मी बाबांबरोबर येत आहे. आईचे अनंत आशीर्वाद; ही संसारयात्रा सुखकर व्हावी म्हणून बरोबर घेतलेली शिदोरी घेऊन मी येत आहे. प्रद्योतच्या वडिलांचे मंगल आशीर्वाद घेऊन येत आहे. माझ्या मैत्रिणींच्या सदिच्छा घेऊन येत आहे. माझ्या गावातील कळकीच्या बनातील संगीत, वनदेवतांचे ते आशीर्वाद, ते घेऊन येत आहे.
मला पाहून तुम्ही हसाल. जरा दूर उभं राहून बोलाल. मध्येच खाली, मध्येच वर बघाल. जरा गमतीची त्रेधा उडेल नाही तुमची? संसारातसुध्दा असंच राहिलं पाहिजे. जरा जवळ, जरा दूर चित्रकार चित्र दोन्ही रीतीने पाहतो. जरा लांब धरून बघतो. कसंही पाहिलं तरी ते गोड दिसलं पाहिजे.
आता तुमच्या शांताबाई मी पाहीन. त्यांचा तर संसार सुरूही झाला. लवकरच सुरू होणार्या प्रसिध्द 'मराठी स्त्री-जीवन' पुस्तकाचा मन्वंतर मासिकात आलेला भाग तुम्ही मला दाखविला होतात. त्यातीलओव्या माझ्या आईला, माझ्या मैत्रिणींना किती आवडल्या ! त्या ओव्यात एक ओवी आहे :
पाऊस पडतो मृगाआधी रोहिणीचा
पाळणा हालतो भावाआधी बहिणीचा
भावाच्या संसाराआधी बहिणीचा संसार. बहिणीचा संसार नीट मांडून देऊन भाऊ मग स्वतःचा संसार मांडतो. शांताबाईंना ही ओवी म्हणून दाखवीन. माझ्या मराठी उच्चाराला त्या हसतील. गंमत होईल.
किती मी लिहीत बसले ! पुरुषांचं सुटसुटीत पत्र; बायकांचा पसारा. तुम्ही नेहमीच म्हणत होता, 'मायेचा पसारा.' आता आटोपते हो हा मायेचा पसारा व एका वाक्यात साठवते तो सारा. माझे तुम्ही व मी तुमची कोण?-
- वेडी माया.
रामदासच्या लग्नाची वार्ता सर्वत्र गेली. सर्वांना आनंद झाला. दयाराम वधूवरांना स्वतःच हातच्या सुताचे कपडे देणार होता. तो जपून सूत कातीत होता, अखंड सूत. न तुटलेल्या सुतांची सणंगे तो विणणार हाता. सूत काढायला बसण्यापूर्वी प्रेमळ दयाराम चरख्याला तेल घाली. सारे नीट बघे. पेळू स्वच्छ. अतिस्वच्छ करून घेई. नंतर देवाला स्मरून कातू लागे. एकदाही सुटला नाही धागा. हलक्या परंतु दृढ हाताने, एकाग्रतेने तो कातीत होता. त्याच्या त्या सुताच्या गुंडयावर दृष्टी ठरत नसे. किती गोड व स्नेहाळ दिसे ते सूत ! किती निर्मळ व समान होते ते सूत !
पार्थाने ते विणलेही हळूवार हाताने. शक्य तो धागा तुटू नये, तंतू तुटू नये म्हणून त्यानेही दक्षता बाळगली; अशी ती विवाहमंगले, विवाहकौतुके निर्मिली जात होती. दीनबंधू रामदासाचे लग्न ! खेडयातील स्त्रीपुरुष आनंदले. रामदासाला लग्नभेट देण्यासाठी उत्सुक झाले.
माया निघाली. बरोबर वडील निघाले. 'सांभाळ हो बेटी,' आई अश्रूतून बोलली. बंगाल सोडून निघाली. सस्यश्यामल हरितमनोहर बंगाल, हिमालयावरून येणार्या पवित्र वार्यांनी पुलकित होणारा बंगाल, सागरावरून येणार्या शीतल व आर्द्र वार्यांनी संपन्न होणारा बंगाल, पवित्र नद्यांनी न्हाऊमाखू घातलेला बाळसेदार बंगाल, बांबूच्या बनातील संगीताने नादमधुर होणारा बंगाल, कमळांचा रमणीय बंगाल. शेकडो प्रकारच्या विहंगांच्या कलरवाने मधुर वाटणारा बंगाल, कलावंतांचा, धीमंतांचा, शास्त्रज्ञांचा बंगाल, हुतात्म्यांचा बंगाल, त्यागमय, धर्ममय, प्रेममय, स्नेहमय, ज्ञानमय, आनंदमय बंगाल ! माया सोडून येणार होती असा हा बंगाल. परतुं तिला तो कसा सोडता येईल? तिच्या जीवनातच तो होता. अनंत बंगालला तिने आपल्या लहान जीवनात भक्तीने सामावून घेतले तो बंगाल महाराष्ट्राला भेटवण्यासाठी ती निघाली.
मर्यादित बंगाल संपला व तिने अश्रूपूर्ण प्रणाम केला. डोळे मिटून पुन्हा एकदा ती भूमी तिने पाहिली. डोळे उघडून पुन्हा एकदा दूरवर पाहिली.
माया महाराष्ट्रात आली. बंगाल महाराष्ट्रात आला. चैतन्य नामदेवाला भेटू आले. कृतिदासांचे रामायण श्रीधरांच्या रामविजयाला भेटू आले. बंगालचा कालिदास महाराष्ट्राच्या भवभूतीस भेटू आला. नैय्यातिक गदाधर वैय्याकरण भट्टोंजी दीक्षित यांना भेटू आला. विशाल नद्या उंच पर्वताचे पाय धुण्यासाठी आल्या.
माया व रमेशबाबू सोनखेडीच्या सीमेवर आली. तेथे पुष्पहारांनी, लतापल्लवांनी, सुतांच्या हारांनी, राष्ट्रध्वजांनी सजवलेला सुंदर रथ होता. वधूची मिरवणूक निघाली. जणू बंगालच्या बलिदानाची महाराष्ट्र पूजा करीत होता. वाटेत लोकांनी फुले उधळली. सुवासिनींनी ओवाळले. रमेशबाबू मुकुंदरावांबरोबर चालत होते. त्यांचे डोळे प्रेमाने भरून आले. ''राष्ट्रीय ऐक्याचा विजय असो, संपूर्ण स्वातंत्र्याचा विजय असो, क्रांती चिरायु होवो', अशाच गर्जना याही मिरवणुकीत. नवीन गर्जना नाहीत, नवीन गाणी नाहीत, लग्न करा वा न करा. ध्येय हे ठरलेलेच आहे. त्या ध्येयाचा विसर कधीही नाही पडता कामा. मायेच्या डोळयांसमोर विवाहाचे मंगल येत होते की क्रांतीची दंगल येत होती? खरे मंगल क्रांतीतूनच येईल; तेव्हाच सर्वांना मंगल लाभेल, असा अर्थ त्या गर्जनांतून, त्या गानांतून तिला मिळत होता.