का मजला देता प्रेम?
मम हातांनी काहि न होइल काम
का मजला देता प्रेम?
मी वांझ असे, कसलि न राखा आस
ती आशा होइल खाक
जगि दु:ख नसे आशा-भंगासारे
ते प्रेम म्हणुनि ना द्या रे
प्रेमाला लायक नाही
करुणेला लायक नाही
साहाय्या लायक नाही
तुम्हि सोडुन द्या माझे सकळहि नाद
का बसता घालित वाद।।
तो प्रेमाचा पाउस मजवर होई
परि दु:ख हेच मज दाही
त्या प्रेमाला लायक मुळि नसताना
का देती मजसि कळेना
ते जो जो हे दाखवितात प्रेम
हृदयात भकता किति शरम
मी काय तयांना देऊ
मी काय तयांना दावू
मी काय तत्पदी वाहू
मद्दैन्याने डोळे ओले माझे
हृदयावर दुर्धर ओझे।।
मज्जीवन हे निष्फळ दीन दरिद्र
गतसार अतीव क्षुद्र
किति सांगु तुम्हां अश्रु न दिसती काय
ती ऐकु व ये का हाय
मम सुसकारे कानि न का ते पडले
दिसती का न डोळे भरले
जा सकळ तुम्हि माघारे
मजकडे न कुणिहि बघा रे
तुम्हि थोर कर्मकर सारे
परि मी न असे, मी न करितसे काही
मरतो ना म्हणुनी राही।।
त्या दगडाला काय घालुनी पाणी
येईल कधी ना फुलुनी
त्या मेलेल्या खोडा घालुन पाणी
येईल काय भरभरुनी
मृत देहाला अर्पुन वस्त्रे अन्ने
तो उठेल का चैतन्ये
हे व्यर्थ सर्व सायास
हा अनाठायि हो त्रास
येतील कधि न कामास
तो बंधूंनो विकाससंभव जेथे
अर्पिजे सकलही तेथे।।
मी जगती या कर्मशून्य हत जीव
का करिता माझी कीव
ना कधि काळी अंकुर मज फुटतील
ना फुलेफळे धरतील
ना छायाही देइल जीवन माझे
वदताना मन्मन भाजे
का उगाच येता प्रेम
मी निराश निष्क्रिय अधम
मी मत हत निपतित परम
का लाजविता प्रेम समर्पुन माते
हे प्रेम जाळि हृदयाते।।
ते प्रेमाचे तुमचे सदलंकार
परि मजला मारक गरल
ती प्रेमाने अर्पितसा जी मदत
मज सदैव ती रडवीत
मी प्रेम कशाला घेऊ
जगतास काय मी देऊ
मी मदत कशाला घेऊ
मी घेत असे देउन शके काही
हा विचार हृदया दाही।।