“अनिष्ट परिणाम यंत्रांमुळे होतो का समाजरचनेमुळे होतो ? ती यंत्रे जर समाजाच्या मालकीची असतील तर मजुरांची वाईट स्थिति होणार नाही. फायदा व्यक्तीच्या हातांत न जाता मजुरांना मिळेल. श्रमणा-याला मिळेल. त्यांच्यासाठी सुंदर स्वच्छ मोकळी घरे, कमी तास काम, करमणुकीची निर्मळ साधने, बागा, सर्व काही तयार करण्यात येईल. त्यांच्या मुलांची काळजी
घेण्यासाठी संगोपनगृहे काढू. अग्नीने पाकनिष्पत्तिहि होते व आगहि लावता येते. जगांत कोणत्याहि वस्तूचा सदुपयोग व दुरुपयोग करता येतो. यंत्रशक्तीचा मनुष्याचे श्रम कमी करण्याकडे का उपयोग केला जाउ नये? मनुष्याने बैलाप्रमाणे, हेल्याप्रमाणे दिवसभर राबतच रहावे असे का तुम्हाला वाटते? समजा प्रत्येक गावची शेती एकत्र केली की, वाफेच्या नांगराने ती नांगरता येईल. आजची चारचार हात शेते आहेत तोपर्यंत यांत्रिक शेती करता येणार नाही हे खरे. परंतु शेती एकत्र केल्यावर ते शक्य होईल. भराभरा सारी कामे होतील,” नारायण म्हणाला.
“यंत्रावर दोन आक्षेप घेता येतील. समाजरचना तुम्ही बदललीत व स्थिती सुधारलीत तरी दुस-या गोष्टी राहतातच. यंत्रामध्ये मनुष्याच्या निर्माणशक्तीला वाव नाही, व्यक्तीत्वाला वाव नाही. ते यंत्र आहे. त्याच्याजवळ आपण यंत्रासारखे उभे राहातो! यंत्राने मनुष्यहि यंत्र होतो. चरक्यावर सूत कातताना मी कला निर्माण करतो आहे असे मला वाटते. ती दुधाची धार निवताना पाहून डोळे कृतार्थ होतात. बोटे धन्य होतात. यंत्राने काढलेल्या सुतात ना माझा आत्मा, ना माझे हृदय. विणकर वस्त्र विणतो! किती तल्लीन तो होतो! आपल्या हातून का हे वस्त्र विणले गेले असे मनांत येऊन तो नाचतो! वेरूळचे कैलास लेणे खोदणारा तो दिव्य शिल्पी असाच नाचला होता असे सांगतात! आपण आपल्या कर्मात जणु आत्मा पाहातो. यंत्राने तो आनंद मी गमावला का? शिवणकामाच्या यंत्रात कलेला वाव आहे. ते मशीन काही एकदम कपडा शिवून देत नाही. जेथे स्वत:च्या बुद्धीला, हृदयाला, कलेला वाव आहे, आपले स्वत:चे असे काहीतरी वैशिष्ट्य, आपला स्वत:चा रंग जेथे ओतता येईल ते यंत्र ठेवा.
“दुसरे असे की, यंत्राने समजा तुम्ही श्रम वाचविलात. आपल्या देशांतील माल इतर देशांत तर नाही ना पाठवावयाचा? कारण इतर देशांत पाठवावयाचा असेल तर तो देश मला गुलाम करावा लागेल. त्याचे धंदे बुडवावे लागतील. तसे तर आपणांस नाही करायाचे? मजूरसाम्राज्यशाही तर नाही ना निर्माण करावयाची? आपल्या देशाच्या गरजांपुरता माल यंत्रसाहाय्याने निर्माण करावयाचा. काही थोडे लोक यंत्रांच्या साहाय्याने शेती करून समाजाला धान्य देतील; काही थोडे लोक यंत्रांच्या साहाय्याने वस्त्र देतील. असे चालले रोज दोनचार तासच काम. पंचवीस तासांचाच आठवडा समजा. मनुष्याला कामापेक्षा रिकामा वेळ जर जास्त उरला तर तो वेळ मनुष्य सार्थकीच लावील का? सैतान रिकाम्या हातांना वेडेचाळे करायला लावीत असतो. रिकामा वेळ कलासंवर्धनात, आत्म्याच्या निरागस आनंदातच जाईल का? कोणी वनसंचार करितो आहे, कोणी खगोलशास्त्राचा अभ्यास करतो आहे, कोणी चित्रकला अभ्यासितो आहे, कोणी गायनकला जवळ करतो आहे, कोणी नर्तन शिकतो आहे, कोणी वादनांत प्रवीण होऊ पाहातो आहे, कोणी फुलाफळांचे प्रयोग करतो आहे—असे होईल का?
“का रिकामा वेळ सापडला तर मनुष्य अधिक पतित होईल? तो बोलत बसेल का भांडत भांडत बसेल का काम करील?” स्वामींनी विचारले.