"सकाळीं उठुनी - तोंड पाहिलं एकीचं !
- दारीं तुळशी सखीचं ! !"
*
"सकाळीं उठुनी - मला एक लाभ झाला !
तुळशीपुढं करंडा - कुंकवाचा सांपडला ! !"
*
"पहिली माझी ओवी - आईला गाईइली
बया माझी गवळण - तुळस र्हाइईली !
पहिली माझी ववी - मायबापाला गाती एक !
- गिरजा शंकराची लेक !"
*
"बापाजी माजा वडु - तीची पारुंची ठायीं ठायीं
- येल इस्तार बयाबाई
बापाजी मजा वडु - गेली पारुंबी बाऊ बाऊ
बयाच्या कुसव्याचा - झाला विस्तार गांवु गांवू !"
*
"बापाजी माझा वडु - वडाच्म पान रुंदु
- गार सांवली करवंदु !
"बापाजी माझा वडु - उभी वडाला टेकुइनी
- गार सांवली देकुइनी !"
*
"बापाजी माझा वडु - बया माझी गोंदाईन ।
काशीला गेली वाटु - दोन झाडांच्या मदईनं !"
*
"उभ्या मी गल्लीं जातें - पदराखालीं हातु,
बयाच्या कुसव्याची - लंकला गेली मातु !
उभ्या मी गल्लीं जातें - पदर डाव्या मुठीं
पित्या नानाला म्हनित्याती - कुन्या अशिलाची बेटी !
माजी जात कुळ - काई पुसशील वेडया नांव,
पित्या दौलत नाना माजा - सार्या जवारीला ठावं !
उभ्या मी गल्लीं जातें - खालीं बघून माजी चाली
पित्या माज्या दौलताला - सारी सभा नांवजली !
माजी जातकुळ - काय पुससी सांदिईचा
पित्या माज्या दालताचा - वाजे रुपया चांदिईचा !"
*
"उभ्या मी गल्लीं जातें - दंडभुजा झांकुइनी
भरील्या सबमंदीं - नांव पित्याचं राकुइनी !
उभ्या मी गल्लीं जातें - खडा हालंना भुईइचा
चावडी म्होरं सभा बोलं - योल शिताळ जाईइचा !
उभ्या मी गल्लीं जातें - खालीं बगुनी माजी चाली
भरील्या सबमंदी - माज्या काशीला नांवजली !
उभ्या मी गल्लीं जातें - माजी हालईना पापईनी,
- घरीं वाघाची जाचईनी !
उभ्या मी गल्लीं जातें - कोण काडिल माजं नांवू
माजं ती बाळराज - वागासारिक ऽ उमरावू !"
*
दुबळं माजं पनु - न्हाई दुबळी माजी काया
बापाजी बयाबाई - चुनगती माजा पाया !
दुबळं माजं पनु - न्हाई दुबळं माजं तोंड
बापाजी बयाबाई - चुनगती माजा पिंड !
*
शिजीच्या घरला गेलें - सहज मी बसायला
शिजी मागार्या बोलती - आली आसल उसन्याला !
शिजीचा शेजायारु - माजं आरदं म्हाइयारू,
शिजीच्या परवरु - हुबा र्हाऊंया खिनभरु !
चांगलं माजं पनु - जिववु माजी माता
बया गवळणी सारईक्या - धुरा जूडिल्या जातांजातां !
*
शीजी तूं आईबाई - उसनी द्यावी सूजी
- बाळ पावनी आली माजी !
शीजी तूं आईबाई - उसना द्यावा गुळू
- माज्या भैनाच्म आलं बाळू !
*
शीजी पशी गुजु - उपनिलें वारं
- माजं गुजाचं घर न्यारं ! -
*
शीजीचं उसईनं - आडसिरी पायइली
बयाच्या उसन्याची - याद कुणाला र्हाईइली !
शीजीचं उसईनं - तिच्या हुंबर्या पसईनं !
बयाचं उसईनं - माज्या जलमा पसईनं !
शीजीचं उसईनं - बाई मी फीडीन भाजीपाल्या
बयाचं उसईनं - मला फिटंना काशी गेल्या !
शीजीच्या उसन्याची - तिची जरुर वर्दी झाली
माज्या बयाच्या उसन्याची - तिची रिकामी वाटी दिली !
*
आठ धाइ धारा - पेलें मी कुण्यारंगं
बया माज्या द्वारकानं - केला मांडीचा चबरंग !
आठ ग धाई धारा - पेलें मी बसुइनी
- मांडीवर बयाच्या बसुईनी !
लेकीच्या आईईला - लेकी वाचुन गमईना
सारीवल्या भिंती - वर काडिल्या कामिईना !
*
शिंपिनी शीव चोळी - टाक उगच शिवदोरा
बाळ जातिया सासर्याला - जीव झालाया वाराहुरा !
सासर्याला जाते - धरनी मारिलया म्याटू
- बंधु मुराळी देतें उटू !
म्हायागरीची वाट - न्हाई लावित बगायाला
- बाळ धाडिती आणायाला !
बिन मुराळ्या वांचुईनी - बाळ उतरीना पायईरी
तानिबाईला किती सांगूं - चुलता सजतो भाइईरी !
*
सांगुन धाडीइती - यीनी मनाला दोन गोष्टी
- बाळ खेळुन माझी हुती !
सांगुन धाडिइती - यीनी माज्या ग सारजला
- माज्या संबाळ गिरजला !
सासुर एवडा वासु - नकु करुंस सासुबाई
- बाळ आनेवा जोगी न्हाई !
सासुर एवडा वासु - नकु करुंस सासईव
माज्या त्या बाळईच्या - डोळ्या भरलीं आसईवं !
*
नवास एवडं केलं - लेकी वालुच्या केसाईला
- दिस येरळ सासुईला ।
लेकाचं नवायासु - लेकी वालुला सारिल्यात
सिंगाळ बकईरं - तिच्या जावळा मारिल्यात !"
*
म्हायाराची वाटु - इसरली गोरी
तानीबाईच्या माज्या - हातीं पाळण्याची दोरी !
*
पांच ग उतरंडी - परुपरीचीं झांकईनीं
माजी ती तानीबाई - जावानंदांत देकईनी !
पांची ग उतरंडी - त्या का गेल्यात्या गंगनाला
माज्या त्या बाळईला - चौगी सुना चांगुणाला !---
*
सासू सुंदरीचा तिचा कुसवा वेलीं गेला
माजी तूं बाळाबाई हायत्या धाकल्या जावा तुला !
सासुसासईरा देवार्यावैल द्यावु
माजी तूं बाळाबाई तुमी जोडीनं फुलं वावुं
सासु सासईरा सोनियाचीं फुलं
त्येंच्या उजिडानं तुजीं वागत्यालीं मुलं !
जोडव्याचा पाय हळुं टाकावा गरतीबाई
सोप्यां बसले दादाभाई !
*
थोरला माजा दीर - म्हनीतु मुलीबाई,
- बसा चौरंगी धुते पाई !
थोरल्या जावईला - मी का म्हनीती बाई बाई,
- तुमच्या वडिलपनापाई !
*
जातं मी वडीइती - नखां बोटांच्या आगयारीं
काशीचं पेलें दूध - जशा मधाच्या घागइरी !
जातं मी वडीतांना - चोळी भिजून पदर वला
काशीचं प्याले दूध - आकरी दुधाला कढ आला !
जातं की वडीतांना - सोडी बाह्या ह्या मोकळ्या
- पडं पिटाच्या डिकइळ्या !
*
लाडक्या लेकीईचं - तिचं गांवांत सासईरं
आंदान दिल्या गाई - वाडया येत्याती वासईरं !
*
मायबापांची आशा थ्वारु - भावाची भय पुरीं
- भाच्या बाळाचीं लंका दुरीं !
बापाजीं म्हणइतु - लेकी नांदुनीं कर नांवु
तुझ्या घरला येऊं जाऊं - तुझ्या रांजनी पानी पिऊं !
समरत सोईइरा - बाई करनीसाठीं केला
माज्या तूं बंधुराया - सोयर्या येईना तुज्या तोला !
समरत सोईइरा - जसा भिंतीवईला चुना
उमराव माजा बंधु - खांब हवेलीचा जुना !
*
भूक लागली माज्या पोटा - येडी झालीस माज्या भुकंऽ
ह्या ग गांवांत न्हाई सखी - ती का र्हाइली दूरल्या लंकं ऽ !
भूक लागली माज्या पोटा - बाई मी निर्या देतें गांठी
- पित्या नानाच्या नांवासाठीं !
*
आगिणीच्या पुढं जळतं वलंचलं
माईबापावांचुनी कोण म्हणील काम केलं ?
*
खंडीभर गोत - वाया येरतीचा पाला
अंतःकरान भेटइलं - मनींचा शिणु गेला !
खंडीभर गोत - आळा पेंडीला बसईना
अंतःकरनावांचुइनी - अंतःकरान दिसईना !
खंडीभर गोत - माळावईलं गवायात
माजी ती बयाबाई - गार हराळी लवनांत !
अंतरींचं गुजु - बांध शेल्याच्या पदरांतु
माज्या तूं बाळराया - सोड बयाच्या हुरद्यांतु !