प्रकरण १९

मायरा कपाडिया विरुद्धचा खटला सुरू झाला, न्यायाधीश आगवेकर आपल्या खुर्चीत येऊन बसले त्यांनी हातोडा आपटला.

"राज्य सरकार विरुद्ध मायरा कपाडिया खटला आपण सुरू करतो आहोत दोन्ही बाजूचे वकील तयार आहेत?"

सरकारी वकील हेरंब खांडेकर रुबाबदार आणि एखाद्या पहिलवानासारखे देहयष्टी असलेले वकील होते. त्यांचा आवाज सुद्धा आपल्या व्यक्तीमत्वा सारखाच भारदार होता

"आम्ही तयार आहोत न्यायमूर्ती महाराज. आम्ही कोर्टाला एक मोकळेपणाने सांगू इच्छितो की जयद्रथ परब याचा मृत्यू एक गूढ आहे पण ही प्राथमिक सुनावणी असल्यामुळे आम्हाला एवढेच सिद्ध करायचे की गुन्हा घडलेला आहे आणि आरोपीला तो गुन्हा करण्याचे सबळ कारण होतं, संधी होती. मला खात्री आहे की जसजशी ही केस पुढे जाईल आणि एकेक पुरावा समोर येईल तेव्हा हे गूढ दूर होत जाईल आणि मला खात्री आहे की कपाडिया व्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीला अटक करावी अशी विनंती कोर्टाला करण्याची गरज मला भासेल."

एवढं बोलून हेतू पुरस्सरपणे त्यांनी पाणिनी कडे पाहिलं आणि खाली बसले.

"बचाव पक्ष सुद्धा तयार आहे" पाणिनी म्हणाला. मी एवढेच म्हणेन जे जे वास्तव समोर येईल त्याला आम्ही तोंड देऊ. सरकार पक्षांना सादर केलेल्या साक्षीदारांची उलट तपासणी घेण्याची पूर्ण संधी आम्हाला मिळावी."

"मला असं म्हणायचंय युवर ऑनर,"खांडेकर पुन्हा उठून उभे राहत म्हणाले, "बचावाचे वकील पाणिनी पटवर्धन अगदी प्रथमपासून या प्रकरणात गुंतले असल्यामुळे म्हणजे अगदी पहिला खून होण्याच्या आधीपासून गुंतले असल्यामुळे या प्रकरणात आम्ही करत असलेल्या तपासणीत थोडा अडथळा आलेला आहे"

" जे काय तुम्हाला विधान करायचे ते पुराव्यासकट सादर करा कोर्टाची दिशाभूल करू नका किंवा त्यांचं मत पूर्वगृहदूषितही करू नका" पाणिनी म्हणाला

"मी कोणाचं मत पूर्वग्रह दूषित करत नाहीये मी कोर्टाला एवढेच सांगू इच्छितोय की बचावाच्या वकिलानी ज्या काही युक्त्या प्रयुक्त्या आणि क्लुप्त्या वापरल्या आहेत त्यामुळे आमच्या तपासणी कामात अडथळा निर्माण झाला आहे" हेरंब खांडेकर म्हणाले

" कुठल्या क्लुप्त्या वापरल्या मी?"पाणिनी आश्चर्य व्यक्त करत म्हणाला

"साक्षीदाराने ओळखू नये म्हणून उठून उभे राहायला नकार देणे. ही एक गोष्ट झाली. यानंतर मिस्टर पटवर्धन यांनी त्यांच्या ऑफिस मधून कोणाला कळणार नाही अशा पद्धतीने एका पॅकिंग कंटेनर मध्ये बसून एका ट्रक मधून आपल्या घरापर्यंत प्रवास केला जेणेकरून रस्त्यावर आम्ही उभ्या केलेल्या साक्षीदाराला काही कळू नये"

"हे धादांत खोटं आहे" पाणिनी उत्साहाने म्हणाला.

"वैयक्तिक दोषारोप करण्याची ही जागा नाही दोन्ही वकिलानी लक्षात ठेवा. विशेषतः मिस्टर खांडेकर तुमच्याकडे तुम्ही बोलत असलेल्या गोष्टीबद्दल काही पुरावा असेल तर तो सादर करा." न्यायाधीश आगवेकर म्हणाले.

"त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाहीये आणि त्यांना मिळणारही नाही" पाणिनी म्हणाला

"मला आव्हान द्यायचा प्रयत्न करू नका पॅकिंग कंटेनर मधून तुम्ही पळून गेलात हे तर मी सिद्ध करेनच याशिवाय माझ्याकडे आणखीन एक पुरावा आहे की त्यानंतर तुम्ही हायवे वरच्या एका बंगले वजा हॉटेलमध्ये गेलात जेणेकरून तुम्हाला आमच्या साक्षीदाराने ओळखू नये."खांडेकर उदगारले

"बडबड करण्यापेक्षा पुरावा द्या मी असं काही केल्याचा"

"मी सिद्ध करू शकतो पण मी तसं करायला सुरुवात केली की मिस्टर पटवर्धन तुम्ही त्याला आक्षेप घ्यायला लागाल की हे मूळ खटल्याच्या संबंधातलं नाही म्हणून तुम्हाला माहिती आहे की आमचे हात बांधलेले आहेत."

"मी असं काही केल्याचा तुमच्याकडे साक्षीदार असेल आणि तो सिद्ध करू शकणार असेल की मी यापैकी काही केलं आहे तर त्याला समोर आणा मी तुम्हाला शब्द देतो की मी एकदाही आक्षेप घेणार नाही." 

"ठीक आहे आता बचाव पक्षाने म्हणजे मिस्टर पटवर्धन यांनी शब्दच दिला आहे की ते हरकत घेणार नाहीत तर मी हे सिद्ध करू इच्छितो की या खटल्यात ज्याचा खून झाला आहे तो जयद्रथ परब हा स्तवन कीर्तीकर कडे ड्रायव्हर आणि स्वयंपाकी म्हणून नोकरीला होता या महिन्याच्या पाच तारखेला त्याचा खून झाला आणि हा खून रिव्होल्वर क्रमांक s6s088 मधून गोळी झाडून करण्यात आला. मी आता इन्स्पेक्टर तारकर याला साक्षीदार म्हणून बोलावू इच्छितो"

तारकर साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आला सराईतपणे त्याने शपथ घेतली आपल्या कामाचं स्वरूप आपलं पद याची माहिती त्यांनी कोर्टाला दिली त्यांनाही सांगितलं की पाच तारखेला खून झालेल्या ठिकाणच्या गॅरेजमध्ये त्याला बोलावलं गेलं आणि तिथे त्याला परब च प्रेत आढळून आलं

इन्स्पेक्टर तारकरने त्यानंतर त्या प्रेताचे वर्णन केलं की कशा पद्धतीने जमिनीवर पडल होत आणि त्या प्रेताचे पुढे त्याने काय केलं याबद्दल सगळी सविस्तर हकीकत कथन केली.

"प्रेताच्या जवळ एक रिव्हॉल्व्हर पडलं होतं?"खांडेकर नी विचारलं.

"हो बरोबर आहे पॉईंट अडतीस कॅलिबर ची स्मिथ कंपनीची ती रिव्हॉल्व्हर होती मगाशी तुम्ही उल्लेख केला त्या नंबरची पण त्या बंदुकीवरचे कोरलेले नंबर खरवडून किंवा घासून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण तसं करत असताना एक नंबर नष्ट करायचा राहून गेला होता त्यावरूनच आम्ही त्या बंदुकीचा नंबर शोधू शकलो बंदुकीचा सिलेंडर मध्ये पाच काडतुसे भरायची सोय होती त्यातली चार काडतुसे शिल्लक होती आणि एका काडतुसाची जागा रिकामी होती."

खांडेकरांनी आपल्या हातात रिव्हॉल्व्हर धरून ते इन्स्पेक्टर तारकर ला दाखवलं

" हेच ते रिव्हॉल्व्हर आहे?"

" हो बरोबर हेच आहे"

"माझी विनंती आहे की पुरावा म्हणून ते दाखल करून घेण्यात यावं"खांडेकर म्हणाले आणि त्यानी कोर्टाच्या क्लार्क कडे ते रिव्हॉल्व्हर दिल.

"तर मग इन्स्पेक्टर तयार कर तुम्ही म्हणालात की हे रिव्हॉल्व्हर त्या प्रेताच्या शेजारी होतो म्हणून?"

"हो प्रेताच्या शेजारी रिव्हॉल्व्हर होतं पण पॅराफिन चाचणी आम्ही केली तेव्हा लक्षात आलं की मृत माणसानं त्यातून गोळी मारली नव्हती."

"आम्हाला हे रिव्हॉल्व्हर प्रेताच्या बाजूला मिळाले प्रेताच्या बाजूला रक्ताचे थारोळ होतं त्यावर हे रिव्हॉल्व्हर मिळालं त्या रिव्हॉल्व्हर वर फक्त खालच्याच बाजूला रक्त लागलं होतं मृत व्यक्तीच्या हातावर रक्ताचे डाग होते पण रिव्हॉल्व्हर वर मात्र रक्ताचे डाग नव्हते त्याचप्रमाणे रिव्हॉल्व्हर च्या पृष्ठभागावर सुद्धा हाताचे ठसे नव्हते" तारकर न उत्तर दिलं

"बंदुकीच्या आतल्या भागावर च्या ठशांचं काय सांगाल?" अॅडव्होकेट खांडेकरांनी सूचक प्रश्न विचारला

"बंदुकीच्या आतल्या बाजूला एका माणसाच्या उजव्या हाताच्या तर्जनीचा ठसा सापडला"

"कोण होता तो माणूस ज्याच्या उजव्या तर्जनीचा ठसा सापडला? तुम्ही तशी तुलना केली तुमच्या रेकॉर्ड वरून?"

" अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन याच्या बोटाचा तो ठसा होता"तारकर म्हणाला

"त्या ठशाच्या प्रति तुम्ही इथे आणल्या आहेत?"

"आहेत माझ्याकडे इथे"

"युवर ओनर कदाचित पुरावा दाखल करण्याचा माझा हा मार्ग चुकीचा असेल म्हणजे तांत्रिक दृष्ट्या बघायला गेलं तर मी आधी हा पुरावा दाखल करून घ्यायला हवा होता त्यानंतर पाणिनी पटवर्धन याचा ठसा त्याच्याशी तुलना करून घ्यायला हवा होता आणि त्यानंतर कोर्टात इन्स्पेक्टर तारकर ची साक्ष घ्यायला हवी होती पण तो ठसा पटवर्धन यांच्याच बोटाचा असल्याची खात्री असल्यामुळे........"

"काही काळजी करू नका मिस्टर खांडेकर तुम्हाला ज्या पद्धतीने तो पुरावा दाखल करून घ्यायचा आहे त्या पद्धतीने घ्या मी हरकत घेणार नाहीये"

पाणिनी म्हणाला

बंदुकीवर सापडलेले ठसे आणि पाणिनी पटवर्धनच्या बोटाचे ठसे पुरावा क्रमांक अ आणि ब म्हणून दाखल करून घेण्यात आले

"मिस्टर तारकर आता मला सांगा की कोणत्या परिस्थितीत तुम्ही पाणिनी पटवर्धनच्या हाताचे ठसे मिळवलेत?"

"या महिन्याच्या सहा तारखेला म्हणजे गुरुवारी मी पाणिनी पटवर्धनांच्या ऑफिसमध्ये रुद्रांश गडकरी बरोबर गेलो"

"तिथे तुमचं पाणिनी पटवर्धन यांच्याबरोबर काही बोलणं झालं?"

पाणिनी काही बोलण्यापूर्वी न्यायाधीश मध्ये पडले, ते म्हणाले "मला वाटतंय मिस्टर खांडेकर हे संपूर्ण विषयाला धरून होत नाहीये"

"मी त्याचा संदर्भ जोडून दाखवीन नंतर"खांडेकर उत्तरले

"माझी काही हरकत नाहीये चालू दे त्यांचं काय चाललंय ते" पाणिनी म्हणाला

" पटवर्धन तुम्ही जरी हरकत घेत नसलात तरी हा ऐकीव पुरावा आहे आणि मला नाही आवडत असे ऐकीव पुरावा दाखल करून घ्यायला" न्यायाधीश म्हणाले

"ऐकीव पुरावा आहे की नाही हे न्यायमूर्ती महाराजांनी नंतर ठरवावे पण या संपूर्ण प्रकरणाचा सारांश या उत्तरात आहे"खांडेकर म्हणाले

"ठीक आहे बोला पुढे"न्यायाधीश म्हणाले

"रुद्रांश गडकरी तुमच्या बरोबर होता असं तुम्ही म्हणालात या व्यतिरिक्त अजून कोण होतो तुमच्याबरोबर?"

"या खटल्यातली आरोपी मायरा कपाडिया. आदित्य कोळवणकर. ज्याला सकृत दर्शनी रिव्हॉल्व्हर खरेदी करण्यात रस होता आणि साध्या कपड्यातले माझे काही सहकारी पोलीस."

"मला सांगा पटवर्धन यांनी तुम्हाला त्यांच्या हाताचे ठसे घ्यायला परवानगी दिली?"

"अगदी कोणताही विरोध न करता"तारकर म्हणाला

"ठसे देत असताना आपले ठसे बंदुकीच्या आतल्या बाजूला कसे आले याबद्दल पाणिनी पटवर्धन यांनी काही विधान केलं?"खांडेकरांनी विचारलं

"पटवर्धन यांनी सांगितलं की त्यांना कुरियर मधून मायरा च्या अपार्टमेंट ची किल्ली पाठवली गेली खून झाला त्या दिवशीच......"

"हे बघा अॅडव्होकेट खांडेकर पाणिनी पटवर्धन जरी या सगळ्या गोष्टीला हरकत घेत नसले तरीसुद्धा मला असं वाटतं हे सगळं ऐकीव पुरावा या सदरात मोडणार आहे. हे जसजशी तुमची साक्ष पुढे जाते तसं वाढतच जाते आहे. म्हणजे एखादा दुसऱ्या वाक्य पुरता ऐकू पुरावा मी समजू शकलो असतो" न्यायाधीश म्हणाले

"हो पण पटवर्धन यांनी मान्यच केलंय आरोपीच्या अपार्टमेंट मध्ये ते रिव्हॉल्व्हर बघितल्याचं"

"एक रिव्हॉल्व्हर बघितलं होतं असं मी म्हणालो.' ते 'विशिष्ट रिव्हॉल्व्हर असं मी म्हणालो नाही" पाणिनी म्हणाला

"त्यावेळेला मी पाणिनी पटवर्धन याच्या निदर्शनाला आणून दिलं की ज्या गॅरेजमध्ये प्रेत सापडलं त्या ठिकाणी रुद्रांश गडकरी नावाच्या एका साक्षीदाराने दोन माणसांना गॅरेज जवळ बघितलेलं आहे आणि साधारणतः खुनाच्या अंदाजीत वेळेलाच त्या दोन माणसांना बघण्यात आलं आहे या दोन माणसांपैकी एक व्यक्ती म्हणजे आरोपी होती आणि तिच्याबरोबर दुसरी असलेली व्यक्ती म्हणजे पाणिनी पटवर्धन यांच्याच सारखी देह यष्टी असलेली एक व्यक्ती होती. म्हणून मी पटवर्धन यांना सांगितलं की तुम्ही उभे रहा आणि थोडं चालून दाखवा म्हणजे माझ्याबरोबर आलेला हा साक्षीदार खात्री पटवू शकेल की त्यांनी त्या दिवशी पाहिलेली व्यक्ती म्हणजे पाणिनी पटवर्धन होते किंवा नाही."

"हातावरचे ठसे घेण्यासाठी जसं पटवर्धन यांनी सहकार्य केलं तसंच सहकार्य त्यांनी याही वेळेला तुम्हाला केला असेल नाही का?"खांडेकरांनी कुत्सितपणे विचारलं

"अजिबात सहकार्य केलं नाही याबाबतीत पटवर्धन यांनी" तारकर म्हणाला

"काय?"नाटकीपणाने जोरात ओरडून खांडेकर म्हणाले,"तुम्हाला म्हणायचे की पाणिनी पटवर्धन उभे रहायला आणि चालून दाखवायला अजिबात तयार झाले नाहीत?"

"मला वाटतं की हा प्रश्न वाद उत्पन्न करणार आहे एकदा विचारून झालेला आहे आणि त्याला उत्तर देऊनही झालेला आहे" न्यायाधीश म्हणाले. "मला नवल एका गोष्टीचं वाटतंय की अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांना पाणिनी पटवर्धन हे स्वतः हरकत का घेत नाहीयेत?"

"न्यायाधीश महाराज आज कोर्टात खटला ऐकायला वर्तमानपत्राचे पत्रकारही आले आहेत त्यांच्यासमोर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न खांडेकर करत आहेत मला कल्पना आहे की त्यांच्या प्रश्नाला मी हरकत घेत गेलो की माझी चूक लपवण्यासाठी मी तांत्रिक मुद्दे पुढे आणत आहे असा पत्रकारांचा समज होणार आहे आणि त्यातून माझी प्रतिमा अधिकच मलीन होणार आहे मला हे करायचं नाहीये उलट पक्षी मी खांडेकरांना संपूर्ण स्वातंत्र्य द्यायला तयार आहे जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांनी समोर आणावी" पाणिनी म्हणाला

"मी तुमची परिस्थिती समजू शकतो मिस्टर पटवर्धन"न्यायाधीश गालातल्या गालात हसत म्हणाले त्यांनी साक्ष पुढे चालू ठेवण्याची खूण खांडेकरांना केली.

"तर मग मिस्टर तारकर त्यानंतर तुम्ही तुमचा साक्षीदार रुद्रांश गडकरी याने पाणिनी पटवर्धन यांची ओळख पाठवावी यासाठीचे तुमचे प्रयत्न चालूच ठेवलेत?"

"अर्थातच संपूर्णपणे चालू ठेवले मी साक्षीदाराला पटवर्धनांच्या ऑफिसच्या खालील रस्त्यावर माझ्या गाडीमध्ये बसवून ठेवलं वर्तमानपत्राचे पत्रकारही मला याबाबतीत सहकार्य करत होते ते सुद्धा माझ्याबरोबर होते इमारतीच्या मागच्या बाजूच्या दारावर देखील माझी माणसं आणि पत्रकार लक्ष ठेवून होती म्हणजेच पटवर्धन यांनी त्या बाजूने बाहेर पडायचा प्रयत्न केला असता तर ते मला निदर्शनाला आणून देणार होते"

"ठीक आहे पटवर्धन यांनी नेमकं काय केलं पुढे?"

"पाणिनी पटवर्धन यांनी स्वतःला एका मोठ्या पॅकिंग कंटेनर मध्ये बंदिस्त करून तो कंटेनर ऑफिसच्या इमारतीच्या मागच्या दाराने तिथून हलवला जाईल याची व्यवस्था केली."

कोर्टात आश्चर्याने एकदम खसखस पिकली.

"रुद्रांश गडकरी या तुमच्या साक्षीदाराने त्यानंतर पटवर्धन यांची ओळख पटवली?"

"त्यावेळी मी तिथे हजर नव्हतो माझा सहकारी इन्स्पेक्टर होळकर यांच्याकडे ते काम होतं" इन्स्पेक्टर तारकर ने स्पष्ट केलं.

"तुम्ही उलट तपासणी घेऊ शकता मिस्टर पटवर्धन"आव्हान दिल्याप्रमाणे अॅडव्होकेट खांडेकर म्हणाले

( प्रकरण १९ समाप्त.)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel