प्रकरण ४
 मायरा आणि आदित्य कोळवणकरला आपल्या ऑफिस मधे बसवून पाणिनी पटवर्धन पुन्हा मायरा कपाडिया च्या अपार्टमेंट जवळ आला. आत जाण्यापूर्वी त्याने सौम्याला फोन लावला.
“ काय चाललंय तिकडे? अजून किती वेळ काढू शकतेस तू? ”  पाणिनी ने विचारलं.
“ या क्षणापासून पंधरा मिनिटांची हमी देते तुम्हाला.” सौम्या म्हणाली.
“ छान. तेच मला जाणून घ्यायचं होतं.”
“ काळजी घ्या सर.”
“ नाही सौम्या.आम्लेट करायचं तर अंडं फोडायला लागणारच. बर मी बंद करतोय फोन.”
पाणिनीकडे तिच्या फ्लॅट ची किल्ली होतीच तरीही त्याने दक्षता म्हणून बेल वाजवली.दोन तीन वेळा वाजवूनही  आतून दार उघडले गेले नाही,तेव्हा त्याने आपल्या जवळच्या किल्लीने दार उघडलं.आत गेला दार बंद केलं. आधी आला त्या तुलनेत खोलीची अवस्था खूपच छान होती.अॅश ट्रे साफ केलेले होते.अंथरूण पांघरून नीट घडी करून ठेवलं होतं.किचन मधील ओटा चकाचक होता.पाणिनी ने हाक मारली, “ कोणी आहे आत? ”
प्रतिसाद आला नाही.आपल्याजवळची ची दुसरी किल्ली काढून ड्रॉवर उघडला.आत मधे अस्ताव्यस्तपणे कागद पडले होते. पण पत्रात लिहिल्याप्रमाणे चामडी कव्हर असलेली छोटी डायरी तिथे होती आणि त्याच्या शेजारी रिव्हॉल्व्हर होत.त्याने डायरी उचलली शेवटून दुसऱ्या पानावर एक वाहन नंबर लिहिलेला होता.घाईघाईत खरडल्यासारखा वाटत होता.इतर पानांवर बरेच आकडे,हिशोब, फोन नंबर वगैरे लिहिलेलं होत.पाणिनी ने त्याला हवा असलेला गाडीचा नंबर आपल्याकडे लिहून घेतला आणि डायरी जाग्यावर ठेवली.त्याला रिव्हॉल्व्हर हातात घ्यायची तीव्र इच्छा झाली.क्षणभर विचार करून त्याने खिशातून रुमाल काढला आणि हाताला गुंडाळून रिव्हॉल्व्हर उचललं.त्यावरचा नंबर टिपून घेतला. पुन्हा ते जाग्यावर ठेवलं.रुमालानेच ड्रॉवर ची किल्ली लावली आणि ती नीट पुसून ठेवली.पटकन फ्लॅटच्या बाहेर पडला.आपल्या गाडीत बसण्यापूर्वी सौम्या ला फोन लावला.
“ तुम्हाला हवं ते मिळालं?”
“ हो ” पाणिनी म्हणाला
“ तुम्हाला माझ्या कडून आणखी पाच मिनिटं शिल्लक आहेत.”—सौम्या.
“ त्यांना आता तू पद्धतशीर कटवू शकतेस. माझं काम झालंय.पण त्यांना संशय येणार नाही अशा पद्धतीने बोल.फार एक्साईट होऊ नकोस.”
“ तुम्हाला काही अडचण नाही ना आली?”
“ नाही पण खात्री नाही. म्हणजे पत्रात उल्लेख केल्यानुसार डायरी आणि त्यात नंबर लिहिलेला मिळाला परंतू मला वाटायला लागलंय की तिलाच दहा हजाराचं बक्षीस मिळवायचं असावं पण तिच्या बरोबर असलेल्या मित्राला कळू न देता.”
“ तो तिचा बॉय फ्रेंड आहे?”—सौम्या
“ असेल.पण त्या डायरीत लिहिलेला नंबर हा माझ्यासाठी लावलेला सापळा असेल तर  हे प्रकरण वाटतंय तेवढं सोपं नसेल. तरीही माझा अंदाज आहे की येत्या एकदोन दिवसात ती आपल्याकडे दहा हजार मागायला येईल. ” पाणिनी म्हणाला आणि फोन बंद केला. लगोलग त्याने कनक ओजस ला फोन लावला.त्याला मिळालेला नंबर त्याने कनक ला कळवला आणि तातडीने त्याचा मालक कोण ते शोधायची सूचना दिली. बरोब्बर पंधरा मिनिटांनी कनक चा फोन आला.
“ मालकाचं नाव स्तवन कीर्तीकर, आहे आणि पत्ता लिहून घे, ९८६पश्चिम करंद नाका. असा आहे.”
“ मी अत्ता जिथे आहे तिथून जवळ आहे. मी तासाभरात जाऊन येतो.”
“ तुला हा नंबर मिळाला कसा पाणिनी?” कनक ने विचारलं.
“ ते तू सौम्याला विचार.माझ्या ऑफिसात अत्ता त्या संबंधित लोक बसलेत.त्यांना न सांगता मी बाहेर पडलोय.” पाणिनी म्हणाला
“ काही लागलं तर मला फोन कर, पत्ता घेतलास ना नीट लिहून?” –कनक
“ घेतलाय.” पाणिनी म्हणाला आणि फोन बंद करून पटकन गाडीत बसला.दिलेल्या पत्त्यावर तो आला तेव्हा पार्किंग मधे त्याला अपघातातील गाडी दिसली. त्याने जवळ जाऊन गाडीच निरीक्षण केलं.मागच्या बाजूचा रंग उडालेला होता पण नवीन पेन्ट करून हुबेहूब आधीच्या रंगाशी जुळवून घेतलेला दिसतं होता.मागचा टायर नवाकोरा होता. गाडीच्या मागे जाऊन डम्पर बघत असतांनाच दार उघडलं गेलं आणि एक रुंद खांदे आणि जाडसर जिवणी असलेला एक माणूस दारात उभा राहिला.
“ काय चाललंय?”
“ तुम्ही कीर्तीकर?”  पाणिनी ने विचारलं.
“ नाही.”
“ मग ते आत आहेत का?” पाणिनी म्हणाला
“ तुम्ही कोण आहात? आणि अशा रीतीने गाडीशी काय खुडबुड करताय? ”
“ मी खुडबुड करत नाहीये.गाडीची फक्त लांबून टेहळणी करतोय.”
“ तुम्ही कीर्तीकर चे नातलग वगैरे आहात का?”  पाणिनी ने विचारलं.
“ मी काम करतो त्यांच्याकडे.”
“ काय म्हणून? ”
“ ड्रायव्हर आणि स्वयंपाकी म्हणून.”
“ तर मग बोलताना जरा आदबशीर पणे बोल. ” आपल्या खिशातून कार्ड काढून एकेरीवर येत त्याच्याकडे देत पाणिनी म्हणाला.  “ हे कार्ड कीर्तीकर ना दे आणि सांग की अत्यंत महत्वाच्या कामासाठी मला भेटायचंय त्यांना.”
“ तुम्ही बाहेरच थांबा.मी त्यांना कार्ड दाखवून येतो.” ड्रायव्हर म्हणाला.
थोडया वेळाने तो आत जाऊन आला आणि म्हणाला, “ कीर्तीकर भेटतील तुम्हाला.आत या.”
तो पाणिनीला आत घेऊन गेला.पन्नाशीचा एक माणूस सोफ्यावर सिगार ओढत बसला होता. पाणिनी ने पाहिलं तर तो एक हडकुळा माणूस होता.डोक्यावर करडे, विरळ केस होते.पण श्रीमंतीचे तेज तोंडावर होतं.
त्याच्या हातात पाणिनी चे व्हिजिटिंग कार्ड होतं.पाणिनी येताच त्याने उठून अभिवादन केले.
“ अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन? ”  कीर्तीकर ने विचारलं.
“ बरोबर.” पाणिनी म्हणाला
“ बसा ना.मी तुमच्याबद्दल बरंच ऐकून आहे. काय घेणार तुम्ही? चहा कॉफी, की एखादं ड्रिंक?”
“ मी ज्यूस घेईन,असेल तर.” पाणिनी म्हणाला
“ शुअर” तो म्हणाला.त्याने स्वयंपाक्याला खूण केली.तो तत्परतेने त्यांची पेये आणायला पळाला.
“ खूप छान घर आहे तुमचं.” पाणिनी म्हणाला थोड्याच वेळात तो ज्यूस घेऊन आला आणि तिथेच उभा राहिला.पाणिनी ने सूचकपणे कीर्तीकर कडे पाहिले.पण स्वयंपाक्याला तिथून जायला सांगायची दक्षता त्याने घेतली नाही.पाणिनी ने तो जाणार नाही असं गृहित धरून विषयाला हात घातला.
“ या महिन्याच्या तीन तारखेला संध्याकाळी पाच च्या सुमारास, द्वीप कुंड चौक आणि भीष्म चौक या  नाक्यावर झालेल्या अपघातात तुमची गाडी होती.कोण चालवत होतं ती? तुम्ही की तुमचा ड्रायव्हर?”  पाणिनी ने विचारलं.
“ यात प्रश्न काय आहे?”
“ गाडी कोण चालवत होतं हा प्रश्न आहे.अपघातात तुमची गाडी होती का हा प्रश्न नाहीये. तो आरोप आहे.”
“ मला कमालीचं आश्चर्य वाटतंय. फारच.” कीर्तीकर म्हणाला.
“ म्हणजे तुम्हाला काय सुचवायचय? तुम्ही चालवत नव्हतात गाडी?”
“ बिलकुलच नाही पटवर्धन.” कीर्तीकर म्हणाला.
पाणिनी ने ड्रायव्हर कडे पाहिलं तर त्याचा चेहेरा मारक्या म्हशीसारखा झाला होता.
“पटवर्धन, मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच माहिती तुम्ही मला विचारताय.” कीर्तीकर.म्हणाला. “ आशा आहे की अपघात फार गंभीर नसावा.”
“ गंभीर होता. कीर्तीकर.” पाणिनी म्हणाला
कीर्तीकर गप्प राहिला.
“ नेमकी कशाची भीती वाटत होती?” पाणिनी ने विचारलं.
“ माझी गाडी चोरीला गेली होती. पोलिसांनी ती त्या दिवशी संध्याकाळी उशिरा शोधून काढली.ते म्हणाले की पेट्रोल ची टाकी निम्मी रिकामी झाली होती आणि गाडी जवळजवळ शंभर किलोमीटर चालवली गेली होती.” कीर्तीकर म्हणाला.
“ मी पियुष पेंढारकर चं वकीलपत्र घेतलंय.त्याची आई गाडी चालवत होती.पियुष अत्यंत वाईट पद्धतीने जखमी झाला आहे.कितपत गंभीर आहे दुखापत ते अजून कळलं नाहीये.”
“ फारच वाईट घटना आहे ही. मला माझ्या वकिलाचा सल्ला घ्यावा लागेल.मला वाटत मी माझी गाडी कुणाला दिली असती तर मी जबाबदार होतो नुकसानीला पण चोरी झाली असेल.”
“ आपली गाडी अडचणीत सापडली तर चोरीला गेली असं सांगायची युक्ती आता जुनी झाली.दुसरे काहीतरी सांगा.” पाणिनी म्हणाला
ड्रायव्हर एक पाऊल पुढे सरकला.कीर्तीकर ने त्याला हाताने खूण करून मागे जायला सांगितले.
“ वकील म्हणून तुम्हाला माझ्यावर अप्रत्यक्ष आरोप करायचा नसावा असं मी मानतो.”
“ ठीक आहे मी जरा लांबचा घास घेतो.मला सांगा की गाडी चोरीला कधी गेली?”  पाणिनी ने विचारलं.
“ दुपारी तीन च्या सुमारास.”
“ बर, आणि त्याची तक्रार कधी केली गेली?”
“ संध्याकाळी सात पर्यंत माझ्या हे लक्षात सुध्दा आले नाही.सात ला मी  क्लब मधून बाहेर जायला निघालो आणि लक्षात आलं की गाडी जाग्यावर नाहीये.” कीर्तीकर म्हणाला.
“ आणि तुम्ही लगेच तक्रार नोंदवली?”
“ लगेच.”
“ हरवलेल्या ठिकाणापासून गाडी सापडल्याचे ठिकाण किती अंतरावर होतं?”  पाणिनी ने विचारलं.
“ आठ-दहा चौक दूर असेल.”
“ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पियुष ला  खूप मार बसलाय. त्याच्या आईला नैराश्याचा झटका आलाय.शिवाय गाडीची नुकसानी झाल्ये ती वेगळीच.”
“ माझी खात्री आहे पटवर्धन, मी जबाबदार आहे याला असं तुम्हाला वाटत नाहीये.” कीर्तीकर म्हणाला.
“ साक्षीदारासमोर मी कुठलेही थेट आरोप करायची चूक मी करणार नाही कीर्तीकर.पण त्याच बरोबर हे सांगतो की न्यायाधीशांसमोर मी काय सांगेन हे ऐकणे तुम्हाला नक्कीच आवडणार नाही.” पाणिनी म्हणाला
“ पटवर्धन माझ्या गाडीचा सर्व समावेशक विमा उतरवला आहे. कुणाचे काहीही नुकसान झालं असेल तर विमा कंपनी भरपाई करेल त्याची.”
“ ठीक आहे, तुमची तशी इच्छा असेल तर मी तुमच्या विमा कंपनीशी बोलेन.”
“ जर का काही जबाबदारी निश्चित करायची वेळ आली तरच.” कीर्तीकर म्हणाला.
“ अर्थात.” पाणिनी म्हणाला  “ कुठल्या क्लब मधे गेला होतात तुम्ही गाडी घेऊन कीर्तीकर? जिथून ती चोरीला गेली? ”  पाणिनी ने विचारलं.
“बृहन क्लब. ”
पाणिनी निघण्याच्या तयारीत उठून उभा राहिला.  “ बरं वाटलं भेटून.”
कीर्तीकर पण उठायच्या विचारत होता पण पुन्हा बसला.ड्रायव्हर पाणिनी ला सोडायला दारापर्यंत आला.पाणिनी बाहेर पडताच त्याने दाणकन दार लावून घेतलं.
(प्रकरण ४ समाप्त.)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel