नामदेव व रघुनाथ सायकलीवर होते.
“पुण्यास घोड्यावर स्वार झालेत वाटते?” स्वामींनी हंसत विचारलें.
“पुण्यास सायकलशिवाय चालतच नाही,” नामदेव म्हणाला.
“पुण्याला मनुष्य चतुष्पाद होतो म्हणायचे?” स्वामी हंसत म्हणाले.
“म्हणजे परब्रह्म होतो. पुरुषसूक्तांत देवाचा एक पाय या विश्वानें नटला आहे व तीन पाय त्याचें वर अमृतस्वरुपी तसेच राहिले आहेत असें वर्णन आहे. पुण्यांतील लोक म्हणजे परब्रह्माची रुपे आहेत,” नामदेव म्हणाला.
“परब्रह्म म्हणजे सत् व असत् याच्या पलीकडे असलेलं तत्त्व तसें पुण्यांतील लोकांना काय म्हणावें हें समजत नाही. त्यांना असत म्हणन तर थोर विभूति येथे झाल्या. यांना सत् म्हणूं तर वाटेल ते ओंगळ व विचारहीन, उच्छूखल प्रकारहि येथे चालतात. येथे सारें असून नसल्यासारखे आहे व सारें नसून असल्यासारखे आहे. शिक्षणाच्या टोलेजंग संस्था आहेत इथे. परंतु ते निर्जीव शिक्षण. भावनाहीन शिक्षण. ना स्वदेशाची स्मृति, ना कोट्यवधि बंधूंची आस्था. येथे वर्तमानपत्रे भऱपूर आहेत. परंतु शिवीगाळ करीत राहाणें, शिमगा सहा सहा महिने चालू ठेवणें हे त्यांचे उद्योग. खरेंच परब्रह्म आहे बापा हे,” स्वामी म्हणाले.
“या टांग्यात तुम्ही बसा. तुमच्या दोन बाजूस दोन आम्ही सायकलस्वार,” नामदेव म्हणाला.
“जणू पोलीसच माझ्यावरचे,” स्वामी म्हणाले.
“उगीच जायचेत निघून कोणीकडे. तुमचा काय भरंवसा? गोपाळरावांनी लिहिलें आहे कीं स्वामींना जपा. आमचें ठेवणें नीट परत करा,” नामदेव म्हणाला.
“आणि गाडींतून नसते कां रे मला पळून जाता आले?” स्वामींनी विचारलें.
“मनांत आलें म्हणजे कोणासहि वाटेल तेथून जाता येईल,” रघुनाथ म्हणाला.
“सेंक्रेटरीच्याकडे उतरावयास जावयाचें की काय?” स्वामींनीं विचारलें.
“नाही. आमच्या खोलींत जावयाचें. आम्ही सेक्रेटरींना तसें सांगितलें आहे,” नामदेव म्हणाला.
गोष्टी बोलत बोलत रस्ता काटला जात होता. शेवटी एकदांची खोली आली. स्वामी खोलींत गेले. खोली पाहून त्यांना प्रसन्न वाटलें.
“कलावान् नामदेवाची ही खोली आहे,” स्वामी म्हणाले.
“आणि मी वाटतें. अरसिक आहे? कलावान नामदेवाला ज्यानें आपलासा करून घेतला, तोहि कलावानच असला पाहिजे,” रघुनाथ म्हणाला
.
“मी आतां आधीं स्नान करतो,” स्वामी म्हणाले.
“चला, मी सारें दाखवितों,” नामदेव म्हणाला.
“स्वामीचें स्नान झालें. तिघेजण जेवावयास बसले.
“टोमॅटोची भाजी आहे ,वा !” स्वामी म्हणाले.
“ही माझी निवड हो,” रघुनाथ म्हणाला.
“टोमॅटो आणलेस तू, परंतु भाजी केली मी,” नामदेव म्हणाला.
“तुम्हाला पुष्कळ भूक लागली असेल ना?” रघुनाथनें विचारले.
“तुम्हांला पाहूनच माझें पोट भरलें,” स्वामी म्हणाले.
“आम्हांला पाहून हृदय भऱलें असेल; पोट कसें भरेल?” नामदेवानें प्रश्न केला.
“अरे, हृदय भरलें म्हणजे पोट आपोआप भरून येतें. हृदय हें पोटापेक्षा मोठें आहे, आणि आत्मा हृदयापेक्षा मोठा आहे. ज्याचा आत्मा तृप्त झाला त्याला सारेंच मिळाले,” स्वामी म्हणाले.