काय करावे हे मनुष्याला कळते , पण त्याचे मन त्याला आवरत नाही . विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते , आणि त्याचे सुखदु : ख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्टासारखी चित्तवृत्ती होते . आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत : एक सदविचार , दुसरी नामस्मरण , आणि तिसरी सत्संगती . संत ओळखणे फार कठीण आहे . आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हाच तो कळायचा . त्यापेक्षा सदविचार बाळगणे सोपे . भगवंताचा विचार तोच सुविचार होय . भगवंताच्या कथा ऐकाव्यात , त्याच्या लीला वर्णन कराव्यात , त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत , पण याहीपेक्षा , आपल्याजवळ नेहमी राहणारे असे त्याचे नाम घ्यावे . तुम्ही नेहमी नाम घेत गेलात , तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरुर न पडता , संतच - अगदी हिमालयांतले संत , तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील . अहो , खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको ! तुम्ही म्हणाल , ‘ आम्हाला ते करता येत नाही . ’ पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो , आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला , तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही ? त्याला एक विद्या आली नाही , तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही ? आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही ? तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का ? तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल . तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहात असतो .
आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत , म्हणजे देह आहे तोपर्यंतच , काळजी करील ; पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे . त्याला देह नसला , तरी तो नाही असे समजू नका . तुम्ही दुश्चित झाला म्हणजे तो दुश्चित होतो . म्हणून तुम्ही केव्हाही दुश्चित होऊ नका . देहाचे भोग येतील - जातील , पण तुम्ही सदा आनंदात राहा . तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका . गुरुभेट झाली म्हणजे तुम्ही तुम्हीपणाने उरतच नाही . मात्र गुरुला अनन्य शरण जा . एक शिष्य मला भेटला , तेव्हा तो आनंदाने नाचू लागला . मी त्याला विचारले , " तुला एवढा आनंद कसला झाला आहे ? " त्यावर तो म्हणाला , " मला आता आनंदाशिवाय काही उरलेच नाही , कारण मला आज गुरु भेटले ! " जो असा झाला , त्यालाच खरी गुरुची भेट झाली . तरी , तुम्ही गुरुला अनन्य शरण जा , म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरुरी नाही .