डॉक्टर आला.
‘सारे संपले.’ त्याने तपासून सांगितले.
‘नीट तपासा.’ अधिकारी म्हणाला.
‘इतके दिवस धंदा करतो आहे. हजामती नाही करीत.’ डॉक्टर अभिमानाने म्हणाला.
‘नेऊ त्याला खाली. उद्या मूठमाती देऊ.’
‘न्या.’
निर्णय देऊन डॉक्टर गेले. ते प्रेत उचलून खाली तळघरात नेऊन ठेवणार होते. प्रताप पाठोपाठ जात होता.
‘तुम्हांला काय पाहिजे?’ कोणी त्याला हटकले.
‘काही नको.’ तो म्हणाला.
‘जा मागे. येऊ नका.’
प्रताप मागे फिरला. तो पोलीस चौकीतून बाहेर आला. ती गाडी धुऊन स्वच्छ करण्यात आली होती. प्रताप तिच्यात बसणार तो पुन्हा एक कैदी आणण्यात आला. तोही उन्हाच्या झळीने पडला होता. त्याचेही प्राण गेले होते. हा दुसरा कैदी. पुन्हा डॉक्टर आला.
‘कशाला मेलेल्यांना तपासायला मला बोलावता?’ तो म्हणाला.
‘तेच तर तुमचे काम, मेला, असे तुम्ही सांगितले की, आम्हाला पुढचे सारे करता येते. तुमच्या सर्टिफिकिटाशिवाय मनुष्य मरत नसतो.’
‘बरे तर. हा मेला.’
‘का असे कैदी मरत आहेत?’ प्रतापने विचारले.
‘अहो, आज उन्हाळा किती आहे! अशा उन्हात का यांनी कैद्यांना काढायचे? परंतु यांची तारीख ठरलेली असते. मग ऊन असो, पाऊस असो, थंडी असो. निर्जीव यंत्राप्रमाणे काम. हा म्हणेल त्यांचा हुकूम, तो म्हणेल त्यांचा! सारे कायद्याने जाणारे. जबाबदार कोणीच नाही. हे कैदी तुरुंगातील कोठडयांतून बंद असतात. नाही लागत ऊन, नाही वारा. आणि एकदम बाहेर काढतात. नाही कोणाला सोसत. मरतात, तुम्ही कोण?’
‘असाच एक कोणीतरी?’
‘अच्छा, मला वेळ नाही.’ असे म्हणून डॉक्टर गेला. प्रतापही विचार करीत बाहेर पडला. त्याला स्टेशनावर पोचायचे होते. तो गाडीत बसला. आला स्टेशनवर. ती कैद्यांची खास गाडी तयार होती. प्रत्येक डब्यांत खच्चून कैदी कोंबण्यात आले होते. प्रताप घाईघाईने रूपा कोठे आहे पाहू लागला. कोणी त्याला अडवले. त्याने त्याच्या मुठीत एक नोट कोंबली.
‘जा, परंतु लौकर आटपा.’ तो अधिकारी म्हणाला आणि त्याला रूपा दिसली. तिने त्याच्याकडे पाहिले.
‘किती उकडते आहे.’ ती म्हणाली.
‘मी पाठविलेल्या वस्तू मिळाल्या?’ त्याने विचारले.
‘हो. मी आभारी आहे. किती तुम्ही माझ्यासाठी करता!’ ती म्हणाली.