प्रकरण ३
“ मला सगळं ऐकायचंय.” सौम्या म्हणाली.
“ एक अत्यंत सुंदर, बोलक्या डोळ्यांची, निष्पाप, मनमोकळी सुंदरी भेटली.” पाणिनी म्हणाला
“ सर प्रेमात पडलेले दिसताहेत.” सौम्या कनक ला म्हणाली.
“ पाणिनी, केवढी होती ती मुलगी?” कनक ओजस ने विचारलं.
“ पंचवीस ते तीस.”
“ लग्न झालेली आहे? म्हणजे तुला चान्स आहे की नाही पाणिनी? आणि पोटापाण्याला काय करते ती?” –कनक
“ सारांश सांगायचा झाला तर तो एक मोठा सापळा होता.” पाणिनी म्हणाला
“ सौंदर्याने भुलवण्याचा सापळा? ”
“ नाही.सकृत दर्शनी तुझी जाहिरात तिने बघितली आणि विचार केला असावा की जाहिरात जरी गुप्त हेराच्या नावाने असली तरी त्यामागे वकील असावा.” पाणिनी म्हणाला
“ सांग मला, तिच्या फ्लॅट चं दार उघडल्यावर काय घडलं?”  कनक ने विचारलं.
“ ती अंघोळ करत होती.” पाणिनी म्हणाला
“ ओहो ! किती रोमॅंन्टिक !! ”
“ मी आधी दार वाजवल, उघडलं गेलं नाही बरंच वेळ म्हणून माझ्या जवळची किल्ली लावून उघडलं. आतून म्हणजे बाथरूम मधून पाण्याचा आवाज येत होता. मी दार पुन्हा लावलं आणि थोडा वेळ वाट पाहून पुन्हा बेल वाजवली. तिने दार उघडून मला आत घेतलं. आत खूप महागडं असे फर्निचर होतं. टेबलावर अॅश ट्रे मधे सिगारेट ची थोटकं होती. स्कॉच ची रिकामी बाटली होती. कोणीतरी पुरुष माणूस तिच्या बरोबर पार्टी करत असावा.”
“ तुम्ही एकमेकांच्या किती जवळ बसला होतात?” सौम्या ने मिस्कील पणे विचारलं.
“ती खूपच निष्पाप आणि मनमोकळी वाटली सुरवातीला.पण नंतर कळलं की ती मुद्दाम तसा प्रयत्न करत होती.माझ्यावर छाप पाडण्यासाठी.माझा अंदाज घेत होती.मला चाचपत होती. काहीतरी काढून घ्यायचं होतं तिला माझ्याकडून ” पाणिनी म्हणाला
“ काय मेख आहे नेमकी? ”
“ तिच्या पोटगी चे प्रकरण हाताळण्यासाठी तिला एक वकील हवाय.तिच्या नवऱ्याशी बोलायला आणि त्याने पोटगी कमी करायचा प्रयत्न करू नये यासाठी त्याला पटवायला.वरकरणी तो अतीशय हुषार,जिद्दी, खुनशी वगैरे आहे असं तिचं म्हणणं आहे.कपाडिया असं नाव आह त्याचं.मला वाटतंय की अपघाताच्या वाहनाचा नंबर तिच्याकडे मिळेल अशा आशयाचे निनावी पत्र पाठवण्याच्या बहाण्याने तिने मला तिच्या अपार्टमेंटमध्ये यायच्या मोहात पाडलं आणि स्वतःचे काम माझ्या गळी उतरवायचा प्रयत्न केला. ”
“ फी किती देणार काही बोलली का?” सौम्या ने विचारलं.
“ चकार शब्द नाही काढला त्या बद्दल.”
“ तुझ्यासाठी तिने लावलेला तो सापळा होता याची खात्री आहे तुला? ” कनक ओजस ने विचारलं.
“ तूच विचार कर.” पाणिनी म्हणाला आणि त्याने आपल्या खिशातून गुलाबी छटा असलेले कागद काढले आणि सौम्या ला दिले.“ सौम्या, तिच्या घरातून मी टेबलाच्या ड्रॉवर मधून हे कागद आणलेत. आपल्याला जे निनावी पत्र आलंय,त्यातल्या कागदाची आणि पत्राच्या फॉंन्ट ची याच्या जरा तुलना करून बघ. ”
सौम्या ने दोन्ही कागद आणि पत्र हातात घेऊन उजेडात नेऊन बघितले.
“ सर, कागद एकाच स्टेशनरी मधला आहे आणि पत्राचा फॉंन्ट ही सारखाच आहे.”
“ चला, हे आता सिद्धच झालं की ते पत्र याच प्रिंटर वरून म्हणजे तिच्याच घरातून छापलं गेलंय.आपण अगदी आशेवर होतो की दहा हजार बक्षिसाच्या बदल्यात आपल्याला त्या गाडीचा नंबर मिळेल.” कनक म्हणाला.
“ असू दे कनक, आणखी काही प्रतिसाद मिळतो का जाहिरातीला लक्ष ठेव.”
“ ठीक आहे पाणिनी.” कनक म्हणाला आणि बाहेर पडला.
त्यानंतर पाणिनी आणि सौम्या ने मिळून इतर प्रकरणातले पत्रव्यवहार आणि अनुषंगिक कामे दुपारपर्यंत उरकली.जेवायला बाहेर जाण्यात तेवढ्यात रिसेप्शनिस्ट गती आत आली.तिच्या हातात एक पत्र होतं.
“ कुरियर ने हे आलंय सर.” सौम्या च्या हातात ते पाकीट देऊन गती बाहेर गेली.
“ अत्ताच आपण ही एवढया पत्रांचा निपटारा केला, तर हे अजून एक आलं. इथली ही फालतू कामं संपतच नाहीत सौम्या.मला नाही आवडत ही असली रोज येणारी पत्र वाचायला आणि त्याला उत्तर देत बसायला.मला अॅक्शन आवडते.काहीतरी सनसनाटी घडायला आणि त्यात सहभागी व्हायला आवडत.”
“ सहभागी हा फार साधा शब्द वापरलात  तुम्ही. अडकायला आवडतं असं म्हणायला हवं.” सौम्या म्हणाली.
बोलता बोलता सौम्याने पाकीट उघडलं. पाकिटावर काहीच लिहिलेलं नव्हतं.ते  जड लागलं.ते उघडताच आतून एक किल्ली बाहेर पडली.त्या बरोबर एक पत्र.अगदी तशाच गुलाबीसर कागदावर लिहिलेलं. आधीच्याच फॉण्ट मधे.पाणिनी ने हातात पत्र घेऊन वाचायला सुरुवात केली.
पाणिनी,
स.न.वि.वि.
माफ करा पण टेबलाचा ड्रॉवर लॉक असल्याने तुम्हाला हवी ती माहिती मिळू शकली नाही.त्या ड्रॉवर ची किल्ली सोबत पाठवली आहे.त्यात ठेवलेल्या चामडी कव्हर असलेल्या एका छोट्या वहीत शेवटून दुसऱ्या पानावर तुम्हाला हव्या असलेल्या गाडीचा नंबर लिहिलाय.अपघातात सापडलेली गाडी हीच आहे याची खात्री पटल्यावर मी माझ्या हक्काची इनामाची रक्कम तुमच्याकडून घेईन.
तुमचा मित्र.
“ सर, तुमची ती मैत्रीण फारच चतुर दिसत्ये.” सौम्या म्हणाली.  “ तुम्ही तिने लावलेला सापळा ओळखलाय हे तिला माहित्ये.तुम्ही तिथे पुन्हा प्रवेश करणे तिला अपेक्षितच नाहीये.आणि ती त्याच प्रिंटर वर पुन्हा ते पत्र टाइप करेल अशी तुम्ही अपेक्षा करणार नाही.शिवाय तिला हे ही माहिती आहे की तुम्ही तिच्याच कडील गुलाबीसर कागदावर एक पत्र टाइप करून आणलं होत.असं असूनही ती पुन्हा त्याच कागदावर आणि त्याच प्रिंटर वर पत्र छापण्याचा आगाऊपणा करेल? ”
“ मी तोच विचार करतोय सौम्या.”पाणिनी म्हणाला
पुन्हा रिसेप्शनिस्ट गती आत आली. सौम्या आणि पाणिनी कडे बघून म्हणाली, बाहेर मायरा कपाडिया नावाची बाई आल्ये.तिचं म्हणणं आहे की तुम्ही तिला नक्की भेटणार आहात हे तिला माहिती आहे.
“मायरा कपाडिया ! ” सौम्या उद्गारली. “मला बघायचंच आहे तिला. काय काय शब्द वापरून कौतुक करत होतात तुम्ही तिच्या सौंदर्याच !”
“ मलाही भेटायचंय तिला.”
पाणिनी ने ती किल्ली आपल्या खिशात टाकली आणि पत्र आपल्या टेबलाच्या ड्रॉवर मधे टाकलं. 
“ आत पाठवून दे तिला.” पाणिनी म्हणाला
“ ती एकटी नाहीये सर.तिच्या बरोबर एक माणूस आलाय, आदित्य कोळवणकर. नावाचा.”
“ त्यांना आत पाठव गती.” पाणिनी म्हणाला  “ सौम्या, आमचं बोलणं झाल्यावर तू त्या दोघाना काहीतरी कारण काढून इथेच थांबवून घे. म्हणजे मी त्यांच्याकडून काहीतरी कागदपत्र, दस्त करून घेतोय असा बहाणा करू.ते तयार व्हायला तुला जरा वेळ लागणार आहे तो पर्यंत त्यांना इथे थांबवून घ्यायचं. तेवढया अवधीत मी तिच्या अपार्टमेंटमध्ये जाऊन त्या टेबलाच्या ड्रॉवर ला किल्ली लावून आतली वही बघणार आहे.”
“ बापरे सर.! भलतंच धाडस करताय तुम्ही.पण मायरा ला तुम्ही तेच करायला हवं असेल तर का तुमाच्यासाठीचा सापळा असू शकतो.”—सौम्या
“ काही इलाज नाहीये माझा, मला माझी उत्कंठा स्वस्थ बसू देत नाहीये.” पाणिनी म्हणाला
“ समजा तिने तुम्हाला......” सौम्या बोले पर्यंत गती मायरा कपाडिया आणि आदित्य कोळवणकर ला घेऊन आत आली.
“ पटवर्धन सर, माझ्याकडे तुम्ही आलात तेव्हा मी तुम्हाला अपघाताच्या वेळी कुठे होते या बद्दल  खोटं बोलत असल्याचे सूचित केलंत तुम्ही.माझ्यावर विश्वास नव्हता तुमचा.तुम्ही पेपरातल्या कुठल्याशा जाहिरातीचा संदर्भ दिलात मला, मी ती जाहिरात नंतर शोधून वाचली आणि आता तुमच्याकडे आल्ये मुद्दाम, हे सिध्द करायला की तुम्ही किती चुकीचं समजत होतात मला.  ” आल्या आल्याच फाफात पसारा न लावता मूळ मुद्द्याला हात घालत मायरा म्हणाली.  “ हे माझ्या बरोबर आलेत ते माझे स्नेही,आदित्य कोळवणकर ”
“ तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पटवर्धन साहेब, मी इथे आलो म्हणून.खर तर मलाच आश्चर्य वाटतंय,पण मायरा ने आग्रह धरला म्हणून मी आलोय इथे. कशाचातरी साक्षीदार म्हणून.” आदित्य म्हणाला.
“ पटवर्धन सर, मी मान्य करते की मी जेव्हा तुम्हाला म्हणाले की, सतत भटकत असल्याने विशिष्ठ दिवशी मी कुठे होते ते माझ्या स्मरणात रहात नाही आणि तसा मी प्रयत्नही करत नाही तेव्हा मी तुमच्याशी खोटं बोलले.कारण त्या दिवशी मी आदित्य बरोबर होते.पण मला खात्री नव्हती की मी ते कबूल करून आदित्य  कोळवणकर ला त्यात गोवलेले त्याला चालेल की नाही.म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी मी वेळ मागून घेतली आणि दरम्यान  आदित्य ला भेटून त्याची परवानगी घेतली. मी आदित्य कोळवणकर बरोबर पार्ट टाईम नोकरी करते.दोन ते पाच या वेळात. त्यादिवशी म्हणजे तीन तारखेला सुट्टी होती म्हणून आम्ही सिनेमाला गेलो होतो.” मायरा म्हणाली.
“ सिनेमा पाहिल्यानंतर द्वीप कुंड चौक आणि भीष्म चौक च्या नाक्यावर वर गेला होतात? ”  पाणिनी ने विचारलं.
आदित्य कोळवणकर ने ठाम पणे आपली मान हलवून नकार दिला.
 “पटवर्धन सर सिनेमा थिएटर शहराच्या एका टोकाला आहे आणि तो रस्ता दुसऱ्या टोकाला.शिवाय सिनेमा संध्याकाळी दोन ते पाच होता.आम्ही सिनेमा संपल्यावर...... ”-मायरा बोलताना मधेच आदित्य म्हणाला,  “ थिएटर जवळच्या कॉफी शॉप मधे बसलो.”
“ पटवर्धन सर, आदित्य हा एक शास्त्रज्ञ आहे.त्याने इन्फ्रारेड किरणांना अटकाव करणारी फिल्म तयार केल्ये.म्हणजे अंतीम टप्प्यात आहे ते काम.” –मायरा म्हणाली.
“ मायरा, त्यावर अत्ता चर्चा नको.” आदित्य कोळवणकर म्हणाला.
“ अरे, तू किती मोठा शोध लावला आहेस ते मला पाणिनी पटवर्धन ना सांगायचं होतं आणि आपले संबंध काय आहेत ते सांगायचं होतं. पटवर्धन सर, मी दोन ते पाच या वेळेत आदित्य बरोबर काम करते, त्याची टायपिंग ची कामे, वगैरे. तो अत्ता करतोय ते काम एकदम गुप्त स्वरूपाचे असल्याने बाहेरच्या टायपिस्ट वर त्याला अवलंबून राहता येत नाही. शिवाय मी त्याच्या या प्रोजेक्ट मधे काही रक्कमही गुंतवल्ये.त्याचं हे संशोधन .....”
“ मायरा, नको म्हंटलं ना मी. अजून माझ्या या संशोधनाला मी पैशात रूपांतरित केलेलं नाही मी.तो पर्यंत चर्चा नको.” –आदित्य म्हणाला.
“ मला तुमच्या संशोधनात काहीही रस नाहीये. मला यात रस आहे की अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं. तर तुम्ही सिनेमानंतर बाजूच्याच कॉफी शॉप मधे गेलात. ” पाणिनी म्हणाला
“ होय.” मायरा म्हणाली.
“ किती वेळ होतात तिथे?”  पाणिनी ने विचारलं.
“ तासभर असू.”
“ नंतर आम्ही  थोडावेळ मॉल मधे विंडो शॉपिंग केलं तास दीड तास आणि रात्री जेवायला व्हरांडा हॉटेल मधे गेलो.” आदित्य म्हणाला.
“ नंतर?”  पाणिनी ने विचारलं.
“ मग घरी आलो आमच्या. आदित्य थोडा वेळ माझ्या घरी थांबला, आम्ही पुन्हा गप्पा मारल्या.” –मायरा
“ किती वाजे पर्यंत?”  पाणिनी ने विचारलं.
दोघांपैकी कोणीच उत्तर दिले नाही.एकमेकांच्या चेहेऱ्याकडे बघितले.
पाणिनी ने आपल्या भुवया उंचावून त्यांच्याकडे बघितलं.
“ अकरा पर्यंत.” मायरा म्हणाली
“ साडेबारा.” आदित्य म्हणाला  दोघांनी जवळ जवळ एकाचवेळी उत्तर दिले.पण उत्तर वेगवेगळे होते.
मायरा च्या लक्षात ते आले.  “ अरे हो, साडेबाराच बरोबर. मी अकरा वाजता म्हणाले ते तू मागच्या आठवड्यात आला होतास तेव्हा.”
“ तुम्हाला त्रास द्यायला लागतोय मला सॉरी.पण तुम्ही अत्ता जे मला सांगितलं ते मला लेखी द्या. अर्थात तुम्हाला काहीच करावं लागणार नाही, माझी  सेक्रेटरी सौम्या, तयार करेल ते.तुम्ह फक्त सह्या करा.” पाणिनी म्हणाला
“ पण पटवर्धन, जर आमचा त्या विषयासी संबंधच नाहीये तर लेखापढीत कशाला गुंतायचं?” मायरा ने विचारलं.
“ एखादा फॉर्म भरल्या सारखं आहे हे.अर्थात तुम्हाला हे करायला भीती वाटत असेल आणि तुम्ही अडचणीत येणार असाल तर राहू दे. ” पाणिनी म्हणाला
“ बिलकुल नाही घाबरत आम्ही.” आदित्य म्हणाला. “ अगदी खरं म्हणजे मला तुमच्या लायब्ररीमधील एखादं पुस्तक वाचत बसायला आवडेल, तुमची सेक्रेटरी टायपिंग करे पर्यंत. ”
“ तुझं काय मायरा?”  पाणिनी ने विचारलं.
“ आदित्य तयार आहे तर मी नाही कसं म्हणू? थांबते मी पण.मला एखादं सिने मॅगझिन द्या चाळायला,तो पर्यंत. पण किती वेळ जाईल यात?” मायरा ने शंका काढली.
“ अर्धा तास. तुम्ही दुपारी दोन वाजल्या पासून कायकाय केलेत ते सांगा, मला बोललात त्यानुसार.सौम्या ते लिहून घेईल आणि छापून तुमच्याकडे देईल. तुम्ही एकदा ते वाचून बघा आणि सह्या करा.” पाणिनी म्हणाला  “ आणि मला माफ करा तुमचं हे काम होई पर्यंत मला एकाला भेटायला जायचंय. तुम्ही अचानक आल्यामुळे मला उशीरच झालाय पण टाळू शकत नाही मी. तुम्ही बसा, मी जाऊन येतो. ” पाणिनी म्हणाला  “ तुम्हाला त्रास देतोय पुन्हा सॉरी म्हणतो.”
“ अजिबात माफी मागू नका.” आदित्य म्हणाला.
“ सौम्या, यांना लौकरात लौकर मोकळं कर.” तिच्या डोळ्यात बघत खूण करत पाणिनी म्हणाला सौम्या ने ही त्याला डोळा मिचकावून प्रतिसाद दिला.
( प्रकरण ३ समाप्त.)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel