काय सांगू देवा, कोणा सांगू?
काय सांगू देवा, कोणा सांगू?।।
माझ्या चित्ता आता नाही मुळी धीर
रात्रंदिन वाहे डोळ्यांतून नीर
तुजला वाटे काय माझी चीरचीर।। काय....।।
धूळीमध्ये गेले तनमन मळून
तूझ्या अमृतहाते टाकी रे धुवून
तूझ्या पायाजवळी ठेवी मग निजवून।। काय....।।
कुविकारांची थंडी टाकी गारठवून
नाही नाही काही मजला संरक्षण
तूझा शेला देवा घाली पांघरूण।। काय....।।
मेघावीण कैसा नाचेल रे मोर
चंद्रावीण कैसा हासेल चकोर
आईवीण सांग कोठे जाइल पोर।। काय....।।
तूझा एक देवा! अनाथा आधार
भक्तांचा तू सतत चालवितोसि भार
म्हणुनी आलो तूझे शोधित शोधित दार।। काय....।।
माते! मंगलमूर्ते! उघडी आता दार
माझ्या शोका नाही, आई! अंत पार
तूझ्या बाळा आता तार किंवा मार।। काय....।।
-धुळे तुरुंग, मे १९३२
नमस्कार
असो तुला देवा माझा सदा नमस्कार
कसा होउ उतराई मी काय बोलु फार।। असो....।।
दिले निळे आकाश तसे चंद्र सूर्य तारे
दिले जीवनाधार असे दिवारात्र वारे
सरसरित्सागर दिधले कितिक तू उदार।। असो....।।
वसुंधरा सुंदर दिधली श्रमामूर्ति माय
हिरवि हिरवि सृष्टी दिधली दृष्टि तृप्त होय
फुले फळे धान्ये देउन चालविशि भार।। असो....।।
माय बाप बंधू भगिनी आप्त सखे स्नेही
दिले प्रेम त्यांचे म्हणुनी सकळ सह्य होई
कृतज्ञता मैत्री प्रीती तू दिलीस थोर।। असो....।।
तसा देह अव्यंग दिला हृदयी दिलेस
बुद्धिची दिली देणगि रे केवि वर्णु तीस
अशा साधनांनी तरि ते दिसो तुझे दार।। असो....।।
-धुळे तुरुंग, मे १९३२