‘परंतु खंड काय घेणार? खंडापायी मेटाकुटीस येतो जीव.’
‘अगदी कमी खंडाने मी तुम्हांला देणार आहे. आज जो खंड आहे, त्याच्या निम्म्याने तुम्ही द्याल?’
‘मोठया खुशीने. आमच्यावर उपकार होतील. खंड परवडेल असा असला म्हणजे तुम्हाला त्रास नाही, आम्हांला त्रास नाही.’
‘त्रास सध्या आम्हांलाच आहे. तुम्हांला कसला आहे त्रास? खुशाल तुम्ही गुरेढोरे सोडता, धन्याची शेते खाऊ देता! थोडीफार घरी केलेली जमीनही तुम्हांला पाहावत नाही. त्या दिवशी या गोविंदाचे बैल आमच्या मळयांत चरत होते.’ दिवाणजी रागाने बोलले.
‘मालक, बैल का मुद्दाम घातले मळयात? मी माझ्या शेतात बैल चारीत होतो. माझा जरा डोळा लागला. बैल गेले. यांनी लगेच कोंडवाडयात घातले. काय करावे आम्ही गरीबांनी?’
‘तू आपल्या शेताला कुंपण घाल, म्हणजे बैल बाहेर जाणार नाहीत.’ दिवाणजी म्हणाले.
‘कशाने कुंपण घालू? तुमच्यासारख्या काटेरी तारा आम्ही थोडयाच आणू शकतो? चार डांभे तोडले तर तुम्ही खटले भरता. मागे जंगलातून चार फाटी आणली तर त्यांनी मला तुरूंगात घातले. काडीकाडीवर तुम्हा जमीनदारांची, खोतांची सत्ता. कोठे चारावी गुरे? कोठून आणावे जळण? कोठून आणावे लाकूड? मालक आमचे हाल तुम्हांला काय ठाऊक?’
‘धनी, याच्या चोराच्या उलटया बोंबा आहेत. दरसाल हा चोरून लाकूड लांबवतो.’
‘बाबा रे, तू म्हणशील ते खरे. आम्ही कोण?’ एक म्हातारी शेतकरी म्हणाला.
‘आम्हांला न्याय या जगात मिळणार नाही. मागे या दिवाणजीने मला मारहाण केली. मी फिर्याद केली. परंतु काही चालले नाही. श्रीमंताविरूध्द फिर्याद करण्यात अर्थ नसतो.’
‘मला जायचे आहे. तुम्हांला भरपूर जमीन द्यायला सांगेन. सध्या खंड देता, त्याच्या निम्मे खंड ठरवू. आज तुम्ही जा. तुम्हांला सुखाचे दिवस येतील असे मी करीन. दया म्हणून नव्हे. तुमचा न्याय्य हक्कच आहे. तुम्ही खपता. तुमचा वास्तविक या जमिनीवर हक्क. असो.’
‘देव तुम्हांला अशीच बुध्दी देवो.’ ते शेतकरी म्हणाले.
‘प्रतापराव तेथे फार राहिला नाही. तो आपल्या मावश्यांच्या त्या मोठया घरात आता कोणीच राहात नसे. तेथेही दिवाणजी होता. त्याला काही जागा राहायला देण्यात आली होती. मालक येणार म्हणून वाडा झाडून पुसून साफ करण्यात आला होता. गडीमाणसे कामात होती. एक आचारी स्वयंपाकपाण्यासाठी मुद्दाम लावला होता. आणि मालक आला. दिवाणजी स्टेशनवर घोडयाची गाडी घेऊन गेले होते. प्रतापराव घरी आला. तो आपल्या खोलीत गेला. त्याला रूपाच्या शतस्मृती आल्या.