प्रतापला त्या राजकीय कैद्यांमध्ये जायला परवानगी मिळाली. अरूणामुळे रूपाला त्यांच्यात राहायला मिळाले म्हणून प्रतापला समाधान वाटले. रूपाच्या चेहर्यावर त्याला छचोरपणा दिसत नव्हता. निराळीच रूपा त्याला दिसू लागली. त्याने तिच्याकडे पाहिजे. तिने त्याच्याकडे पाहिले. एक राजकीय कैदी जरा आजारी होता. त्याला कफ झाला होता. अंगांत ताप होता. त्याचे वय फार नसेल, असेल वीस-पंचवीस वर्षांचे. डोळे विलक्षण तेजस्वी होते. जणू सारी स्मरणशक्ती, संकल्पशक्ती या डोळयांत येऊन संचारली होती. त्याचे नाव रमण.
बाकीची मंडळी जेवायला गेली.
‘तुम्ही येता जेवायला? रूपाने येऊन विचारले.
‘मी फळेच खाणार आहे. या तरूणाजवळ मी बसतो. तुम्ही जा. जेवा सारी. तू आनंदात आहेस रूपा?’
‘हो.’
‘मला तुझ्याजवळ बोलायचे आहे.’
‘आता नको बोलणे. बोलायचे अजून काय शिल्लक राहिले आहे?’
‘मी दिलेला शब्द विसरलो नाही. तुझी शिक्षा साधी झाली आहे. आपण एकत्र राहू शकू. मी तुझ्याजवळ विवाह लावीन म्हटले होते. तुला आठवतात ना ते शब्द?’
‘मी जाते.’
ती गेली. प्रताप त्या आजारी तरूणाजवळ बसला. गार वारा सुटला होता. हवेत मनस्वी गारठा होता. प्रतापने आपला ओव्हरकोट त्या तरूणाच्या अंगावर घातला.
‘नको, मला सहन होत नाही. बसा जवळ. तुम्ही प्रतिष्ठित दिसता. परंतु तुमचे हृदय उदार आहे. सार्या गोष्टी आम्हांला कळल्या आहेत. तुमची मानवता मेलेली नाही हे पाहून आनंद वाटला. तुम्हांला आम्हा राजकीय तरूणांविषयी प्रेम वाटते का? आमच्याविषयी प्रतिष्ठित श्रीमंत लोकांत नाना प्रकारचे ग्रह असतात. कोणी आम्हाला निरुद्योगी समजतो; कोणी आम्हांला प्रेमभंग झाल्यामुळे निराश होऊन देशभक्तीकडे वळले म्हणतो; कोणी आम्हांला वेडे समजतात; तर कोणी अव्यवहारी मानतात. तुम्ही या लोकांपैकी नसाल. आम्ही तरूण क्रांतिकारक का होतो! परिस्थितीच आम्हांला बनवते. मीच बघा. मी एक विद्यार्थी होतो. विश्वाचे कोडे उलगडावे मला वाटे. विज्ञानाच्या साधनाने विश्वाचा उलगडा होईल का? शोध करावा, शिकावे, प्रयोग करावा असे मनात येई. एकदा काही विद्यार्थ्यांनी माझ्याजवळ मदत मागितली. एक गुप्त मंडळ होते. राजकीय स्वातंत्र्यासाठी अधिकार्यांचे खून पाडावे, दहशत बसवावी असे मानणारे ते तरूण. मला तो मार्ग पसंत नव्हता. खरे म्हणजे किडासुध्दा मला विश्वशक्तीची अपूर्व कलाकृती वाटे. तो एक लहान किडा! परंतु त्या विद्यार्थ्यांना वर्षाचा इतिहास त्याच्या रजनेत सामावलेला. परंतु त्या विद्यार्थ्यांना लाजेमुळे मी नाही म्हणू शकलो नाही. मी भित्रा आहे असे हे म्हणतील असे मनात येऊन मी पैसे दिले. पुढे धरपकडी झाल्या. मदत देणारांची यादी सापडली. माझेही तिच्यांत नाव होते. मलाही अटक झाली.