आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले , तरी आपण त्याप्रमाणे वागतो का ? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्या अनुभवाला येते , परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का ? हाच तर आपल्यांतला दोष आहे . थोर पुरुषांचे मात्र तसे नसते . त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखविले , आणि म्हणूनच ते संतपदवीला गेले . खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत ! जगातले सुख हे खरे सुख नव्हे , दु :खानेच सुखाचा घेतलेला केवळ वेष आहे तो , असे जेव्हा त्यांच्या अनुभवास आले , तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरविली आणि खर्या सुखाच्या शोधाला ते लागले . परमेश्वरप्राप्तीतच खरे सुख आहे , असे त्यांना आढळून आले . त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम . हेच , वेदकाळापासून तो आत्तापर्यंत सर्व साधुसंतांनी अनुभव घेऊन सांगितले आहे . सदगुरुकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने , भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले , तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो , असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे . आपण तसे नाम घेतो का ? नामाकरिता नाम आपण घेतो का ? का मनात काही इच्छा , वासना ठेवून घेतो ? कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही . देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच ; नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम . नाम एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच . मुले पतंग उडवितात ; एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो . तरी तो पतंग उडविणारा म्हणतो , ‘ माझ्या हातात आहे पतंग ; ’ कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो . जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे , तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे . ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला .
आपल्या नामस्मरणाला एका गोष्टीची अत्यंत जरुरी आहे . आपल्या जीवनात परमेश्वरावाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही , तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे . परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार , त्याशिवाय आपण जगूच शकत नाही , अशी वृत्ती बाणल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण . आपली स्थिती तर याच्या अगदी उलट ! परमेश्वरावाचून आपले कुठेच अडत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो . मग परमेश्वर तरी कसा येईल ? परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले , तर जीवनाचे सार्थक झाल्यावाचून राहणार नाही . नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी . अशा नामालाच ‘ निष्ठेचे नाम ’ असे म्हणतात .