संसारात भाग्यसरिता वाहत असूनही बाळ जवळ नसेल तर माता तडफडेल. पाण्या असूनही माशाने तडफडावे तसे हे आहे. अहाहा ! अशा ओव्या प्रसवणार्‍या मातांना कोण प्रणाम करणार नाही, ही पवित्र प्रतिज्ञा पाहून कोण माना डोलवणार नाही व आपला सारा कवित्वाचा अभिमान सोडून देणार नाही ?

आईचे वर्णन ज्या ओव्यांत आहे, त्यांतील कोणत्या देऊ, कोणत्या दावू ? त्या मुळातच वाचा. राहवत नाही म्हणून दोन-चार देतो :

माउलीचा मार            त्यांत अमृताचा चारा
बाळाच्या कल्याणाच्या            त्यांत कोटी कोटी धारा
समुद्राचे पाणी            अहोरात्र नाचे
चित्त तसे माऊलीचे            बाळासाठी ॥
किती ओव्यांमध्ये गाऊं        माउलीच्या मी प्रेमाला
कोण प्रदक्षिणा घाली            आकाशाच्या ग सीमेला ॥

असे हे मातृप्रेम बाळपणी अनुभवावे :

फुलामध्ये फूल            फूल हुंगावे जाईचें
सुख भोगावें आईचे            बाळपणी ॥

परंतु ती सावत्र आई ! भेसूर कल्पना. सावत्र आईच्या दुष्ट पणाच्या किती गोष्टी. माता काय म्हणतात ते ऐका :

सख्ख्या ग आईची        गोड लागे मारपीट
सावत्र आईची                कडू साखरेची मूठ
सावत्र आईची            प्रीतीहि विषारी
कांटेच टुपतील                जरी बाभुळ मिठी मारी ॥

सावत्र आई म्हणजे बाळाला शाप. आईला सावत्र शब्द लावणे म्हणजे आई शब्दाचा अपमान आहे. सावत्र आई म्हणजे नागीण, पेटलेली खाई. इतक्यानेच नाही समाधान होत :

सावत्र माउली            माउली ती ना मृत्यु
तान्हेबाळाला जप तूं            देवराया ॥

मातृप्रेमाचा प्रेमळ अनुभव घेत, पंतोजीजवळ शाळेत व घरी मायबापांजवळ शिकत बाळ असा लहानाचा मोठा होत असतो. जरा मोठा होऊ लागला म्हणजे त्याला मधून मधून शेजारीपाजारी दुसर्‍याकडे जेवायला वगैरे जावे लागते. परंतु पंक्तीत बाळ उपाशी घरी येतो. तो भूक भूक म्हणतो. मग आई विचारते :

जेवून आलास            भूक इतुक्यांत कशी
आई तुझ्या हातच्या गे            घासाविणे उपवाशी ॥

आणखी आई प्रश्न विचारते, ‘श्लोक म्हटलास का, पक्वान्न काय होते ?’ परंतु उत्तर काय मिळते पहा :

जेवून आलास            काय होते लाडू वडे
मला नाही आई ठावें            लक्ष होतें तुझ्याकडे ॥
जेवून आलास            श्लोक कोणता म्हटला
आई तुला आठवून            पूर डोळयांना लोटला ॥

या प्रश्नोत्तररूप ओव्या वाचून कोणाचे हृदय भरून येणार नाही ? शेवटी बाळ म्हणतो :

आई नको धाडूं            कधीं दुसर्‍यांच्या घरी
बये तुझ्या ग हातची            गोड कोरडी भाकरी ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel