कैसे लावियले मी दार
पडला हा अंधार
कैसे लावियले मी दार
सौंदर्साने सृष्टी सजली
संगीताने सृष्टी भरली
दृष्टी परी मी माझी मिटिली
दिसले मजला ना सार।। कैसे....।।
तरु डोलती वेल नाचती
उत्साहाच्या अखंड मूर्ती
आनंदाची जगी निर्मिती
सतत हो करणार।। कैसे....।।
निर्मल सुंदर पुष्पे फुलती
परिमल देती लघु जरि दिसती
प्रकाश धरणीवरी उधळिती
सदैव ती हसणार।। कैसे....।।
पहा पाखरे मूर्तानंद
किती त्यांचे ते सुंदर रंग
किलबिल ऐकुन किती तरंग
सहृदय-मनि उठणार।। कैसे....।।
नभी तारका सदा चमकती
सागरावरी लहरी हसती
डोळे अमुचे जरि हे बघती
वृत्ति उचंबळणार।। कैसे....।।
सुंदर साधे चिमणे गवत
वसुंधरेला ते नटवीत
दृष्टी जगाची ते निववीत
हिरवे हिरवे गार।। कैसे....।।
विश्वामधला प्रत्येक कण
जगात फेकी प्रकाशकिरण
प्रकाशमोदे कोंदे त्रिभुवन
घेइ न तोचि भिकार।। कैसे....।।
कृतज्ञतेचा सद्भावाचा
स्नेहाचा नि:स्वार्थ प्रीतिचा
भक्तीचा निष्पाप अश्रुचा
प्रकाश अपरंपार।। कैसे....।।
जगात भरले रमणीयत्व
जगात भरले असे शिवत्व
जगात भरलेसे सत्यत्व
कोण परी बघणार।। कैसे....।।
मनुज-मानसी डोकावून
खोल असे जो सदंश बघुन
झालो केव्हाहि न तल्लीन
केला मी धिक्कार।। कैसे....।।
वृत्ति करोनी निज अनुदार
रागावोनी सकळ जगावर
काय साधले अहा खरोखर
झालो मी भूभार।। कैसे....।।
पायांपाशी माणिकमोती
प्रकाशसिंधू सदा सभोती
भिकार तिमिरी केली वस्ती
आणि अता रडणार।। कैसे....।।
अश्रूंचे बांधिले बंगले
तिमिराचे गालिचे पसरिले
नैराश्याचे गाणे रचिले
केला हाहा:कार।। कैसे....।।
जगापासुनी गेलो दूर
मोदा सोडुन गेलो दूर
प्रकाश सोडुन गेलो दूर
आणि पुन्हा झुरणार।। कैसे....।।
शोके आता भरतो ऊर
जिवास आता सदैव हुरहुर
कशांस आता करु मी कुरकुर
झाले जे होणार।। कैसे....।।
-त्रिचनापल्ली तुरुंग, ऑक्टों. १९३०