साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची ? जप , तप , नेम याग , वगैरे आपण कशाकरिता करतो ? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून ; तोच देव जर आपल्या घरी आला , तर साधनाची आटाआटी कशाला करायची ? म्हणून , साधनाची आटाआटी करण्याचे कारण नाही ; नाहीतर त्याचाच अभिमान होतो , आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो . जे जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना . तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा . गुरुभक्ती करायची म्हणजे काय ? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का ? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवाच होत नसते ; गुरु सांगेल तसे वागणे , हीच त्याची खरी सेवा होय . माझ्याजवळ जे येतात , ते कुणी मुलगा मागतो , कुणी संपत्ती मागतो , कुणी रोग बरा करा म्हणून मागतो ; तेव्हा , माझी सेवा करायला तुम्ही येता , का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता ? माझ्याजवळ येऊन , मनुष्यदेहाचे खरे सार्थक होईल असे करा . तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही ; पण ते काढा घेण्याकरिता गुळाचा खडा देण्यासारखे आहे .
‘ मला सर्व कळते ’ असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता , पण ते मनापासून नव्हेच ; कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही . ज्याची वृत्ती माझ्याशी एकरुप होईल त्यालाच कळेल की , मला सर्व कळते आहे . गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की , त्याचे मन आणि आपले मन एक झाले पाहिजे ; म्हणजे , दैववशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू . आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे , आपले सर्व दु : ख मला सांगत जावे . तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता , पण तुम्हांला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते . माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हांला मिळायचे नाही ; ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय . सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे . ज्याला मी भेटावा असे वाटते , जो माझा म्हणवितो , त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे .