रसपरिचय

या प्रकरणात आरंभी मी मंगलमूर्तीच्या वंदनाच्या जोड्या दिल्या आहेत. मंगलमूर्तीजवळ माता आपल्या मुलीला पुत्र व्हावा अशी प्रार्थना करीत आहे.

मोरया रे देवा             लाडू घे सोंडेवरी
पुत्र दे मांडीवरी                 उषाताईला
मोरया रे देवा             तुला लिंपीन शेंदूर
पुत्र तूं दे सुंदर                 उषाताईला

आपली मुलगी सासरी सुखी राहावी म्हणून विघ्ननाशक गणपतीला माता प्रार्थना करिते :

मोरया रे देवा             सारी विघ्नें ही हाकवावि
तान्हे बाळीला राखवी             दूरदेशी

गणपती ही विद्येची देवता. मुलाला विद्या मिळावी, सद्‍बुध्दी यावी म्हणून ही मोरयाची विनवणी केलेली आहे. संकष्टचतुर्थीचेही वर्णन आहे. संकष्टीच्या चंद्राचे हे मनोहर वर्णन वाचा :

संकष्ट चतुर्थी             चंद्र दिसतो हिरवा
सखी वेचते दुरवा             पूजेसाठी

गणपतीच्या वर्णनानंतर शंकराच्या वर्णनपर ओव्या दिल्या आहेत. शंकराचे स्थान बहुधा डोंगरात, जंगलात, कोठे तरी घळीत असावयाचे. हा विरक्त योगी राजा दूर राहतो :

खोलामध्यें नांदे         नाहीं त्याचा गाजावाजा
भोळया त्या सांबा माझा         नमस्कार

शंकराचे वर्णन करणार्‍या ओव्या फार सुंदर आहेत. एके ठिकाणी तर गंमत केली आहे. शंकराला आपण भोळा म्हणतो; परंतु एक कवयित्री सांगते, “याला भोळा म्हणू नका. मोठा लबाड आहे हा. याने आपल्या जटेत गुपचूप गंगा ठेवून दिली आहे, पार्वतीला कळू नये म्हणून.”

भोळा महादेव             याला भोळा म्हणूं नये
त्याच्या जटेमध्यें             गुपित गंगा वाहे

परंतु एकंदरीत हा देव भोळा. तो आशुतोष म्हणजे पट्कन प्रसन्न होणारा आहे. सुष्ट असो वा दुष्ट असो, जो जे मागेल ते त्याला देतो.

भोळा महादेव             क्षणी प्रसन्न होतसे
दुष्ट असो सुष्ट असो             वर मागे तो देतसे

या भोळ्या महादेवाला मूठभर शिवामूठ वहा. तेवढ्याने प्रसन्न होऊन तो अपार भाग्य देतो.

पार्वतीने हा भोळा सांब वरिला म्हणून तिचे कौतुक केले आहे. जशी ही पार्वती पतिव्रता, तशी ती सत्यवानाची सावित्री. सत्यवान् व सावित्री यांची ती अमर कथा कोणास माहीत नाही ? पतीचे प्राण यम पाशाने ओढीत असता सावित्री धैर्याने तेथे उभी राहते :

पति असे पाशीं             धैर्य बसे त्याच्यापाशी
नाही झाली गोष्ट अशी             भूमंडळी

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel