बारा वरुषाची लेक । झाली आईबाई ।

येडी झाली मायबाई ॥

बारा वरुषाची लेक । झाली परक्याचं धन ।

सई झाली शेजारीन ॥

*

दूरच्या देशींची मी । माझा जीव ऊदासला ।

बंधू माझ्या सोयर्‍याला । वेगी धाडा जासूदाला ॥

सांगून धाडितें । आल्यागेल्याला गांठून ।

मायबाई माझे । झालें लईंदी भेटून ॥

नीरोप करींते । आल्यागेल्याला पाहून ।

भाईराजसाला माझ्या । सांगा वाडयांत जाऊन ॥

निरोप करीतें । आल्यागेल्या परोपरी ।

भाईराजसा रे माझ्या । भेटी यावं सरासरी ॥

पानवंताच्या बायांनो । सांगा माय हरनीला ।

उतावीळ ग मयना । वेगी धाड बंधवाला ॥

*

माहेरीं जाईल । माहेरीं मायबाई ।

भाईराजसाची राणी । विसाव्याला भावजई ॥

भाऊच्यासारखा । कोन बोलला वाडयांत ।

करीत होतें ताक । रवी सोडली डेर्‍यांत ॥

घरांत करतें काम । बाहेर माझं मन ।

भाऊच्यासारखं । कोनीं केलं 'रामराम' ॥

*

तुझी वाट रे पाहून । डोळे झाले कुखावानी ।

सोयर्‍या बंधवा । काशी माया लोकावानी ॥

तुझी वाट रे पाहून । माझे डोळे झाले गारा ।

सोयरा बंधू माझा । गुंतला संसारा ॥

तुझी वाट रे पाहून । लाली डोळ्याची फांकली ॥

बंधवाला माझ्या । आन गळ्याची घातली ॥

*

महीना महीना । भाईराजसाचं घोडं

सख्या राजसाला माझ्या । बहीणीचं फार वेड ॥

सहा महीन्याची भेट । वर्षावर गेली ।

निष्‍ठूर माया केली । भाईराजसानं ॥

भावजय ग सांवळी । कोन्या राजाची मयना ।

सोयरा भाईराज । सखा भेटीला येईना ॥

*

बहीण ग भाऊ । एक्या वेलाची वाळकं ।

आली परायाची लेक । तिनं केली ताटातूट ॥

बहीणभावाची । बाळपणीं गोडी ।

आली परायाची लाडी । तिनं केली मनमोडी ॥

बहीणभावंडं । एक्या झाडाचीं संतरं ।

मधीं पाडती अंतर । सांवळी भावजई ॥

भाईराजस आपला । भावजय परायाची ।

वेणी घालिते गोफाची ॥

बहीणभावंडं । कांही लागना भेद ।

सीतामालन माझी । रानी मोहळाचा मध ॥

बंधवापरीस । मालन चांगली ।

घडी रंगाची लागली । हजार दींडामंदीं ॥

*

बहीणीचें घरीं । भाऊ गेले लई दीसां ।

गोफाचे कडइरे । बहिण अकलीती फासा ॥

माझ्या घरीं ग सोयरा । आतांची डाळभाजी ।

बंधूच्या भोजनाला । पेढे करीतें मोलबाजी ॥

शेजारीनीबाई । ऊसने दे ग गहूं ।

बंधू आला घरीं । बाजाराला कव्हां जाऊं ॥

शेजारीनीबाई । ऊसन्या दे ग जवा ।

बंधू आला घरीं । बाजाराला जाऊं कव्हां ॥

माझ्या घराला पावना । खांडापानाची तयारी ।

धमनी वाडयाच्या बाहेरीं ॥

*

माझ्या घराला पावना । खांडापानाला बोलवा

धमनी वाडयाला कलवा ॥

घरीं पावने आले । शेजी मने बंधू बंधू ।

भाई ग राजाच्या । छतरीला हिरवे राघू ॥

माझ्या घराला सोयरे । शेजी मने कोन कोन ।

वाडयामधले भाच्चे दोन । मेण्यामंदी पहा खूण ॥

घरा पावना आला । शेजी मनती कोठल्ला ।

माझ्या मातेचा बाळ । मला उमराव भेटल्ला ॥

माझ्या घराला सोयरे । पुरन घालतें पूरती ।

बंधवा माझ्या । करतें पोथीची आरती ॥

घरा पावना आला । शेजी मनीती रीता ।

जरीचा ग खण । त्याच्या खीशामधीं होता ॥

माझ्या मनींची हाऊस । पूरवीली देवाजीनं ।

बंधवासंगं । भाच्चा धाडीला मालनीनं ॥

*

माहेरा जाईल । बसले ढालजंत ।

रान्या माझ्या मालनी । आल्या कम्मानी लवत ॥

माहेरा मी त गेलें । बसले पानवठया ।

पाया पडूं आल्या । मालनी लहान मोठया ॥

माहेराला गेलें । बसेंल तुळशीच्या वटया ।

पाया पडूं आल्या । मालनी न्हानमोठया ॥

*

पाया ग पडुं आली । माझ्या पायाखालें ओलं ।

सीता मालनी माझे । वसरीला चल ॥

पाया पडूं आली । पाया पडूं ग राहूं दे ।

सीता मालनी माझी । बाळ कडंचं घेऊं दे ॥

पाया पडूं आली । नथ ह्या मोरणीची ।

सीताबाई माझी । सून माझ्या हरणीची ॥

पाया पडूं आली । सीता मालन वाकत ।

पाया पड तूं लवून । माझ्या सख्याची ताकीत ॥

पाया पडूं आली । वसरी चढून माडीं गेलें ।

सीता मालनीचं माझ्या । रुप पाहून दंग झालें ॥

पाया पडूं आली । आशीर्वाद देतें खरा ।

जोडयानं राज्य करा ॥

पाया पडूं आली । आशीर्वादाचं वचन ।

जन्मोजन्मीं सवाशीन ॥

पाया पडूं आली । पाया पडन्यांत काय ।

आशीर्वाद देत जाय ।

पाया पडूं आली । माझ्या बंधवाची सीता ।

तिला आशीर्वाद देतां । दारीं राम उभा व्हता ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel