भिंतीवरचा नागोबा
पडला माझ्या पायावर
तुटले माझे वाकीजोड
घडव घडव सोनारा
किती करुं वेरझारा
माणिक मोत्याचा डोल्हारा
डोल्हार्याला खिडक्या
आम्ही पोरी लाडक्या
दारीं कुत्रे भुंकती
नणंदा जावा झगडती
सासासूना भांडती
*
आपे दूध तापे त्यावर पिवळी साय
लेकी भुलाबाई तोडे लेवून जाय
कशी लेवूं दादा घरीं नणंदा जावा
करतील माझा हेवा हेवा परोपरी
नणंदा घरोघरीं
नणंदांचा बैल डुलत येईल
सोन्याचें कारलें झेलत येईल
एका टिपरीवर उभें राहूं
अस्मानीचा गड पाडूं
गडावर गड माहुर गड
तिथचा सोनार कारागीर
त्यांनीं आणला साखळ्यांचा जोड
घेतां घेतां लाजली
तळ्यांत घागर बुडाली
तळ्या तळ्या ठाकूरा
भुलाबाई जाते सासूरा
जाते तशी जाऊंद्या
तांब्याभर पाण्यानें न्हावूंद्या
बोटभर मेण लावूंद्या
बोटभर कुंकूं लावूंद्या
जांभळें लुगडें नेसूंह्या
जांभळी चोळी घालूंद्या
मूठभर भात खावूंद्या
जांभळ्या घोडयावर बसूंद्या
जांभळ्या घोडयाचे उडते पाय
आऊल पाऊल नागपूर गांव
नागपूर गांवचे ठासे ठुसे
दुरुन भुलाबाईचें माहेर दिसे
*
"कारलीचें बीं पेर ग सूनबाई मग जा अपुल्या माहेरा"
"कारलीचें बीं पेरलें सासूबाई आतां तरी धाडा ना माहेरा"
"कारलीला कोंब फुटूं दे ग सुनबाई मग जा अपुल्या माहेरा"
"कारलीला कोंब फुटले हो सासूबाई आतां तरी धाडा ना माहेरा"
"कारलीला वेल होऊं दे ग सूनबाई मग जा अपुल्या माहेरा"
"कारलीचा वेल झाला हो सासूबाई आतां तरी धाडा ना माहेरा"
"कारलीला कारलें लागूं दे ग सूनबाई मग जा अपुल्या माहेरा"
"कारलीला कारलें लागलें हो सासूबाई आतां तरी धाडा ना माहेरा"
"कारल्याची भाजी कर ग सूनबाई मग जा अपुल्या माहेरा"
"कारल्याची भाजी केली हो सासूबाई आतां तरी धाडा ना माहेरा"
"गुणाची गुंती मज काय पुसते पूस जा आपल्या सासर्याला "
"मामंजी मामंजी मला मूळ आलें माझे भाई आले,
आतां तरी धाडा ना माहेरा"
"गुणाची गुंती मज काय पुसते पूस जा अपुल्या जावेला
"जाऊबाई जाऊबाई मला मूळ आलें माझे भाई आले,
आतां तरी धाडा ना माहेरा"
"गुणाची गुंती मज काय पुसते पुस जा आपल्या नणंदेला"
सोन्याची सुपली मोत्याने गुंफली खेळाया गुंतली वन्सबाई"
"वन्सं वन्सं मला मूळ आलें माझे भाई आले,
आतां तरी धाडा ना माहेरा"
"गुणाची गुंती मज काय पुसते पूस जा अपुल्या पतीला"
"सोन्याचा पाळणा मोत्याची दांडी तेथे माझे पति बसले होते
"अहो पतिराया मला मूळ आलें आतां तरी धाडा ना माहेरा"
उठले पति घेतली काठी लावली पाठीं
"विसर ग आतां माहेरच्या गोष्टी---"
*
चांदीचं पोळपाट सोन्याचें लाटणें
तिथें आमच्या सासूबाई पोळ्या करीत होत्या
"सासूबाई, सासूबाई, मला मूळ आलें"
"मला काय पुसते ? बरीच दिसते ?
पूस जा अपुल्या सासर्याला"
चांदीचें घंगाळ सोन्याचा तांब्या
तिथें आमचे मामंजी, आंघोळ करीत होते
"----मामंजी, मामंजी, मला मूळ आलें"
"मला काय पुसते ? बरीच दिसते ?
पूस जा अपुल्या दीराला"
चांदीचा दांडू सोन्याची विटी
तेथे आमचे भाऊजी खेळत होते
"भाऊजी, भाऊजी मला मूळ आलें"
"मला काय पुसते ? बरीच दिसते ?
पूस जा अपुल्या जावेला"
चांदीचा डेरा सोन्याची रवी
तिथें आमच्या जाऊबाई ताक करीत होत्या
"जाऊबाई जाऊबाई मला मूळ आलें"
"मला काय पुसते ? बरीच दिसते ?
पूस जा अपुल्या नणंदेला"
चांदीची चूल सोन्याचा खेळ
तिथें आमच्या वन्सं खेळत होत्या
"वन्सं वन्सं मला मूळ आलें"
"मला काय पुसते ? बरीच दिसते ?
पूस जा अपुल्या नवर्याला "
चांदीचा पलंग जाळीची मच्छरदाणी
तिथें आमचे पति निजले होते
"पतिराज पतिराज मला मूळ आलें"
उठले पति घेतली काठी
"विसर ग सुने, माहेरच्या गोष्टी"
*
सासू - किल्यांचा झोक ( म्हणजे घराचा ताबा )
सासरा - कुडयांचा जोड
दीर - आंगठयांचा जोड
नणंद - बांगडयांचा जोड