ईळ जाई कामाखाले रातीं झोप नाहीं आली

अग माझे मायबाई तुझी मला सय झाली

सासर ग वासिनीला रात खरी मायबहिन

असा कोंबडा दुस्मान बांग टाकी टवकारुन

*

भर्ताराचा राग जसा पेटारीचा नाग

अग माझे मंगूबाई त्याच्या मरजीनं वाग

अग भर्ताराचा राग घेईना ग गंध पानी

अग माझे सईबाई घाल पिरतीची मव्हनी

भर्ताराचा राग जसा इस्त्याचा इंगूळ

बाई नेनंते ग माझे त्याची मरजी सांभाळ

भर्ताराचा राग दुधावरली उकळी

नेनंते ग बाई माझे नको होऊं उतावळी

*

सासु सासर्‍याचं येऊं देऊंने गार्‍हानं

अग माझे मंगूबाई लेकी नांदावं भारानं

नंदा जावांच बोलनं जसे सराटयाचे येल

अग माझे सईबाई सखे तुडवीत चाल

*

जाईना ग ऊभ्या रस्त्या दिसूं देईना पासवा

मायबाई हरनीचा आहे पवित्र कूसवा

जाईना ग उभ्या रस्त्या पाहीना ग कूनाकडे

मायबाई देसायाला समुद्राला पानी चढे

पराया ग पुरुषाला बोलूं ने ग येकायेकी

अग माझे सईबाई अपुन अशीलाच्या लेकी

पराया ग पुरुषाला माघूने ग कात चूना

नेनंते ग सईबाई आपुन अशीलाच्या सूना

इरुद्या ग जोडव्याचा पाय टाकावा जपून

हे ग माझे सईबाई लेकी भल्याच्या आपुन

*

शेजी आली घरा बस म्हणतें ग तीला

मायबाईच्या ग माझ्या हरनीचा शीक मला

*

पराया ग परदेशी आपलं ग नाहीं कोनी

अग माझे सखे बाई शेजी कर माय बहिनी

*

मांडीचा ग पाळणा डोळ्याचा ग केला दीवा

मायबाईचा ग माझ्या उपकार फेडूं कव्हां

नऊ महीने ग वझं असं वागविलं माझं

हरन ग मायबाई गंगाबाई नांव साजं

नव महीने ग वझं माझं वागविलं कुशी

मायबाई हरनीला फिरुनी ग बोलूं कशी

समुद्र ग सोखील्यानं जाईना ग माझी तहान

अशी माझी मायबाई गंगा भरली आसमान

*

बापाचा ग उपकार काशी गेल्यानं ग फीटे

मायाबाईचे ग मह्या हरनीचे कष्‍ट मोठे

देसाई ग राया माझे काशी खंडीचे ग ऋषी

माय हरण माझी विष्णुपदाची तुळशी

*

देसाई ग राया माझा काशी खंडीचा ग वड

हरन ग मायबाई त्रिवेनीचं पानी गोड

देसाई ग राया वड मायबाई ग गोंदन

काशीची ग वाट जाती दोन्ही झाडांच्या मधून

*

प्रपंच करुनी परमार्थ केले दोन्ही

असे माझे माय-बाप मोक्षाचे झाले धनी

*

दळन ग कांडनाला आहे बाह्या बळ माझं

हरन ग मायबाई वाघिनी ग दूध तुझं

दळन ग कांडनाला बाह्याला ग माझ्या बळ

मायबाईनं घातलं घुटीमधें जायफळ

थोरलं ग माझं जातं म्यां ग वढून पाहीलं

मायबाई हरनीचं दूध कारनी लागलं

दळना ग परीस दे ग निघळन भारी

मायबाईच्या दुधाची झडती ग द्येते नारी

*

थोरल्या ग जात्याला नार झाली ग घाबरी

मायबाईच्या दुधाच्या पेलें मधाच्या घागरी

*

बारा वर्सं तप तप केलं रे बामना

बाळ नेनंती ग माझी कन्यादानीं देवंगना

सावळ्या ग जावयानं दिवसा ग चोरी केली

बाळ नेनंती ग माझी माळ पुतळ्याची नेली

सावळा ग जांवाई सोन्याचं ग इंद्रावन

बाळ नेनंती ग माझी देली तुळस लावून

*

हात जोडून ईनंती यीहिनीबाई कागदांत

बाळ अन्हाड ग माझी सई घ्यावी पदरांत

हात जोडून ईनंती यीहिनीबाई ग गडनी

बाळ नेनंती ग माझी देलं काळीज तोडूनी

हात जोडून ईनंती हे ग यीहिनीबाई तूझी

अशी अन्हाड म्हनूनी हरन सांभाळावी माझी

*

सासर्‍या ग सासरवास नग करुं यीहिनीबाई

बाळ नेनंती ग माझी अन्यवा ग जोगी नाहीं

*

हात जोडुन ईनंती याह्या परीस यीहीनीची

सखे बाईची ग माझ्या भूक जानावी तान्हीची

हात जोडुन ईनंती यीहिनीबाई तूं ग गंगा

बाळ बेनंतीला माझ्या जेऊं घालून काम सांगा

हात जोडुन ईनंती यीहिनी बाई तूं ग साळू

अन्हाड ग बाळ माझी नवीनाचं काम हळूं

*

लेक सासर्‍याला जाती डोळ्याला ग येती गंगा

नेनंत्या ग मयनाला महिन्याची बोली सांगा

लेक सासर्‍याला जाती वाईट ग नको मानू

नेनंती ग बाई माझी आठा दिसा तुला आनू

*

अशी सांगून धाडीतें आल्या गेल्या हातीं तुला

भाई राजसानं माझ्या पंचमीला न्यावं मला

दिवाळी ग दसरा माझ्या जिवाला आसरा

भाईराजस ग माझा मूळ नीघतो उशीरा

*

वाटच्या वाटसरा काय पाहाशी शेताला

भाईरायाच्या रे माझ्या ढवळेनंदी आऊताला

पान्या पावसाचं आभाळ ग आलं मोडी

सावळा ग भाऊराय तिपनीचे नंदी सोडी

अरे तुझ्या जीवासाठीं आभाळांत व्हईन घार

भाईराजसा रे माझ्या छाया करीन तुजवर

गांवाला ग गेलीयाची म्यां ग चिंता न्हाई केली

भाईरायाच्या ग माझा सोबतीला अंबा गेली

कचेरीचं बलावनं मागं पुढं ग मानूस

असा माझा भाईराय मधे मोत्याचं कनीस

*

माझं रे आयुक्ष कमी करावं पुरतं

भाई सावळ्याला माझ्या घाल शंभरावरतं

*

भाईरायाच्या ग घरीं आज सटीचं मेहून

देवा मल्हारी रे राया यावं म्हाळसा घेऊन

नऊ दीस नवरात्र भाईरायाच्या ग घरीं

दयाळू ग अंबामाय फुलाच्या ग शेजवरी

अंबामाय माऊलीचं आसन ग रुंदावलं

भाईरायाला ग माझ्या भगताला भाग्य आलं

लक्षुमी ग बाई आली तांब्याभर ताक पेली

भाई सावळ्याला माझ्या जल्माची भाक देली

सुखी राख देवा माझ्या कुळाचा दीपक

सये माझा भाईराज बहेनीला भाऊ येक

*

दिवाळीच्या दिशीं ववाळीतें बापाला

सई नेनंती ग माझी मोतीं माघती कापाला

हे ग दिवाळीचे दिशी तबकीं ग पांच केळ

अग माझे मायबाई ववाळीतें तुझं बाळ

*

चोळी ही ग फाटली ठिगळ लावीना बाहीला

बहेना ग बाई माझी आऊक्ष माघती भावाला

माझ्या चुडीयाचा ठसा इथं कोनाला येनार

आतां माझा भाईराज भाऊबीज करनार

काळी ही ग चंद्रकळा कांठाला ग तीन बोटं

भाईरायाचं ग माझ्या घेनार्‍याचं मन मोठं

पाठीवरला ग भाऊ लई मायाळू दिसतो

अ सये दुकानांत खन अंजिरी पूसतो

*

दसर्‍या पासूनी दिवाळी ग ईस रोज

नेनंती ग बाई माझी वाट पहातां नीज

*

मुर्‍हाळ्या रे मूळ जाशी घोड बांध शेवंतीला

सखेबाईला ग माझ्या आधीं भेट नेनंतीला

मुर्‍हाळ्या रे मूळ जाशी खून सांगेत दूसरी

सखेबाईची ग माझ्या मैना खेळती वसरी

*

नेनंत्या ग मुर्‍हाळ्याची हौस माझ्या ग मनाला

भाच्या माझ्या नेनंत्याचा हात पुरना जीनाला

*

दिवाळीची चोळी व्हइल जात्याचं झाडनं

भाईंराजस रे माझा द्यावा डागीना धाडून

*

पाटाऊ रे पइठनी आहे माझं रे नेसनं

परी माझ्या भाईराया तुझ्या चोळीचं भूषनं

शेजी पुसत्यात चोळीला ग काय देलं

भाईराजसाला माझ्या दिवाळीला ववाळीलं

दिवाळीच्या दिशीं तबकीं ग चंद्रहार

भाईराजस ग माझा ववाळीला सावकार

*

दिवाळीची चोळी संक्रांतीला तीळ-लाडू

भाई राजसा रे माझ्या नको माझी आस मोडूं

*

अशी चंदनाची उटी बाळा तुला कुठं झाली

सखेबाईनं ग माझ्या बहिनीनं बीज केली

दिवाळी ग दसरा आपल्या ग घरीं केला

सये माझा भाईराय बीजला म्यां बलावीला

*

बहेनीचं घेतो कडे आपलं ग धरीं हाती

भाईराजस ग माझा मनधरनीचा किती

*

मामा मांडीतसे पाट मामी काढीती रांगोळी

अरे माझ्या तान्ह्या बाळा तुझं कवतिक आजोळीं

*

भाऊ ग आपूला भावजय ग पराई

अग माझे सये बाई मनधरनी करावी

भाईराज ग म्हनीतो बहेनीला कर भात

भावजय ग बोलली साळी पडल्या पेवांत

हे ग भाऊ म्हनीतो बहेनीला वाढ दही

भावजय ग म्हनीती दूध ईरजलं नाहीं

हे ग भाऊ म्हनी बहेनीला वाढ तूप

भावजय ग बोलली गवळ्यांनी नेलं माप

भाऊ चोळी शीवी भावजय ग रागांत

भाईराजस ग माझा शिंपी बलावी बागांत

*

अभंडया नारीनं सये कुभांड रचीलं

भाईरायाचं ग माझ्या मन सख्याचं मोडीलं

*

लेकीचा जलम घालूं नग देवराया

मायबाई हरानीचे केले कष्‍ट गेले वाया

लेकीचा जलम परघरची ग धन

भाईराजस ग माझा चंद्र वाडयाला राखन

लेकीचा जलम नग घालूं देवराया

लेक देऊन पडा पाया केले कष्‍ट सर्वे वाया

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel