१०. येईल, एक दिवस येईल
श्रीनिवासराव रडत बसत. मिनीचे स्मरण होताच त्यांना मुलासारखे रडू येई. मिनीचे त्यांना वेड होते. मिनी त्यांच्या जीवनाचे जीवन होती. त्यांच्या कर्मपसार्याचा ती आधार होती. मिनी निघून गेली व त्यांचा आनंद गेला. मिनी निघून गेली व त्यांची करमणूक गेली. मिनी गेली, असे त्यांना वाटेच ना. बाजारातून मिनीसाठी ते मिठाई घेऊन येत व घरी येऊन सर्वत्र हाका मारीत. या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत, सर्वत्र हिंडत. ''मिने, रडू नको, रुसू नको, ये पटकन. हा घे खाऊ.'' ते हाका मारून म्हणत. मिनीच्या मातेच्या पवित्र तसबिरीजवळ ते जात व म्हणत, ''तू तरी मार ग मिनीला हाक. आईच्या हाकेनं मूल येतं. मी मिनीची आई झालो होतो, परंतु आईची सर का मला येणार? आई ती आई. माऊलीची माया माऊलीच करू जाणे. नाही मारीत तू हाक? तूही माझ्यावर रागवलीस? रागवा, सारी माझ्यावर रागवा.''
बगीच्यातून ते सुंदर फुले घेऊन येत. फुलांचा गजरा करीत बसत. ''कोणाला गजरा?'' असे कोणी विचारले तर म्हणत, ''अहो, मिनीला ! फार आवडतात तिला फुलं. फुलांसाठी रडायची. लहानपणी एके दिवशी चाफ्याचं फूल मिळालं नाही म्हणून जेवली नाही. मिनीच्या केसात किती छान दिसतात फुलं. अजून कशी आली नाही? फुलं पाहातच धावत यायची. मिनी म्हणजे फुलपाखरू. आज रुसून का बसली, का या दाराआड आहे? दाराआड ती लपून बसायची. मी शोधून दमलो म्हणजे एकदम कोपर्यातून हसायची. अंधारात प्रकाश आणायची. ये ग मिने, आता तू कोपर्यात मावणारसुध्दा नाहीस. आता मोठी झालीस तू. लपशील तर पटकन दिसशील. गजरा झाला हो पुरा. का येत नाही? मला कंटाळली? या फुलांना कंटाळली? मिनीनं का अदृश्य रूप धारणं केलं आहे? बापाची गंमत करते आहे लबाड. नाही येत तर नाही. मिनीच्या फोटोलाच मी हार करून घालतो.''
जेवायला बसताना मिनीसाठी ते पाट मांडायचे. तिचे ताट वाढायचे, पाण्याची चांदीची झारी तेथे भरून ठेवावयाचे. ''मिने, चल ग लवकर. भुकेली असशील. तुझ्या आवडीची आहे हो केलली भाजी.'' असे म्हणून वाट पाहायचे. शेवटी ते ताट उचलीत व मिनीच्या फोटोपुढे ठेवीत.
''फोटोमधील मिने, खा हे सारं. फोटोत तरी तू आहेसच. येथून कोठे पळशील? नाही खात? नामदेवाचा नैवेद्य पाषाणमय मूर्तीनं खाल्ला, माझा नैवेद्य कागदी मिनी का खात नाही? नामदेवाच्या भक्तीनं दगडाला चैतन्यमय केलं, शिळेला शिव बनविलं. त्याला तेथे दगड नव्हता दिसत, त्याला खरोखर देव तिथे दिसत होता. त्याचा भाव मी कोठून आणू? मजजवळ कोठे आहे तसे प्रेम? खा, मिने खा. मी डोळे मिटतो व एक, दोन, तीन मोजतो. हां. नाही खात फोटोमधली मिनी. मग मी तरी कसं खाऊ? परंतु न खाईन तर जगेन कसा व मिनी एक दिवस येईल, तिला भेटेन कसा? चार घरी तरी खाऊ दे. चारच घास. मांस अंगावर येण्यासाठी नाही, केवळ जगण्यासाठी.''
एके दिवशी कापडाच्या दुकानात ते गेले व रेशमी साडी मागू लागले. ''कोणाला हो साडी?'' दुकानदाराने विचारले. ''मिनी नाही का माझी? रेशमी साडी तिला छान दिसते. पण खरंच नको हो. माझी मिनी की नाही, आता खादी वापरते. विसरलोच मी. माझ्या हाताच्या सुताचीच आता मिनीला खादी देईन. बारीक काढतो सूत, जसे चंद्राचे किरण. बारीक काततो सूत जसा कोळयांचा धागा. परंतु इतकं बारीक मिनीला आवडणार नाही. रागावेल ती. मध्यमच काढावं.'' असे म्हणून मग घरी गेले व चरख्यावर सूत कातीत बसले. ''पुरे आता, किती कातीत बसाल?'' असे कोणी तरी म्हटले. तेव्हा म्हणाले,''ती परत येईपर्यंत सूत पुरेसं होऊन ते विणून ठेवलं पाहिजे. केव्हा परत येईल कोणाला माहीत ! उद्यासुध्दा यायची. कातू दे मला. हात दुखेपर्यंत कातू दे. मिनी येईल, माझा हात चेपील. 'येथे का दुखतो बाबा?' असे गोड विचारील. मिनी म्हणजे माझी गोड मैना, गोड कोकिळा. कोठे रुसून गेली? कोठे फुलला तिचा वसंत, कोठे गेली कुहू करायला? कोठल्या आम्रवृक्षावर बसली मोहून?''