‘बरे. तू पैसे नेलेस. पुढे?’
‘मी पैसे घेऊन आले नि ते मालकिणीजवळ दिले. आणि त्याने जाताना मला आपल्याबरोबर नेले.’
‘आणि पेल्यातून तू पूड दिलीस?’
‘हो.’
‘का दिलीस?’
ती लाजली; परंतु म्हणाली, ‘तो मला जाऊ देईना. मी गळून गेले होते. मी गॅलरीत रामधनला म्हटले, ‘माझ्या डोळयांवर झोप आहे. थकले आहे मी. हा जाऊ देत नाही. करू तरी काय?’ तेव्हा तो म्हणाला, ‘आम्हांलाही याचा कंटाळा आला आहे. सारखी याची कामे. फार सतावतो. त्याला झोपेचा घोट द्यावा असे आम्हांसही वाटत होते. तू देतेस? तो झोपेल. तो झोपला म्हणजे तू जा.’
‘अस्स. ठीक. पुढे?’
‘मला वाटले ती पूड निरूपद्रवी असेल. मी खोलीत गेले. त्याने ब्रँडी मागितली. मी बाटली ओतून तिच्यांत ती पूड टाकून त्याला दिली. ती पूड म्हणजे विष आहे असे मला माहीत असते, तर मी ती दिली नसती.’
‘आणि अंगठी कशी आली?’
‘त्यानेच ती दिली.’
‘केव्हा?’
‘त्याच्या खोलींत तेव्हा त्याच्याबरोबर अनिच्छेने मी पुन्हा आले, मी अनिच्छा दर्शविली, तेव्हा त्याने माझ्या डोक्यावर तडाखा दिला. मी संतापले. तो वरमला. त्याने ती अंगठी दिली.’
‘त्याच्या खोलीत किती वेळ होतीस?’
‘मला आठवत नाही.’
‘व्यापार्याला सोडल्यावर दुसरीकडे कोठे गेलीस का?’
‘मी जवळच्या रिकाम्या खोलीत गेले.’
‘का?’
‘जरा विसावा घ्यायला. गाडी येईपर्यंत तेथे बसले.’
‘रामधन कोठे होता?’
‘तोही आला. त्याने उरलेली दारू घेतली.’
‘तू त्याच्याजवळ काही बोललीस?’