तुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात ह्याबद्दल शंका नाही . अशीच सेवा अखंड चालू ठेवा , त्यातच कल्याण आहे . त्यानेच आपण तरुन जाऊ . जरी कुणी काहीही सांगितले , ‘ ह्यात काय आहे , त्यात काय आहे , ह्याने काय होणार आहे , ’ असे म्हटले , तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका . परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे . तो फार मोठा आहे , अमर्याद आहे . त्याला पहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे . त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला मागेल . अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडविले . ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही , पण ती मिळविण्याची शक्ती आपल्याजवळ आहे . भक्तीची प्रगती ही खरी शक्ती ; आणि त्याकरिता अखंड नामस्मरण हेच खरे साधन . श्रीरामप्रभू आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा . त्याला तुम्ही आपली सुखदु : खे सांगा . दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्यभावाने शरण जा ; दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दु : ख दूर होईल . आपले ज्ञान , शक्ती , वैभव , सत्ता , त्याच्यापुढे काहीच नाहीत . तेव्हा या सर्वांचा विसर पाडून , त्याला शरण जा , आणि त्याच्याजवळ प्रेम मागा . " देवा ! आम्ही जे तुझे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरुपाचे ; तुझे आम्हाला खरे दर्शन घडव . आम्ही अवगुणसंपन्न असू , तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ नाही , परंतु तू आता आम्हाला क्षमा कर . यापुढे , देवा , कितीही संकटे येवोत , आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू . जे काही व्हायचे असेल ते होऊ दे , आमचे समाधान टिकून तुझ्या नामात आमचे प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे . "
खरोखर , परमेश्वर भक्ताचे मन पाहतो , त्याचा भाव पाहतो ; एरव्ही तो त्याच्याजवळ असतो . जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला , परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते . आपल्याला दोन मार्ग आहेत ; एक श्रद्धेचा , आणि दुसरा अनुभवाचा . एका गावी पायवाटेने गेले तर फक्त तीन मैलांचे अंतर , आणि मोटारच्या रस्त्याने गेले तर दहाबारा मैलांचे अंतर . श्रद्धा ही त्या पायवाटेसारखी आहे . तिने चालले तर अंतर कमी पडेल . मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग . मोटार कुठे रस्त्यात बिघडली , किंवा वाटेत कुठे अडथळा आला , की प्रगती थांबते ; त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते . तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा . सदगुरुच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावे .