प्रकरण पंधरा

 पाणिनी  च्या सुचने प्रमाणे  कनक ओजस ने प्रांजल वाकनीस ला  पाणिनी  च्या ऑफिसात हजर केलं होत ! अत्ता या क्षणी  ती  पाणिनी  समोर गुबगुबीत खुर्चीत बसली होती.

“ तुला हे विचारायला बोलावलंय की विहंग खोपकर साठी  काही करायची इच्छा आहे का? ”  पाणिनी म्हणाला..

“ अर्थातच.” 

“ तू निराश दिसतेस ”  पाणिनी म्हणाला.

“ निराश नाही नाराज आहे.का होऊ नये मी नाराज? अचानक एक माणूस माझ्या खांद्यावर हात ठेवतो आणि सांगतो अत्ताच्या अत्ता मी  पाणिनी  पटवर्धन ना भेटायला जायचं आहे.विचार करायला मला वेळ ही न देता अक्षरश: तो मला गाठोडं उचलल्या सारखं उचलून इथे आणतो याचा काय अर्थ समजायचा मी? ” प्रांजल वाकनीस म्हणाली.

“उदित पेंढारकर शी तुझं लग्न ठरलंय ना? ” तिच्या चिडचिडी कडे लक्ष न देता  पाणिनी म्हणाला..

“ या प्रकरणाशी त्याचा संबंध आहे ? ” तिने म्हंटलं

“ हो,आहे.”

“ ठीक.ठरलंय लग्न.साखरपुडा आधीच झालाय आमचा.”   -प्रांजल

“ लग्न का नाही केलं अजून? ”

“ मला माझी खाजगी बाब चर्चा केलेली आवडत नाही.”  - प्रांजल

“ मी समजत होतो की खोपकर ला मदत करायची  तुला इच्छा आहे.”

“ माझ्या खाजगी गोष्टीत तुम्ही नाक खुपसल्या मुळे माझ्या कडून विहंग खोपकर ला कशी मदत होणार ? ” प्रांजल  चिडून म्हणाली

“ मी हमी देतो तुला, तशी.”  पाणिनी म्हणाला.

“ आम्ही.....आम्ही.. आर्थिक परिस्थिती मुळे लग्न नाही केलं अजून.”--- प्रांजल

“ पण त्याचं हार्डवेअर चं दुकान आहे ना? ”

“ हो आहे.”

“ फारसं चालत नाही का? ”  पाणिनी म्हणाला..

“ आर्थिक अडचणीत आहे धंदा.कोणाच्या तरी सांगण्यावरून गरजे पेक्षा जास्त माल खरेदी करून ठेवला त्याने आणि आता तो विकला जात नाहीये.काही महिने घालवायला लागतील त्याला यातून बाहेर यायला..या सर्वांशी तुम्हाला देणं घेणं असेल तर माझं हे उत्तर आहे.” अजूनही ती चिडलेलीच होती.

“ शांत हो.”  पाणिनी  म्हणाला.सवयी नुसार आपली बोटे त्याने टेबलावर तबला वाजवल्या सारखी वाजवली.

“ तू खोपकर च्या घरात राहतेस ना? ”  पाणिनी म्हणाला..

“ अर्थात.त्याचा काय संबंध? ”

“ अजून पोलीस आहेत का तिथे ? ”

“ दुपार पर्यंत होते तिथे,अनेक फोटो घेत होते,मोजमापं घेत होते,नकाशे काढत होते. ” ती म्हणाली 

“ मी तुला या केस मधली माझी विचारसरणी सांगतो.विहंग खोपकर यात अडचणीत आलाय हे खरं आहे पण सर्व शंकांचं निरसन होत नाही तो पर्यंत त्याला खुनात दोषी धरलं जाणार नाही.दुर्वास ने पोलिसांना जबाब दिला नसता तर पोलिसांच्या हातात काहीच नव्हतं.दुर्वास साक्षीदाराच्या पिंजऱ्यात कदाचित जबाबात सांगीतल्याहून वेगळे सुध्दा बोलेल.”  पाणिनी म्हणाला.

“ बर मग? ”   -प्रांजल

“साध्या साक्षीदाराला उलट  तपासणीत सापळ्यात अडकवता येत.दुर्वास हा वकील आहे.कोर्टात वापरल्या जाणाऱ्या तांत्रिक गोष्टींचे ज्ञान त्याला आहे.साध्या साध्या युक्त्यांना फसणारा तो नाही. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबाला पूरक असा परिस्थितीजन्य पुरावा ही आहे.  मी जर त्याची साक्ष उलट तपासणीत उलटी पालटी करू शकलो नाही तर मला विहंग च्या झोपेत चालायच्या सवयीचा मुद्दा पुढे आणावा लागेल.पण त्यामुळे विहंग ला शिक्षा कमी होईल एवढंच.त्याला निर्दोष  सोडवायला  दुर्वास ची साक्ष भेदणे हाच पर्याय आहे. ”  पाणिनी म्हणाला.

प्रांजल काहीतरी बोलणार होती पण  पाणिनी  पुढे बोलतो आहे हे पाहून ती गप्प झाली.

“ प्रांजल, विहंग ची बायको, शेफाली, अशी साक्ष द्यायची शक्यता आहे की  झोपेत चालणे वगैरे विहंग करत असलेले नाटक आहे. तो झोपेत चालण्याचे नाटकं करतो तेव्हा पूर्ण पणे शुद्धीत असतो.आपण हेतू पुरस्सर खून नाही केलं,झोपेत घडला अस भासवण्यासाठी.अर्थात एवढया स्पष्टपणे ती नाही साक्ष देणार पण न्यायाधीशांपर्यंत ती हे विचार नक्कीच  पोचवून त्यांचे मत कलुषित करू शकेल.  ”  पाणिनी म्हणाला.

“ बरं, पुढे? ” प्रांजल म्हणाली.तिला आता या सर्वात खूप रस वाटायला लागला होता.

“” एका टोकदार सुऱ्याने किंवा चाकूने खून झालाय.या चाकुची जोडी टेबलाच्या ड्रॉवर मधील फोर्क शी जुळत्ये.”  पाणिनी म्हणाला.

“ बर मग? ” प्रांजल ने त्याला पुढे बोलायला उद्युक्त केलं.

“ सरकारी वकिलांनी जर सिध्द केलं की विहंग ने झोपायला जाण्यापूर्वीच ड्रॉवर मधून तो चाकू काढून घेतला होता, तर विहंग ला सोडवणे मला कठीण जाईल. ”

हेलेन ने प्रश्नार्थक मुद्रेने  पाणिनी  कडे पाहिले. “ माझ्या कडून नेमकं काय हवंय तुम्हाला? ”

“ मी माझे सगळे पत्ते टेबल वर ठेवतो तुझ्या समोर.”  पाणिनी  म्हणाला.  “ ज्या चाकूने खून झाला तसाच्या तसा एक चाकू मला हवाय.”

“ पण ते कसं शक्य आहे? ” प्रांजल ने विचारले.

“ शक्य आहे.”  पाणिनी म्हणाला.  “हार्डवेअरच्या क्षेत्रातील माणसाने जर चाकू बनवणाऱ्या कंपनीशी संपर्क करून चाकूचा मेक , मॉडेल नंबर विचारून घेतला तर जमेल ”

“ पण आता तो चाकू तर पोलिसांच्या ताब्यात असेल ना? मग मग उत्पादन करणाऱ्या कंपनीची माहिती कशी मिळेल? ” प्रांजल ने शंका विचारली

“ तेच म्हणतोय मी, चाकूच्या जोडी मधील फोर्क, म्हणजे काटा-चमचा त्या ड्रॉवर मधे आहे अजून.”  पाणिनी म्हणाला. आणि त्याने अर्थपूर्ण नजरेने प्रांजल कडे पाहिले.

“ आणि उदित पेंढारकर हा हार्डवेअर च्या धंद्यात आहे म्हणून त्याने तसाच चाकू आणि फोर्क ची जोडी मिळवावी असं तुमचं म्हणणं आहे ?  ” तिने विचारलं.  “ आणि... नंतर...?...”

“ तेवढंच.बाकी काही नाही.” पाणिनी म्हणाला.

“ चाकू मिळाल्यावर काय करायचं त्याने? ”

“ त्याने तो तुला द्यायचा.”  पाणिनी म्हणाला.

“ आणि मी काय करणार तो घेऊन? ”

“ मला द्यायचा.”  पाणिनी म्हणाला.

“ अरेच्च्या ! ” ती उद्गारली.  “ तुम्ही काय करणार तो घेऊन? ”

“ कदाचित माझ्या बचावाचा, उलट तपासणी चा, मुख्य मुद्दा असेल तो.”

“ हे सगळ बेकायदा किंवा अनाधिकृत ठरणार नाही का? ” तिने घाबरून विचारलं. “ उदित ला अडचणीत आणायचं नाही मला.”

“ मी त्याचा वापर काय करणार यावर ते ठरेल,पण मी हमी देतो की तुम्हा दोघांनाही मी अडचणीत आणणार नाही. ”  पाणिनी म्हणाला.

“ उदित हा फार प्रामाणिक आणि तत्वाने जगणारा माणूस आहे.झटपट श्रीमंत होण्यासाठी काही करणे बेकायदा वागणे त्याला मान्य नाही.”

 पाणिनी  काहीच बोलला नाही.शांत पणे त्याने सिगारेट काढली.आणि पेटवली.

“ मला तुम्ही अडचणीत आणताय ,पटवर्धन. तुम्हाला नाही वाटत तसं? ”

 पाणिनी   पुन्हा काही  बोलता धुराची वलय सोडत बसला.

ती एकदम खुर्चीतून उठून उभी राहिली. काहीतरी निर्णय घेऊन म्हणाली,

“ कधी हवंय तुम्हाला तो चाकू मिस्टर पटवर्धन? ”

“ लौकरात लौकर.”  पाणिनी म्हणाला.

“ म्हणजे आज संध्याकाळीच ? ”

“ फारच उत्तम.”

“ तुम्हाला कुठे भेटायचं? ”

“ मी इथेच ऑफिस मधे असेन.”  पाणिनी म्हणाला.

तिने आपले ओठ घट्ट दाबून धरले.त्यात एक निश्चय होता.

“ ठीक आहे, मी बघते काय करायचं ते.” ती म्हणाली.

“ जरा आणखी एक,प्रांजल, मला अजून एक दोन गोष्टी विचारायच्या आहेत तुला.”  पाणिनी म्हणाला.

“ कशा बद्दल? ”

“ आर्या च्या बेड रूम च्या दर बद्दल.” पाणिनी म्हणाला.

“ त्यात काय? ”

“ मला तिच्या खोलीत जायचा प्रसंग आला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की तिच्या खोलीच्या दाराला अत्यंत महागडं असं  लॅच आहे. ”

“ त्यात वेगळं वाटण्यासारखं काय आहे? आपली प्रायव्हसी जपण्याचा अधिकार प्रत्येक मुलीला असलाच पाहिजे.” प्रांजल म्हणाली.

“ ते लॅच प्रथम पासून तिथे नव्हतं हे लक्षात येते. कधी लावलं असावं तिने ते? ”  पाणिनी म्हणाला..

“ मला आठवतंय त्या नुसार, महिन्यापूर्वी.”

“ ते बसवून घेताना तिने काही कारण सांगितलं का तुला? ”

“ कशासाठी ती मला कारण सांगेल? ” 

“ जेव्हा एखादी तरुणी अशा प्रकारे महागडं असं  लॅच लावून घेते, तेव्हा एक तर ती निराशेने ग्रस्त असते किंवा तिच्यावर काही अतिप्रसंग झाल्याची घटना घडलेली असू शकते. ”  पाणिनी म्हणाला.

“ तुम्ही हे सर्व तिलाच का नाही विचारत? ”

“ मी विचार केला की तू मला सांगशील.” पाणिनी म्हणाला.

“ मी नाही सांगू शकत.”

“ शकत नाहीसं की सांगणार नाहीस?”  पाणिनी म्हणाला..

“ शकत नाही.” ती म्हणाली

 पाणिनी  धुराच्या वलया कडे पहात राहिला.  “ उद्या सकाळी दहा वाजता चाकू घेऊन ये.”

“ मला नाही वाटत आपल्याला हुबेहूब तसाच चाकू मिळेल.”

“ जास्तीत जास्त प्रयत्न कर.”   पाणिनी म्हणाला.  “ मला असा चाकू हवाय जो जणू काही त्या सेट मधल्या चाकूशी जुळेल.”  पाणिनी म्हणाला.

“पाहते.” तिने सांगितलं.  “ पण लक्षात ठेवा हे मी जे काही करते आहे ते विहंग साठी.ते फार सांभाळून घेणारे आहे सर्वांना.त्यांच्यासाठी काही करायला काहीच वाटत नाही.” 

 पाणिनी  ने मन डोलावली आणि तिला दारापर्यंत सोडलं.तिच्या उंच टाचांच्या बुटांचा आवाज कॉरीडोर मधून येत –येत हळूहळू मंदावत गेला . सौम्या आत आली.

“ आमच्यात झालेल्या चर्चेच्या नोट्स तू घेतल्यास ना? ”  पाणिनी म्हणाला..

“ शब्द न् शब्द.” सौम्या म्हणाली.तिच्या आवाजात काळजीची छटा होती. पाणिनी  च्या हातावर

 हात ठेऊन तिने  विचारलं, “ तुम्ही सर्वार्थाने तिच्या वरच अवलंबून आहात का?  मला तर ती मूर्ख वाटत्ये.म्हणजे ज्याच्या प्रेमात पडल्ये त्याच्या साठी वेडी झालेली वाटत्ये.त्याला धोका आहे असं तिला ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी ती तुम्हाला सुध्दा धोका द्यायला मागे पुढे पाहणार नाही.”

 पाणिनी  खुर्चीतून उठून उभा राहिला आणि विचारत पडून फेऱ्या मारायला लागला.

“ सर, प्लीज, ” सौम्या म्हणाली.  “ तुमच्या अत्ता पर्यंतच्या केसेस वेगळ्या होत्या.तुमचं अशील निरपराध असायचं.हे प्रकरण वेगळ आहे. इथे तुमच्या अशिलाने खून केला असायची शक्यता खूप वाटत्ये.फक्त त्याला खुनासाठी उद्देश नव्हता ही एकच लंगडी सबब तुमच्या उपयोगी आहे.”

“ म्हणून काय ? ”  पाणिनी म्हणाला..  

“ म्हणजे त्यांच्या मदतीवर, त्यांच्या विश्वासावर का अवलंबून राहताय तुम्ही? ” –सौम्या

“ तुला माहित्ये,सौम्या, एवढया प्रकरणात धोका स्वीकारला नाही मी असं एक तरी प्रकरण होत का? माझी हीच पद्धत आहे, असचं मला आवडतं ”   पाणिनी म्हणाला.

“ अहो पण तुमच्या लक्षात येत नाही का.......”

चालता चालता  पाणिनी  थांबला, सौम्या च्या कंबरेभोवती हात लपेटून म्हणाला, “ मला सुधारण्याचा नको ना प्रयत्न करू !  माझं यशाच गुपित हेच आहे, धोका स्वीकारणे, तातडीने निर्णय घेणे,जलद हालचाली करणे आणि शत्रूच्या पुढे चार हात उडी मारणे.”

“ पण त्यांनी तुम्हाला हे करताना पकडलं तर? ”  -सौम्या

“ सौम्या, क्रिकेट मधे हातात बॅट घेऊन उभं राहिल्यावर,आपल्याला येणारा चेंडू अवघड येईल की सोपा याचा विचार करत बसाल तर दांडी उडेल.आपलं हेतू षटकार मारायचाच हवा म्हणजे शरीर बरोबर तशाच हालचाली करतं.”

सौम्या कसंनुसं हसली. “ बरं बरं , ठीक आहे.बोलण्यात तुम्ही ऐकणार थोडेच !”

“ चल तर मग सौम्या, उडी मारायला तयार हो माझ्या बरोबरीने. ”  पाणिनी म्हणाला. दारावर टकटक झाली. “ कनक ला घे आत , आणि आर्या ला फोन कर.तिला सांग उद्या पावणे दहाला ऑफिस ला ये.”

“  पाणिनी , सौम्या हल्ली तिची कामं नीट करत नाही.” आत आल्यावर  पाणिनी  कडे रोखून पहात ओजस म्हणाला.

 पाणिनी  ने कपाळावर आठ्या पाडून  त्याच्या कडे पाहिले. 

“तुझ्या ओठांचं लिप स्टिक पुसायचं राहिलंय ” चेहेऱ्यावर कोणतेही भाव न आणता ओजस म्हणाला.

“ मुद्द्याचं बोल.”  पाणिनी म्हणाला.

“ माझ्या माणसाने अहवाल दिलाय की मरुद्गण आणि दुर्वास ची शेफाली आणि तिच्या वकिलाशी  अनेक वेळा खूप प्रदीर्घ चर्चा झाल्ये.”

“ केव्हा पासून? ”

“ ते पहिल्यांदा ऑफिस मधे भेटल्या पासून.ती प्रथम बाहेर पडली.पंधरा मिनिटांनी दुर्वास आणि मरुद्गण बाहेर गेले. तिच्या वकीलांची फर्म ज्या मजल्यावर आहे त्या मजल्यावर लिफ्ट न् घेता ते दोघे दोन मजले चढून वर गेले आणि लिफ्ट ने खाली आले.खाली एक सलून आहे.तिथे केस कापण्यात आणि फेशियल करण्यात त्यांनी मुद्दाम वेळ घालवला.नंतर दोघे जण वेगळे वेगळे बाहेर पडले.फार पद्धतशीर पणे प्लान केलं होता.” 

ओजस आत आल्यावर सौम्या बाहेर गेली होती , ती परत  आत आली.  “  सर ,  तुम्ही ज्याला उद्या ऑफिसात बोलावले होते ती व्यक्ती बरोबर  वेळेत येणार आहे.”

“ धन्यवाद सौम्या,”  पाणिनी  तिच्याकडे न बघता म्हणाला. “ कनक, याचा अर्थ मरुद्गण  सरळ सरळ नाकारेल की त्याने रात्री तीन ला शेफाली  ला फोन केला होता म्हणून. ”

“हर्षद चांगली साक्ष देईल? ” कनक ओजस ने विचारलं.

“ मला वाटतंय तसं. तो स्पष्ट वक्ता आहे आणि त्याला नोंदी करून ठेवायची सवय आहे.अगदी सेकंदा सेकंदा च्या नोंदी त्याच्याकडे आहेत.मुख्य म्हणजे त्याने रात्रीच्या फोन  बाबत नोंद करून ठेवलेली वेळ ही टेलिफोन कंपनीच्या रेकोर्ड शी जुळते.  ”  पाणिनी म्हणाला.

“ तसं असेल तर मरुद्गण ने फोन बद्दल नाकारणेच तुला फायदेशीर आहे, म्हणजे तू त्याला खोटे ठरवू शकशील.”  -ओजस

“ खरं आहे, त्याला फोन बद्दल नाकारायला लावायच्या मोहात पाडायचे आणि नंतर हळूच त्याच्या तोंडावर टेलिफोन कंपनीचे रेकोर्ड मारायचे.त्याला जोड म्हणून हर्षद ची साक्ष काढायची.”  पाणिनी म्हणाला.  “ अजून काय सांगण्यासारखं? ”

“   पाणिनी ,दुर्वास बाबत तुझा कयास खरा निघाला.”

“ कोणता ? ”

“ डोळ्यांच्या डॉक्टरांबाबत ”

“ तो गेला होता त्यांच्याकडे? ”   पाणिनी म्हणाला..

“ गेला होता नाही, अत्ता या क्षणी तो आहे डॉक्टर कडे.”

“ अत्ता या वेळेला? ”

“ हो, सरकारी वकिलांनीच सांगितलं डॉक्टर कडे जायला त्याला आणि डॉक्टर ना त्यांनीच हजर रहायला ला सांगितलं क्लिनिक मधे.”  -ओजस म्हणाला.

“ बहुतेक सरकारी वकिलांसमोर त्याने चष्म्याच्या खालच्या बाजूने आणि हात लांब करून काहीतरी वाचलं असेल आणि वकिलांच्या लक्षात आलं असेल की असा प्रकार साक्षीदाराच्या पिंजऱ्यात घडला तर त्याची काय अवस्था होईल.”  पाणिनी म्हणाला.

“ बस, सध्या एवढंच आहे सांगण्या सारखं.नवीन काय घडलं आणि कळल तर तुला कळवीनच ”  -ओजस

ओजस गेल्यावर  पाणिनी  ने पुन्हा फेऱ्या मारायला सुरुवात केली. “काय घाणेरडं प्रकरण आहे ! सगळे तुकडे एकमेकांशी जुळतायत पण तरीही त्यातून काही अर्थ निघत नाही.”  पाणिनी  मनाशी म्हणाला.

 

( प्रकरण १५ समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel