“हो.”

“पाहा बरें. नाहीं तर थकवा येईल. छात्रालयाची गाडी देऊ?” गोपाळरावांनी विचारलें.

“नको. मला गाडी फारशी आवडत नाही. पायी जाण्यांत स्वातंत्र्य आहे. मला उत्साह वाटत आहे. उद्यां प्रार्थना प्रात:काळची झाली म्हणजे निघू. म्हणजे फार ऊन होणार नाही,” स्वामी म्हणाले.

“बरें,” असें म्हणून गोपाळराव जमाखर्चाकडे वळले.

स्वामी आपल्या खोलींत गेले.

दुसरे दिवशी छात्रालयाची प्रभातप्रार्थना झाल्याबरोबर स्वामी, नामदेव व रघुनाथ निघाले. अजून स्वच्छ उजेड पडला नव्हता. झाडाच्या आकृति एकरुप दिसत होत्या.

“अज्ञानात ऐक्य आहे, अंधारांत ऐक्य आहे, मरणांत ऐक्य आहे,” स्वामी म्हणाले.

“प्रकाश म्हणजे पृथक्करण,” नामदेव म्हणाला.

“जीवन म्हणजे विविधता, व मरण म्हणजे एकता,” रघुनाथ म्हणाला.

“कोणतें चांगले?” स्वामींनीं प्रश्न केला.

“आपणांस समन्वय करावयाचा आहे,” रघुनाथ म्हणाला.

“बुद्धि पृथक्करण करते व हृदय जोडते,” नामदेव म्हणाला.

“असेंच केवळ म्हणता येणार नाही. हृदय एकाशीं जोडील तर दुस-याशीं तोडील. पथक्करण करणारी बुद्धीची एक शक्ति आहे. बुद्धिसुद्धां जोडते. माणसें निरनिराळी दिसलीं तरी त्यांच्यांतील चैतन्य एकच आहे. हें बुद्धीच सांगते. बुद्धि ठरविते व हृदय ठरविलेले जीवनांत मिळवून टाकतें.,

असें नाही का?” स्वामीनीं विचारलें.

“प्रकाश जोडतो, उलट अंधारच तोडतो,” नामदेव एकदम म्हणाला.

“ते कसें काय?” रघुनाथनें विचारले.

“अंधारांत चक्रवाक पक्ष्यांचें जोडपे वियोगानें ओरडत असतें. प्रकाश येतांच ती भेटतात. अंधारांत जवळ असूनहि आपण भेटत नाही. प्रकाशांत दूर असलेले जवळ येतो,” नामदेव म्हणाला.

“प्रत्येक वस्तूचीं ही दोन स्वरुपें आहेत. तर अंधारहि जोडतो व तोडतो. प्रकाशांतहि जोडणें व तोंडणें आहेच,” स्वामी म्हणाले.

“सुष्टीचें हें स्वरूपच आहे. जन्मणें मरणें; हंसणें, रडणें; येणे, जाणें; असें हे सर्वत्र द्वद्व आहे,” नामदेव म्हणाला.

“परंतु द्वंद्वांतील म्हणून कांहीतरी असलेंच पाहिजे. द्वंद्वाच्या पाठीमागे जर कोणी नसेल तर हें द्वंद्व कोण अनुभविणार? ही सारी चित्रें कोणत्या फळयावर काढवयाची? हीं सारीं फुले कोणत्या सूत्रांत ओंवावयाची?” रघुनाथ बोलला.

“त्यालाच आत्मतत्त्व म्हणतात. त्या आत्मदेवाच्या समोर हे सारे खेळ चालले आहेत. ही शोकान्त व सुखान्त नाटकें चाललीं आहेत,” स्वामी म्हणाले.

“तो पक्षी पाहा! कशी आहे ऐट त्याची?” नामदेव पक्ष्याकडे पाहात म्हणाला.

“तो निळ्या नभाचा राजा आहे, हिरव्या सृष्टीचा स्वामी आहे,” स्वामी म्हणाले.

“गेला. उडाला आपल्या आवाजानें भ्याला. सारी सृष्टी भित्री आहे,” रघुनाथ म्हणाला.

“हिंसा भित्रीच असतें,” स्वामी म्हणाले.

“जगांत प्रेमच निर्भय असते.” नामदेव म्हणाला.

“प्रेमामुळें भगवान् बुद्द निर्भय झाले, प्रेमामुळे भगवान् वशिष्ठ, निर्भय झाले. प्रेमामुळे रामतीर्थ सर्वांना वश करून घेत. प्रेम हें महात्माजीचें बळ आहे,” स्वामी म्हणाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel