सावधप्रकरण २४
दुसऱ्या दिवशी कोर्ट चालू झालं तेव्हा न्यायाधीश म्हणाले, “ मिस्टर कीर्तीकर ची उलट तपासणी चालू होती काल, ती पुढे चालू करा.”
खांडेकर उठून उभे राहिले. “ युअर ऑनर, एक छोटी विनंती आहे, काल कोर्ट संपल्यावर घरी जातांना कीर्तीकर ला छोटासा अपघात झालाय, त्याला मुका मार लागलाय त्यामुळे आज कोर्टात येत येणार नाही त्याला आणि त्याची उलट तपासणी पूर्ण करता येणार नाही.”
“ ठीक आहे तुम्हाला आणखी कोणाची साक्ष घ्यायची आहे खांडेकर?” न्यायाधीश म्हणाले.
“ नाही. खरं म्हणजे आरोपीला परब चा खून करायचं कारण होतं कारण तो तिचा पूर्वाश्रमीचा पती होता, तिला त्याच्या पासून सुटका हवी होती, तिच्या रिव्हॉल्व्हरनेच त्याचा खून झाला आहे हे सर्व सिध्द झालंय असं माझं मत आहे.”
“ सरकार पक्ष आपले साक्षीपुरावे बंद करतंय असा याचा अर्थ आहे?” न्यायाधीशानी विचारलं.
“ अजून नक्की नाही गरज वाटली तर माझं समारोपाचं भाषण करण्यापूर्वी मी एखादा साक्षीदार आणीन,पण अत्ता तरी मला ते करायचं नाहीये.”
“ मला तारकर ला आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत.” पाणिनी म्हणाला
“ ठीक आहे. तारकर, पिंजऱ्यात या.”
“ मला सांग तारकर, हिराळकर नावाच्या व्यक्तीला तू ओळखतोस? ”
“ एका अपघाताच्या तपासाच्या संदर्भात ... त्या आधी गुन्ह्यातल्या पिस्तुलीचा माग काढतांना आरोपीला ते कोणी दिलं ते शोधताना, हिराळकर ची सही रजिस्टर वर केली गेली होती ...पण त्याची आणि माझी भेट झाली नाही.” तारकर ने सावध पणे उत्तर दिल.
“ माझं ऑब्जेक्शन आहे या प्रश्नाला. आमच्या या खटल्यात आम्ही हिराळकर या व्यक्तीला साक्षीदार म्हणून आणलेले नाही किंवा त्याचा या खटल्याशी संबंध जोडलेला नाही.” खांडेकर म्हणाले.
“ आरोपी आणि हिराळकर चं लग्न ठरलं होतं, सरकारी वकिलांनी त्याची साक्ष काढली नसली तरी आम्हाला बचावाचा साक्षीदार म्हणून त्याला बोलवायचा अधिकार आहे. तारकरची उलट तपासणी झाली की मी हिराळकर ला बोलावू इच्छितो. ” पाणिनी म्हणाला म्हणाला.
“ ते शक्य नाही आता.” आळीपाळीने पाणिनी कडे आणि खांडेकरांकडे बघत तारकर म्हणाला.
“ का नाही?” पाणिनी म्हणाला. त्याच्या ओठांवर मिस्कील हसू होतं.
“ त्याचा मृत्यू झालाय.” तारकर म्हणाला. खांडेकरांचा चेहेरा पडला.
“ काय? कधी कसा? ” आपल्याला हे प्रथमच कळतंय असं भासवून पाणिनी म्हणाला
"चैत्रपूरपासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर घाटात एका ठिकाणी त्याची गाडी दरीत कोसळली." तारकर म्हणाला. “ त्या अपघातात तो गेला?” पाणिनी म्हणाला.
“ नाही.”
“म्हणजे? याचं प्रेत गाडीत नव्हतं?”
“ ते आम्हाला दुसऱ्या ठिकाणी मिळालं ” तारकर म्हणाला.
“ त्या प्रेताची अवस्था कशी होती?”
“प्रेतावर माती टाकण्यात आली होती.ते गाडी पासून लांब अंतरावर पडलं होतं.”
“ म्हणजे गाडीतून बाहेर फेकले गेल्यासारखे वाटतं नव्हतं?” पाणिनी म्हणाला.
“ ओह युअर ऑनर ! ” खांडेकर उद्गारले. “ हा खटला परब च्या खुनाचा आहे की हिराळकर च्या?”
“ म्हणजे? हिराळकर चा पण खून झालाय असं तुम्ही सुचवताय की काय?” पाणिनी म्हणाला.
“ मुळात या खटल्याशी संबंध नसणारे अपघात आणि त्यात मेलेली माणसं यावर पटवर्धन उगाचच कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत.” खांडेकर म्हणाले.
“ संबंध आहे आणि मी तो.......”पाणिनी म्हणाला
“ ओव्हर रुल्ड ” पाणिनी चं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच न्यायाधीश म्हणाले.
“ तर मग मी पुन्हा या प्रश्नाला आक्षेप घेतो, की हा प्रश्न म्हणजे साक्षीदाराचा अंदाज आहे.”
“ ठीक आहे मी वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतो,” पाणिनी म्हणाला “ गाडी आणि हिराळकर चे प्रेत यात किती अंतर होतं?”
“ प्रेत वरच्या बाजूला होतं. गाडी खाली होती.दूर अंतरावर.”
“ प्रेताची स्थिती कशी होती?” पाणिनी म्हणाला
“ ते गाडीच्या डिकीत किंवा तत्सम अरुंद जागी गुंडाळून ठेवल्या सारखे आखडले होते.” तारकर म्हणाला.
“ त्याच्या गाडीत काही सामान वगैरे आढळलं?” पाणिनी म्हणाला
“ नाही, काहीच नाही.”
“ ज्या रस्त्यावर हा प्रसंग घडला तो रस्ता उदक प्रपात ते चैत्रपूर या दरम्यानचा होता?”
“ हो.” तारकर म्हणाला.
“ अपघाताची वेळ काय असावी?” पाणिनी म्हणाला.
“ हिराळकर च्या हातावरचे घड्याळ ५.५५ ला बंद पडलं होतं आणि गाडीतलं घड्याळ ६.२१ ची वेळ दाखवत होतं.” तारकर म्हणाला.
“ सध्या तरी माझे प्रश्न संपलेत.” पाणिनीने जाहीर केलं. “ युअर ऑनर, या नंतर मी कोर्टाला विनंती करतो की हिराळकर,दुग्गल आणि कीर्तीकर यांचे एकत्रित व्यवसायाचे बॅंक खाते आर्थिक सहकारी बॅंक इथे असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.या बँकेत सादर केलेल्या त्यांच्या व्यवसायाच्या खात्यावरून स्टोन व्यवसायासाठी त्यांची भागीदारी असल्याचे रेकोर्ड बँकेचे खाते दाखवते.हे रेकोर्ड मी कोर्टात सादर करू इच्छितो.बचाव पक्षाचा पुरावा म्हणून ते दाखल करावे. ”
“ सरकार पक्षाची काही हरकत?” न्यायाधीशांनी विचारलं.
“ मुळात अॅडव्होकेट पटवर्धन हे मूळ खटल्यापासून भरकटत चाललेत.परब च्या खुना ऐवजी हिराळकर च्या मृत्यू चा तपास करत आहेत.पण माझी काही हरकत नाही.परब चा खून आरोपी मायरा ने केल्याचा पुरेसा पुरावा आम्ही सादर केलाय. ”
“परब च्या खुनामागचे कारण हे हिराळकर च्या खुनात दडलेलं आहे.” पाणिनी म्हणाला “ तुमचा कीर्तीकर हा साक्षीदार कधी येणार आहे खांडेकर?”
“ मी सांगितलं त्या नुसार त्याला मुका मार लागलाय खूप.त्यामुळे आज येऊ शकणार नाही तो.” खांडेकर उत्तरले.
“ उद्या ?” पाणिनी म्हणाला.
“ मला अत्ता नाही सांगता येणार.”
“ अर्थात, तो कुठल्या गुन्ह्यात गुंतलाय असं मला नाही वाटत. सुरुवातीला मला वाटलं होतं तसं, पण आता प्रत्यक्षात मला काय घडलंय ते आता समजलंय. पण खरा खुनी हजर करण्यासाठी मला अजून एक दोन साक्षीदार तपासावे लागतील. मी आदित्य कोळवणकर ला साक्षीसाठी बोलावू इच्छितो पण माझी कोर्टाला विनंती आहे की त्याच्यावर समन्स बजावायला लागणारा वेळ लक्षात घेता उद्या पर्यंत कामकाज थांबवावे.” पाणिनी म्हणाला
“सरकारी वकिलांचं काय म्हणणं आहे? ” न्यायाधीशांनी विचारलं.
“ हरकत नाही आमची.” खांडेकर म्हणाले.
“ ठीक आहे उद्या सकाळी अकरा वाजता पुढे चालू करू कामकाज.” न्यायाधीश म्हणाले आणि उठून आपल्या खोलीत गेले.
पाणिनीने लगेच कनक ला फोन लावला. “ उद्या कोर्ट सुरु होण्यापूर्वी मला एक तातडीची माहिती हवी आहे.घाट संपल्यावर चैत्रपूर च्या तोंडाशी एक टोल नाका आहे.दुपारी साडेचार ते पाच च्या सुमारास घाट ओलांडून एक गाडी चैत्रपूरला गेली.तीच गाडी पावणे सहा ते सव्वा सहा ला पुन्हा टोलनाका ओलांडून पुन्हा घाटात शिरली आणि पावणे सात ते सव्वा सातला टोल वरून पुन्हा चैत्रपूरगावात शिरली. तिथून पुन्हा रात्री आठ च्या सुमारास टोल वरून चैत्रपूरमधून बाहेर पडली. या सर्व वेळेशी जुळणारी कोणती गाडी आहे ते मला हवंय.”
“ ठीक आहे, ते फार अवघड नाही कारण त्या टोलवर फार वर्दळ नसते.” कनक म्हणाला.
“ गुड, तर मग लाग कामाला. ”
दुसऱ्या दिवशी कोर्ट पुन्हा सुरु झालं.
“ आदित्य कोळवणकर हजर आहे? अॅडव्होकेट पटवर्धन ना त्याची साक्ष घ्यायची आहे.” न्यायाधीशांनी खांडेकरांना विचारलं.
“ हजर आहे, आणि मी नमूद करू इच्छितो की कीर्तीकर सुध्दा कोर्टात हजर आहे.त्याला अजून वेदना होताहेत पण तो आलाय.” खांडेकर म्हणाले.
“ कोळवणकर ना पिंजऱ्यात येऊ दे.”
आदित्य कोळवणकर साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आला. शपथ, नाव पत्ता वगैरे झाल्यावर पाणिनी त्याच्या जवळ गेला.
“ तुझा नेमका व्यवसाय काय आहे? ” पाणिनी म्हणाला.
“ मी शास्त्रज्ञ आहे. म्हणजे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या विविध सुविधांची उपकरणे मी निर्माण करतो.त्याची पेटंट मी मिळवतो आणि योग्य उत्पादक मिळाला तर त्याला ती विकतो ” कोळवणकर म्हणाला.
“आपलं म्हणणं उदाहरण देऊन स्पष्ट कर जरा.”
“ मी एक लेसर उपकरण बनवलं आहे ते खोलीच्या दारात बसवलं की खोलीत आत जातांना दिवे लागतात, बाहेर पडतांना पुन्हा बंद होतात.किंवा बाहेरून आपल्या इमारतीत शिरतांना गाडीतील रिमोट दाबला की इमारतीचे मुख्य दार उघडते कारण माझे उपकरण मुख्य दाराला बसवलेले असते. ”
“ या खटल्यातील आरोपी मायरा ला तू ओळखतोस?”
“ आम्ही खूप चांगले मित्र आहोत.”
“ केवळ मैत्री आहे की आणखी काही?” पाणिनी म्हणाला.
“ मला माझ्या संशोधनात ती मदत करते.”
“ कसली मदत?”
“ ती माझे हिशोब लिहून देते शिवाय संशोधनासंबधी लिखाण वगैरे असते त्याचे काम, नोट काढणे वगैरे.” आदित्य कोळवणकर म्हणाला.
“ तुझ्या संशोधनाला लागणारा पैसा सुध्दा ती देते?”
आदित्य ने उत्तर दिले नाही.त्या ऐवजी आरोपी मायरा कडे पाहिले.
“ होय.”
“ परब हा तिचा पूर्वाश्रमीचा नवरा होता हे तुला माहिती होतं?”
“ मला म्हणाली होती ती तसं.”
“ त्याच्यापासून तिला धोका आहे हे तुला ठाऊक होतं?”
“ होय.माझ्याशी बोलताना तिने मला सांगितलं होतं तसं ” आदित्य म्हणाला.
“ संशोधनासाठी लागणारा पैसा, मायरा शिवाय तुला कोण पुरवत होतं?”
“ कोणी नाही.”
“ तुझे तसे प्रयत्न चालू होते?” पाणिनी म्हणाला.
“ हो.”
“ हिराळकर,कीर्तीकर, दुग्गल यांच्याशी किंवा त्यापैकी कुणाशी तुझी ओळख होती?”
“ हिराळकर आणि माझी ओळख मायरा ने करून दिली होती.”
“ त्याचं आणि मायरा च लग्न होणार हे तुला मायरा ने सांगितलं होतं?” पाणिनी म्हणाला.
“ हो.”
“ हिराळकर ने तुझ्या संशोधनात तुला आर्थिक सहकार्य करावं असा तुझा प्रयत्न चालू होता की नाही?”
“ म्हणजे... मी... तसं एकदोनदा त्याच्याशी बोललो होतो.पण नक्की ठरलं नव्हत.”
“ तू त्याच्याशी तसा प्रयत्न करत होतास हे मायरा ला माहीत होतं? ” पाणिनी म्हणाला.
“ नाही.”
“ तू तयार करत असलेल्या उपकरणात घड्याळ्याचे काटे ज्या पद्धतीने फिरतात तशा प्रकारचे एक उपकरण आहे ज्यामुळे काटा एखाद्या ठराविक ठिकाणी आला की एखादा खटका दाबला जाणे शक्य आहे? ”
“ त्यावर काम चालू आहे.” आदित्य म्हणाला.
“ आपण ठरवू त्या वेळेला हा खटका दाबला जाऊ शकतो? ” पाणिनी म्हणाला.
“ अजून त्यात अचुकता आलेली नाही.”
पाणिनी पणे कोर्टाच्या दाराकडे पाहिले.कनक ओजस आत येत होता, त्याच्या हातात एक पाकीट होतं, पाणिनीकडे बघून त्याने हसून आंगठा दाखवला.
“ परब चा खून झाला त्यावेळी म्हणजे साधारण सहा- साडे सहा च्या सुमाराला तू कुठे होतास? ” पाणिनी म्हणाला.
“ मी रंगकर्मी नाट्य गृहात नाटकाला गेलो होतो.”
“ किती वाजता होतं नाटकं?” पाणिनी म्हणाला.
“ साडे पाच ला ”
“ तू तिथे गेल्याचा काही पुरावा आहे?”
“ माझी खुर्ची फाटली होती त्यामुळे मला दुसरीकडे बसायला दिले गेले हा प्रसंग तिथला डोअर किपर सांगू शकेल.” आदित्य म्हणाला.
“ तू मायरा ला रिव्हॉल्व्हर खरेदी करून देताना रजिस्टर वर स्वतःची सही न करता हिराळकर ची सही का केलीस?”
“ हिराळकर आणि तिचं लग्न होणार होतं.त्याने तिच्यासाठी रिव्हॉल्व्हर खरेदी करून दिलं अशी तिची समजूत मला मुद्दामच करून द्यायची होती.त्या दोघांचं प्रेम त्यामुळे वाढलं असतं.” आदित्य म्हणाला.
“ खुनानंतर तू मायरा ला सल्ला दिलास की नाही की रिव्हॉल्व्हर प्रेताच्या जवळ ठेव म्हणजे आत्महत्या वाटेल म्हणून?”
“ नाही, मी नाही दिला तो सल्ला.माझ्या माहिती प्रमाणे तो कैवल्य ने दिला. ”
“त्या रिव्हॉल्व्हर वरचे नंबर घासून नष्ट करायचा प्रयत्न तूच केलास?”
“ हो. मला मायरा ने त्यात अडकावं असं वाटत नव्हतं.”
“ आदित्य, तू खुनाच्या वेळी म्हणजे सहा ते साडेसहाच्या दरम्यान नाटकाला गेला होतास हे खरं आहे पण खून तूच केला आहेस आणि त्यासाठी तुला परब जवळ जाण्याची गरज नव्हती.” पाणिनी कडाडला.
“ म्हणजे?”
“ मायरा तुझी मैत्रीण होती आणि तिला परब पासून धोका होता, हे जाणून तू तिच्या गॅरेज मधे स्वतः बनवलेलं एक उपकरण ठेवलंस आणि त्याला मायरा ची रिव्हॉल्व्हर अशी जोडलीस की ठराविक वेळे नंतर किंवा गॅरेजचं दार उघडलं जाताच ते उपकरण रिव्हॉल्व्हर चा ट्रिगर दाबेल आणि त्यातून गोळी उडेल. आणि त्यावेळी तू अन्यत्र असशील.”
“ धादांत खोटं आहे हे.मी असं काहीही केलेले नाही.” आदित्य ओरडून म्हणाला.
“ दॅट्स ऑल.मला या साक्षीदाराला अत्ता काही विचारायचं नाहीये.माझं म्हणणं सिध्द करण्यासाठी मला कीर्तीकर ना आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत.नशिबाने त्यांची तब्येत ठीक दिसते आहे आणि ते कोर्टात हजर आहेत.” पाणिनी म्हणाला
“ परवानगी आहे.” न्यायाधीश म्हणाले.
( प्रकरण २४ समाप्त)