कोणतीही इमारत बांधीत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो , त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो . शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे . प्रथम , नित्यानित्यवस्तुविवेक करावा . अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे . नंतर , या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी . हे दुसरे साधन होय . आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते ; तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे . आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे , गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा , हर्षविषाद न मानता संतोषाने राहावे ; हे तिसरे साधन होय . शेवटी , भगवंताच्या भेटीची किंवा सदगुरुंच्या भेटीची खरी तळमळ लागावी . ही सर्व साधनसामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल . ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते . पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे . मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे . मोहाला बळी पडता कामा नये .
नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नव्हे . जनावरेदेखील आपापला प्रपंच करतातच . मनुष्याने भगवंताची उपासना करुन त्याची प्राप्ती करुन घेतली पाहिजे , तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते . सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही . खरोखर , भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठविलेले आहे . त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल , त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही , परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही . प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत . भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे . रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते , पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते , म्हणून सुखदुःख बाधते . म्हणून , आपण सुरवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू . यासाठी त्याच्या नामाची गरज आहे . प्रपंचाची तर्हा अशी असते की , आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले , की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते . म्हणून , एका डोळ्यात सुखाचे अश्रू , तर दुसर्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे . प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते , तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे ? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे , आणि बरावाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे . जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे . नाम घेणार्याचे राम कल्याण करतो , एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरु नका .