हंसुनी खेळुनी गोड करींते मनाला
कींलवाणीं तोंडं दिसुं देईना जनाला ॥
माझिया जीवाला मीं त आटींतें पिटींतें
पित्याच्या जीवासाठीं नांव पाण्यांत लोटींतें ॥
*
बाप म्हणे लेकी तुला देऊन आलों बाई
तुझ्या नशिबाला जामीन झालों नाहीं ॥
*
माझं कीं नशीब खरं सांग जोशीदादा
आई बापावरी नाहीं रुसायला जागा ॥
*
लग्नाचा जोडा गळ्यांतली गळपेटी
सोडलें गणगोत एकल्या जीवासाठीं ॥
लग्नाचा जोडा माझ्या गळ्यांत ताईत
बाम्हनानें दिली गांठ सर्व गोताला माहीत ॥
*
बाप म्हणे लेकी नांदून करी नांव
सोयर्या धायर्याचं भंवताली गांव ॥
बाप म्हणे लेकी कर्माची खटखट
शेवाळली वीट पाय दे ग बळकट ॥
*
नारायणबाप्पा तुमच्या सांगतें कानांत
माझ्या कपाळीचं कुंकू ठेवा बेलीच्या पानांत ॥
नारायणबाप्पा मागत मी न्हाई कांहीं
चुडियाला माझ्या औक्ष घाल लई लई ॥
*
तुमच्या जीवासाठीं जीव मपला देईन
घार गंगनीची होईन तुमच्या भेटीला येईन ॥
तुमच्या जीवासाठीं होईन रानींची चिमणी
आतां माझे राघू तुम्ही बाग मी लिंबोणी ॥
तुमच्या जीवासाठीं उभी राहीन उन्हांत
आतां माझे राघू तुम्ही शेले मी बनात ॥
*
सासु सासर्यानं पुण्य केलं पुण्यामधीं
सकाळीं उठून हात माझे लोण्यामधीं ॥
सासु सासर्यानं करण्या केल्या मोठमोठया
शेतांत रामकाठया सुना उतरती पाटया ॥
सासुसासरा दोन्ही रेशमाच्या गांठी
कुंकवाचा पुडा जतन केला माझ्यासाठीं ॥
सासुसासर्यानं वसरी भरली दीरानं
तांब्याची घागर जोतें चढते भारानं ॥
दारावरा उभी मी त आपुल्या भारानं
सावळ्यांनी माझी मर्जी राखली दीरानं ॥
विसनिलं पाणी हंडयाशेजारीं घगाळ
अंघोळ करितेत दीर मपले वकील ॥
सासु आत्याबाई तुमची सोनियाची मिरी ॥
जन्माला जावू माझ्या कुंकवाची चिरी ॥
सासु आत्याबाई तुम्ही तुळशीचं आळं
तुमच्या हाताखालीं आम्ही परायाचीं बाळं ॥
सासुसासरे माझे देव्हार्याचे देव
पडतें मी त्यांच्या पाया मनीं नाहीं दुजाभाव ॥
सासुचा सासुरवास मन सारखं विटलं
वार्याच्या झडक्यानं पान केळीचं फाटल ॥
सासुचा सासुरवास काय सांगूं सई-बाई
रांजणाखालीं जाईं उगवत नाहीं ॥
काम करुं करुं दुखतात दंड बाह्या
विसाव्याला नाहीं बया सत्तेच्या भावजया ॥
*
भ्रताराचं सुख कोण सांगती निलट
पेटरीचा नाग घडोघडीला उलट ॥
नको म्हणुं बाई माझा भ्रतार ग भोळा
गारुडीयाचं मत केसानं कापिला गळा ॥
बोलला गव्हर आंबट आंब्यावाणी
सुकली माझी देही उसाच्या डांभ्यावाणी ॥