प्रेम द्यावया आम्हि जगतो। देउन आनंदे मरतो
फार अम्हा जरि न सुगंध। आहे त्यातच आनंद
सदा मानितो, जे असते। जवळ, देतसे जगता ते
देण्यासाठी समुत्सुक। देण्यामध्ये खरे सुख
कुणी न भेटले आम्हाला। खंत वाटली चित्ताला
दिवस संपुनी अंधार। पडू लागला बाहेर
भरलेले प्रीतीचे घडे। रिते न झाले कुणापुढे
भरलेले प्रीतीचे घडे। तसेच पडलेत बापुडे
तशात तू आलास। प्रकाश जैसा अंधास
तसे वाटले आम्हाला। मोद मनाला बहु झाला
येऊन येथे रमलास। प्रेमे बघुनी आम्हांस
घे तर सारे प्रेम तुला। प्रेमतृषार्ता भल्या मुला
घे सारे हे प्रेम तुला। प्रेम हवे ना तुला मुला’
असे बोलुनी मज बघती। गोड मनोहर ती हसती
अमृतवृष्टिच जणु करिती। सुकलेल्या हृदयावरती
सुकून गेल्या शेतास। जसा मिळावा पाऊस
तसे झाले मदंतरा। विसरुन गेलो जगा जरा
डोलु लागली फुले मुदे। वा-यावरती आनंदे
येई मदंतरही भरुन। पुढे ओढवुन मम वदन
तयांस धरिले मी भाली। करी तयांना कुरवाळी
धरिले प्रेमे हृदयाशी। प्रेमसिंधु त्या सुमनांसी
पुन्हा बघतसे पुन्हा करी। हृदयी त्यांना घट्ट धरी
अपार भरला आनंद। सकळ पळाला मत्खेद
दाउ कुणा हे रमणीय। दृश्य मनोहर कमनीय
प्रसंग मोठा स्मरणीय। हृदयाल्हादक कवनीय
तया फुलांना मी म्हटले। ‘तुम्ही मज किति तरि सुखवीले
विसावा तुम्ही मज दिधला। शोक तुम्ही मम घालविला
मदीय डोळे हासविले। ओले होते जे झाले
मदीय हृदया फुलवीले। होते कोमेजुन गेले
धरितो तुम्हां हृदयाशी। कृतज्ञता मी दावु कशी
तुम्हास काव्यी गुंफीन। कृतज्ञता मी दावीन
वदुनी धरिले हृदयाशी। जाणारे बघती मजसी
मज वेड्याला ते हसले। लज्जेने क्षण मन भरले
फिरुन फुलांना पाहून। फिरुन एकदा हुंगून
फिरुन तया कुरवाळून। फिरुन हृदयाशी धरुन
निघून गेलो तेथून। प्रेमाने ओथंबून
विचार आला मदंतरी। सृष्टिश प्रेम सदा वितरी
मनुज देतसे प्रेमकण। परमेश्वर हे कोटिगुण
सुमन तारका तरु वारि। प्रकाश-रुपे प्रकट हरी
प्रेम देतसे सर्वांते। कळे न वेड्या जीवाते
प्रकाशकिरण प्रेमाचे । भरलेले कर देवाचे
कवटाळाया येतात। मोदप्रेमा देतात
या वा-याच्या रुपाने। प्रभुच येतसे प्रेमाने
अंगा प्रेमे स्पर्श करी। गुणगुण गाणे उच्चारी
नद्या वाहती ज्या भव्य। प्रभुची करुणा ती दिव्य
जिकडे तिकडे प्रेमाचा। पाउस पाडी प्रभु साचा
अनंत देतो प्रेमास। कळे न वेड्या जीवास
प्रभुचे प्रेम न बोलतसे। मुके राहुनी वर्षतसे
प्रेम करो वा न करोत। अनंत हस्ते भगवंत
प्रेम देतसे सकळांला। विचार हृदयी मम आला
मला वाटली मग लाज। चित्तामाजी ता सहज
प्रेम अगोदर देवाने। दिले तयास्तव मनुजाने
कृतज्ञ राहुन आजन्म। द्यावे निरपेक्ष प्रेम
भगवंताची ही पूजा। सदा जिवा रे करि माझ्या
यातच सार्थक खरोखर। पुन्हा न मळवी निजांतर
पुन्हा न केव्हा रड आता। प्रेम सर्वदा दे जगता
प्रेम सदा तू देत रहा। प्रेमसिंधु तू होइ पहा
प्रेमसागर प्रभुराज। प्रेम द्यावया ना लाज
जगास द्यावे स्वप्रेम। हाच करी तू निजनेम
जगास निरपेक्ष प्रेम। देणे हा करि निजधर्म
सरोत दुसरे ते धर्म। प्रेमदान हे त्वत्कर्म
-त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१