला हात करून बोलावले. पण तो एकटा नव्हता, त्याच्या बरोबर भोपटकर पण आला होता.

“ काय आहे ही भानगड ? ” विहंग खोपकर ने अर्धवट बसक्या आवाजात विचारले.

“ तुझी सगळी च्या सगळी हकीगत या दोघांना सांग.”  पाणिनी  म्हणाला   “ आणि वर्तमान पत्रकारानाही सांग. आपण याला मोठी प्रसिद्धी देऊ !”

“ तू काय झक मारतो आहेस इथे ? ” इन्स्पे.होळकर  पाणिनी  ला म्हणाला.”

 पाणिनी  आरामात हसत इन्स्पे.होळकर ला म्हणाला,

 “ तुझी माझ्या अशीलाशी ओळख करून देतो , हा आहे विहंग खोपकर.”

(प्रकरण ११ समाप्त)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel