गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते . कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात . ते कुठून येतात हे कळत नाही . म्हणजे , केवळ दृश्यामध्ये असणार्या गोष्टींचेदेखील मूळ आपल्याला उकलत नाही . मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार ? मी बोलतो कसा , माझे मन कुठून येते , हे देहबुद्धीत राहणार्यांना कळणे कठीण आहे . नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो . स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करुन घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता . पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो , त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केले तरी दुःखच पदरात पडते . आपण समजून उमजून ज्या चुका करतो , त्यांचा दोष आपल्याकडे असतो . न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही . प्रपंचाच्या आसक्तीने दुःखपरंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो , हा दोष नव्हे काय ? आपले कुठे चुकते ते पहावे आणि जे चुकते ते सुधारावे . प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात ? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते . मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे ? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले ! जो रामाजवळ विषय मागतो , त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त आहे असे सिद्ध होते .
मी तुमच्याकडे येतो , पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही . मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा ; म्हणजे , सतत नामस्मरणात राहा . मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही . जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच . मला रामावाचून दुसरे जिवलग कोणी नाही . देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही . तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे यापलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही . रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की , वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका . जो माझा म्हणतो , त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे . जीवनामध्ये तुम्ही घाबरु नका , धीर सोडू नका , आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या . माझा नियम असा आहे की , परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल . माझ्या गावी पैसा पिकत नाही . पण भक्ती मात्र खास पिकते . ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागेपुढे मी उभा आहे . मी तुमच्याजवळ आहेच ; तो कसा आहे याचा विचार तुम्ही करु नका . तुम्ही नुसते नाम घ्या , बाकीचे सर्व मी करतो . शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे , मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे ; ती मी सांभाळीन .