मध्ये येथे केवढं वादळ ! मोहन, त्या वादळात तुझी दुबळी शांता सापडली होती. वाट दिसेना. सारा अंधार, अंधार. डोळे धुळीनं भरले. मी पडले, रडले. परंतु शेवटी रस्ता सापडला. तुझी शांता तुझ्या स्मरणानं सुखरूप परत आली.

मोहन, तुझं स्मरण तारणारं आहे, वाट दाखवणारं आहे. माझ्या मोहन मोह-नाशन आहे. नाम तारतं याचा मला अनुभव आला. पवित्र अनुभव. रोमांचकारी अनुभव.

मी येथे बायकांचा साक्षरता वर्ग लवकरच सुरू करणार आहे. बर्‍याच भगिनी येणार आहेत. हल्ली मी एका गरीब मोलकरणीजवळून जेवण घेते. दोन भाकर्‍या व कालवण वेळेला आणून देते. तिला थोडी मदत होते.

मोहन, तू फार नको कष्ट करू. प्रकृतीस जप. मीही आता अगदी काटकसरीने राहणार आहे. येथे काही कामधाम मिळालं तरी पाहणार आहे. तू आता धनगावला आहेस. तेथे कामगारांची खूप संघटना करता येईल. तू त्यांच्यात मिसळतोस का? परंतु तुला वेळही होत नसेल. माझा मोहन दिवसभर काम करून थकून जात असेल. कोण म्हणेल त्याला, 'दमलास हो,' कोण म्हणेल त्याला, 'जरा विसावा घे.'

मोहन, तू व मी केव्हा बरे क्रांतीचे झेंडे हातात घेऊन सारे किसान-कामगार उठवू? पोलिसांचा लाठीमार होत आहे, गोळया सूं सूं येत आहेत. आपण लाठीसमोर डोकं केलं आहे, गोळीसमोर छाती केली आहे. इन्किलाब गर्जना होत आहे. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीचे तुकडे उडत आहेत. नवभविष्याची रक्तप्रभा येत आहे. केव्हा बरं असं होईल? ही आपली जीवनं केव्हा बरं कृतार्थ होतील?

मुकुंदराव आले का? भाऊचे काय वर्तमान? सोनखेडच्या आश्रमातील दयाराम वगैरे कुशल आहेत ना? तुला त्यांची कळते का वार्ता? शिवतरला काय हालचाल आहे? गीता चालवते ना वर्ग? गावात फार दडपशाही चालली आहे. मागं लिहिलं होतंस. जितकी दडपशाही होईल, तितकी पुढे जागृती अधिक होईल.

मोहन, क्रांतीचा पंथ बिकट आहे. शांतेचा हात धट्ट धरून ठेव. मोहन, तू एका शेतकर्‍याचा कष्टाळू मुलगा ! परंतु किती तुला समजूत, कशी धारणाशक्ती, किती उदार स्वभाव, किती दिलदार हृदय, कसं गोड अकपट हसणं, कसं सहजसुंदर पाहणं, किती त्याग, किती ध्येयनिष्ठा, किती सहनशक्ती, किती आशा ! शिकलेली किती मुलं मी पाहिली; परंतु तुझी सर एकाला नाही. देवाच्या शाळेत तू शिकलेला ! मी तुला शिकवीत असे. मोहन, तूच मला नकळत अनंत शिकवलेस. मी तुला, पाटीवरचं पटकन पुसून जाणारं अक्षर शिकविलं. परंतु तू मला खरोखरच अ-क्षर असं ज्ञान, न पुसणारं ज्ञान दिलंस. तू मला मुक्त केलं आहेस. किसान कामगारांना मुक्त करू पाहणार्‍या मोहना, तू सर्वाआधी शांतेला अहंकारातून, मोहातून, विलासातून मुक्त केलं आहेस. ही मुक्त सखी हाती धर व तिला बरोबर घेऊन क्रांतीच्या संगरार्थ उभा राहा.

पुरे आता मोहनाशना, प्रेमराया मोहना, हृदयदेवा मोहना,

तुझीच शांती

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel